''शरद पवार साहेब हे वस्तादांचे वस्ताद आहेत. शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो, हे मी जाणाऱ्या आमच्या मित्रांना सांगत होतो. जाऊ नका, मोठं लफडं होईल. मी सांगत होतो, काही करा पण त्या नेत्याला (शरद पवार) अंगावर घेण्याचं धाडस करू नका, कपाळमोक्ष ठरलेला आहे. तुम्ही पवारसाहेबांच्या वाटेला जाऊ नका..!'' राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे हे बोल आहेत. समरजितसिंह घाटगे यांच्या पक्षात प्रवेशाप्रसंगी ते बोलत होते. पाटील जे बोलले, त्याची प्रचीती आता येऊ लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर्षी फूट पडली. अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांच्यासह 40 आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि भाजपसोबत जाऊन सत्तेचा आश्रय घेतला. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने मोठा राजकीय गदारोळ झाला. दोन्ही पक्षांतील जाणाऱ्यांनी प्रमुखांवर शब्द ठेवले, त्यांना दूषणे दिली. उद्धव ठाकरे यांच्यावर तर अद्यापही मर्यादा सोडून टीका केली जाते. त्याचा फटका फुटीरांना आणि भाजपला सहन करावा लागला. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी फुटीरांसह भाजपला जागा दाखवून दिली.
अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेले धर्मरावबाबा आत्राम कॅबिनेट मंत्री झाले. घर फुटल्यानंतर होणाऱ्या यातना कशा असतात, याचा ते सध्या अनुभव घेत आहेत. त्यांच्या कन्या भाग्यश्री हलगेकर-आत्राम या आता शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. "शरद पवार वस्तादांचे वस्ताद आहेत, ते शेवटचा एक डाव शिल्लक ठेवतात," असे जयंत पाटील म्हणाले होते ते यामुळेच. भाग्यश्री हलगेकर या धर्मरावबाबा आत्राम यांच्यासाठी शरद पवार यांचा शेवटचा डाव ठरण्याची शक्यता आहे. अजून हा डाव अधिकृतपणे टाकला जायचा असतानाही धर्मरावबाबा आत्राम यांचा संयम सुटला आहे. "आमच्या नादाला लागलात तर नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही," अशी धमकीही आश्राम यांनी जावयाला देऊन टाकली आहे.
"जी बापाची होऊ शकली नाही, ती तुमच्या पक्षाची कशी होणार," असे विधान आत्राम यांनी आपल्या लेकीबाबत केले आहे. शरद पवार यांची साथ सोडून जाताना त्यांना हा प्रश्न पडला नसेल का? जे मूळ पक्षाचे होऊ शकले नाहीत, शरद पवारांचे होऊ शकले नाहीत, ते अजितदादांचे कसे होतील, असा प्रश्न आत्राम यांच्याबाबतीतही उपस्थित केला जाऊ शकतो. शरद पवारांचा पक्ष फोडला गेला, त्यांचे घर फोडले गेले, यात आत्राम सहभागी होते. आता त्यांच्या वाट्याला काव्यगत न्याय आला आहे. समरजिसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांना आपण अल्पसंख्याक असल्याची आठवण झाली होती.
आपली लेक शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची केवळ चर्चाच सुरू असताना धर्मरावबाबा आत्राम यांचा संयम सुटला आहे. लेकीने वेगळी वाट निवडली तर ती बापाची झाली नाही, असा कांगावा आता ते करू लागले आहेत. लेकीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, कोणत्या पक्षात जावे, हा तिचा अधिकार वडिलांना मान्य केला पाहिजे. गेल्यावर्षी राष्ट्रवादीतून बाहेर पडताना आत्राम यांनी तो अधिकार वापरला होता, लेकीने वापरल्यानंतर मात्र रागाने त्यांचा तिळपापड झाल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. पक्ष फुटल्यामुळे आणि नंतर फुटीरांनी आरोप सुरूच ठेवल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत अद्यापही लोकांमध्ये सहानुभूती आहे. त्यामुळेच शरद पवार यांच्या पक्षात इन्कमिंग वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना शरद पवार यांनी अस्थिर करून ठेवले आहे. लोकसभेचा निकाल पाहता त्यांच्या मनात पराभवाची भीती निर्माण झालेली आहे. या भीतीमुळेच आत्राम यांनी लेकीबाबत तसे वक्तव्य केले असून, जावयाला नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.
आपले घर फुटणार आहे, या कल्पनेनेच आत्राम यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. "भाग्यश्री शरद पवार यांच्या पक्षात गेली तर मला आणखी एक मुलगा आणि एक मुलगी आहे," असे ते म्हणाले आहेत. आत्राम यांनी इतक्या टोकाची भाषा करून आपल्या सरंजामी थाटाचे प्रदर्शन केले आहे. भाग्यश्री या शरद पवारांच्या पक्षात गेल्या तर आपला आणि मुलीचा संबंध संपुष्टात येईल, असेच त्यांना म्हणायचे आहे. आपण गेली 50 वर्षे राजकारणात आहोत, असे सांगणाऱ्या धर्मरावबाबा आत्राम यांच्या अंगी संयम कसा भिनला नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे, वस्तादाने डाव टाकायला सुरुवात केल्याने फुटीरांच्या पायाखालची वाळू सरकणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
( Edited By : Akshay sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.