Raj-Uddhav Thackeray Alliance News Sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: एकत्र येणे, हा उद्धव-राज ठाकरेंसमोरील अखेरचा पर्याय

Maharashtra local body Elections 2025 MNS Shiv Sena thackeray group Alliance: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपयशाची ही शृंखला कायम ठेवणे शिवसेना ठाकरे पक्षाला पेलवणारे नाही. त्यामुळेच आता पक्षाची घडी बसवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मातोश्री सोडावी लागणार आहे.

दीपा कदम

एकही आमदार नसलेल्या मनसेने शिवसेना ठाकरे पक्षाकडे टाळीसाठी हात पुढे करणे आणि त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद देणे, हा दोन्ही ठाकरेंसाठी शेवटचा पर्याय असू शकतो. मुंबई महापालिकेची निवडणूक हे एकच ध्येय त्यांच्यापुढे असले, तरीही मनसेसोबत जाण्याचा निर्णय घेणे आव्हानात्मक असेल.

आगामी मुंबई महापालिका निवडणूक इतर कोणत्याही पक्षापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी निर्वाणीची ठरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला एकूण बरे यश मिळाले असले तरी आघाडीतील इतर दोन्ही पक्षांच्या तुलनेत शिवसेना ठाकरे पक्षाने लढवलेल्या जागा आणि त्यांना मिळालेले यश याचे प्रमाण व्यस्त आहे.

विधानसभा निवडणुकीत एकूणच महाविकास आघाडीला अपयश आले. त्यात शिवसेना ठाकरे पक्षाच्या २० जागा (काँग्रेसच्या तुलनेत चार जागा जास्त) निवडून आल्या, हेच काय ते समाधान. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपयशाची ही शृंखला कायम ठेवणे शिवसेना ठाकरे पक्षाला पेलवणारे नाही. त्यामुळेच आता पक्षाची घडी बसवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मातोश्री सोडावी लागणार आहे. शिवसेना भवनावरची मरगळ दूर व्हावी यासाठी स्वत:पासूनच प्रयत्न करावे लागतील.

शिवसेना भवनात ठाकरे नियमित चार तास येऊन बसू लागले तरी शिवसैनिकांमध्ये चैतन्य येईल. सत्तेची भुरळ पडून ठाकरेंना सोडून कोणी जात असेल तर त्यांना थांबण्यासाठी कोणत्याच प्रकारचे प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून होताना दिसत नाही. आजी-माजी नगरसेवक जातात त्यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी फळीदेखील जात असते. काल-परवापर्यंत शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ‘आमचे नेते जरी गेले तरी कार्यकर्ते मात्र हललेले नाहीत’ असा दावा करत होते. पण दानवेंनी पुन्हा एकदा त्यांचे वक्तव्य वास्तवासोबत पडताळणी करून घेणे गरजेचे आहे.

झंझावाताची अपेक्षा

मुंबईमध्ये शिवसेनेच्या शाखा या पक्षाच्या रक्तवाहिन्या आहेत. मुंबईतील शिवसेना शाखांच्या मार्फत शिवसैनिकांना पक्षासोबत जोडून ठेवत होती. मुंबईतील प्रत्येक २८८ वॉर्डात शिवसेनेच्या शाखा आहे. यापैकी किती शाखा शिवसेना ठाकरे पक्षाकडे आज शिल्लक आहेत, याचा एकदा आढावा उद्धव ठाकरेंनी घेण्याची आवश्यकता आहे.

जुन्या जाणत्या शिवसैनिकांमध्ये ठाकरे कुटुंबाविषयी आदर आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत अजूनही साठी ओलांडलेला शिवसैनिक आहे. मात्र रस्त्यावरच्या लढाईत तरुणांच्या प्रश्नासाठी दोन हात करणारी शिवसेना आज शिल्लक नाही. कधीतरी अचानक लाडक्या बहिणींच्या योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेनेची महिला आघाडी थोड्याफार महिलांना सोबत घेत मोर्चा काढते.

कधीतरी रस्त्याच्या कामाचा घोटाळा वगैरे बाबत प्रातिनिधिक स्वरुपात ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरतो. मात्र त्यामध्ये सातत्य नसते त्यामुळे प्रश्न धसास लावले जात नाहीत. गुन्हे दाखल होऊ नयेत, आपल्याला कोण सोडवायला येणार या भीतीपोटीही अनेक शिवसैनिक रस्त्यावर आंदोलन करण्यास उतरणे टाळू लागले आहेत. कारण कायदेशीर तगादा मागे लागल्यावर पक्षाकडून सहाय्य मिळणे कमी झाल्याची तक्रार शिवसैनिक व्यक्त करू लागले आहेत.

शिवसैनिकांमध्ये वर्षातून चार वेळा भाषण करून प्राण फुंकण्याचे दिवस आता कालबाह्य झाले आहेत. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या राजकारणासाठी चोवीस तास उपलब्ध राहावे लागणार आहे. बाळासाहेबांनी उभी गेलेली गढी कोसळली आहे, हे मान्य करावे लागणार आहे. ‘विश्वास टाकलेल्यांनीच गद्दारी केली’ हे जरी खरे असले तरी रस्त्यावरच्या लढाईला पर्याय नाही. एकदा कधीतरी एक मोर्चा काढायचा आणि नंतरचे सहा महिने त्याचेच कशिदे सांगायचे हे किती दिवस टिकणार. पाय खोलात जात असताना निवडणुकीपुरतेच नव्हे तर त्याच्या मागेपुढेही ठाकरेंकडून झंझावाताची अपेक्षा लोकांना आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आभार यात्रा’ सुरु केली आहे. ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार विजयी झाले आणि जिथे पराभूत झाले अशा ठिकाणीही त्यांच्या सभा सुरू आहेत. त्याचा फायदा कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी पण होतो आणि मतदारांशी संवाद त्यामुळे वाढतो. याचा फायदा शिंदेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नक्कीच होईल. शिवसेना ठाकरे पक्षाला नवीन ‘मशाल’ निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्याची वेळ आलेली असताना ठाकरेंनी संवादही वाढवायला हवा. शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसे युतीबाबतची चाचपणीदेखील सुरू असल्याची चर्चा आहे.

या महिनाभरातच त्याविषयी दोन्ही ठाकरे बंधूचे मत जाहीर होईल. एकही आमदार नसलेल्या मनसेने शिवसेना ठाकरे पक्षाकडे टाळीसाठी हात पुढे करणे आणि त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद देणे हा दोन्ही ठाकरेंसाठी शेवटचा पर्याय असू शकतो. मुंबई महापालिका निवडणूक हे एकच ध्येय उद्धव ठाकरेंसमोर असले तरी काँग्रेससोबत जाण्यापेक्षाही हा निर्णय घेणे त्यांना अवघड आणि अडचणीचे असणार आहे. राजकीय युती आणि आघाडी होणे, बिघडणे याला राजकीय परिस्थिती जबाबदार असते. मात्र भावासोबत युती करणे याला त्याहीपेक्षा अनेक कंगोरे असतात, जेव्हा की एक भाऊ उद्धव ठाकरे आणि दुसरा राज ठाकरे असेल तर त्याची धार अधिकच असते…

शिवसैनिकांना हवे बळ

तूर्तास उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना विश्वास देऊन त्यांना सर्वप्रकारचे बळ देण्याची आवश्यकता आहे. यासाठी एक किस्सा सांगते, नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठवाड्यातील माजी खासदार सुभाष वानखेडेंची भेट झाली. शिवसेनेचे माजी आमदार आणि हिंगोलीचे माजी खासदार राहिलेल्या वानखेडेंनी आता शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. मधल्या काळात त्यांनी भाजपमध्ये पण प्रवेश केला होता. त्यांना छेडल्यावर बाळासाहेब आपल्यासाठी आजही देवच आहेत. पण राजकारणात टिकून राहावं लागतंच ना. मला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही. पण शिंदे साहेब माझ्यासाठी काहीच कमी करणार नाही याची मला खात्री आहे.

जेव्हा तिकीट देतील तेव्हा निवडून आणण्याची जबाबदारी पण घेतील आणि नाही तिकीट दिले तर काहीच कमी पडू देणार नाहीत. माजी खासदाराचा सन्मान कायम राहील पण इतर ठिकाणी हा विश्वास मिळणार नाही, ही प्रतिक्रिया बोलकी आहे. ज्यावर शिवसेना ठाकरे पक्षाकडून विचार व्हायला हवा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT