bajrang puniya | vinesh phogat | narendra modi | sharad pawar sarkarnama
विश्लेषण

Assembly Election 2024 : वस्ताद, खेळाडू आणि 370...! 'या' तीन राज्यांत भाजपची कसोटी अन् देशभर चर्चा

Maharashtra, haryana, Jammu and Kashmir Assembly Election 2024 : महाराष्ट्र, हरियाणा आणि जम्मू- काश्मीर या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीमुळे देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. या तीनही राज्यांत विविध 'फॅक्टर'मुळे भाजपची कसोटी लागणार आहे.

अय्यूब कादरी

लोकसभेची निवडणूक लागली की संपूर्ण देश ढवळून निघतो. राजकीय घडामोडी वाढतात, अनेकवेळा अनपेक्षित वळणे घेतात. आता तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. माहितीची साधने वाढल्यामुळे एखाद्या राज्याचीही विधानसभा निवडणूक लागली तरी देशभर तेथील घडामोडींची चर्चा सुरू होते. लोकसभा निवडणुकीत यावेळी भाजपला स्वबळावर बहुमत न मिळाल्यामुळे विधानसभांच्या निवडणुकीकडेही लोकांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या तीनही राज्यांतील निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होत आहे. तिसरी आघाडी आकार घेणार, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. हरियाणातील विधानसभा निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे, ते विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या काँग्रेस ( Congress ) प्रवेशामुळे. भाजपच्या काही नेत्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार हे राजकीय डावपेचांतील वस्ताद आहेत, असे सांगितले जाते. महाराष्ट्रात शरद पवार, हरियाणात खेळाडू आणि जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवणे, या मुद्यांसमोर भाजपची कसोटी लागणार आहे.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सर्वार्थाने गाजत आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची मोठी पीछेहाट झाली. त्यातून सावरण्यासाठी सरकारने 'लाडकी बहीण योजना' आणली. या योजनेचा राज्यभरात गवगवा सुरू आहे. त्यासाठी विविध प्रकारचे इव्हेंट केले जात आहेत. असे असले तरी महायुतीतील तीनही पक्षांत समन्वय नसल्याचे वारंवार समोर येत आहे. या तीनही पक्षांतील नेते सातत्याने परस्परविरोधी विधाने करत आहेत. एकमेकांवर कुरघोड्या करणाऱ्या या विधानांमुळे लोकांमध्ये वेगळा संदेश जात आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे महायुती सरकारविरोधात नाराजी वाढली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज-जरांगे पाटील यांच्यावर भाजप ( Bjp ) नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या टीकेमुळे भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार हे आले आहेत. त्यांच्या चालींमुळे महायुतीच्या अडचणी वाढत आहेत. विशेषतः अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे शरद पवार यांच्या डावपेचांमुळे धाबे दणाणले आहे. लोकसभा निवडणुकीत अकलूजच्या विजयसिंह मोहिते-पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवार यांनी समीकरणेच बदलून टाकली होती. विधानसभा निवडणुकीतही कागल (जि. कोल्हापूर) येथील भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरदचंद्र पक्षात ) घेऊन डावपेचांना सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्या पक्षात येण्यासाठी महायुतीतील अनेक नेते इच्छुक असल्याचे चित्र दिसत आहे.

मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडी आणि महायुतीतही अतंर्गत संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीला फायदा झाला होता. शिवसेनेत फूट पडल्यामुळे त्यांच्या बाजूने सहानुभूती निर्माण झाली. शरद पवार यांच्याबाबतीतही हेच घडले. महायुतीच्या मार्गातील हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा होती. ठाकरे यांनीही त्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, महाविकास आघाडीने त्याला नकार देत संख्याबळाचा निकष लावला. तिकडे, महायुतीतही मुख्यमंत्रिपदावरून संघर्ष सुरू आहे. शिंदेच मुख्यमंत्री होणार, असे त्यांच्या पक्षाचे नेते सांगत आहेत. मुख्यमंत्री कोण, याचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, असे अजितदादा पवार सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडे भाजपचे आमदार घालत आहेत.

हरियाणातही घडामोडींना वेग आला आहे. 'जेजेपी'चे दुष्यंत चौटाला भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होते. अलीकडेच ते सरकारमधून बाहेर पडले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी बहुजन समाज पक्षासोबत आघाडी केली आहे. दुसरीकडे, भाजपच्या काही नेत्यांनी प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला बळ मिळत आहे. भाजपचे उत्तर प्रदेशातील माजी खासदार, राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करून त्याविरोधात महिला खेळाडू रस्त्यावर उतरल्या होत्या. त्या आंदोलनात सहभागी कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विनेश फोगाट यांना काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

हरियाणात भाजपला एकापाठोपाठ धक्के बसत आहेत. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली. त्यातूनच काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शेतकरी आंदोलनाचा परिणाम काय होणार, याचीही चिंता भाजपला लागली असणार. त्यातच भाजप खासदार कंगना रनौत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत काही दिवसांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे भाजपच्या चिंतेत भर पडली आहे. महिला खेळाडूंचे आंदोलन आणि त्याबाबत केंद्र सरकारने घेतलेली भूमिका, हाही भाजपसाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

कलम 370 हटवल्यामुळे जम्मू -काश्मीरच्या मतदारांचा मूड कसा बनला आहे, याचा अंदाज निवडणूक निकालानंतर येणार आहे, भाजपने ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच वर्षाला सहा गॅस सिलिंडर मोफत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वर्षाला तीन हजार रुपये वाहतूक भत्ता, दहावीतील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि लॅपटॉप, पाच लाख रोजगार आदी आश्वासने भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. केंद्रात गेली दहा वर्षे अनिर्बंध सत्ता उपभोगलेल्या भाजपला यावेळी कुबड्यांचा आधार घ्यावा लागला. आता या तीन राज्यांत होऊ घातलेली विधानसभा निवडणूक भाजपचे भवितव्य ठरवणारीच असेल.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT