Raj Thackeray and Uddhav Thackeray sharing stage at ‘Awaaz Marathi’ event, signaling a possible political alignment Mumbai civic elections. Sarkarnama
विश्लेषण

Raj-Uddhav Thackeray Alliance: मराठी जनांना फुटला मोहोर...

Raj Thackeray Uddhav Thackeray alliance Awaaz Marathicha: महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच प्रादेशिक राजकारणाचे बी पेरले जाईल, हे मात्र नक्की. त्यासाठीची सुपीक जमीन देखील तयार झाल्याने शेत बहराला येण्याची मराठी माणूस आतुरतेने वाट पाहत आहे

दीपा कदम

२०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात अतर्क्य अशा घटनांची साखळीच सुरु झाली आहे. पाच जुलै रोजी ‘आवाज मराठी’चा या अराजकीय मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा धक्के द्यायला सुरुवात केली आहे. या मेळाव्यात घडलेल्या दोन प्रमुख घटनांपैकी एक म्हणजे २० वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणे. दोन टोकाच्या विचारधारा असणारी काँग्रेस आणि शिवसेना २०१९ मध्ये एकत्र आली. राज-उद्धव यांचे अजूनही ‘इशारो …इशारो मै’ सुरु असले, तरी त्यांच्या एकत्र येण्याच्या कल्पनेनेच मराठीजनांना मोहोर फुटला आहे

राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत महाराष्ट्रापेक्षा आमच्यातील (उद्धव आणि राज) कोणतेही वाद फार मोठे नाहीत असे वक्तव्य केले होते. ही मुलाखत एका पॉडकास्ट चॅनेलसाठी घेतली गेली, जिथे अजूनपर्यंत तीनचार मुलाखती षटीसामष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे अचानक ही मुलाखत घेण्याचे प्रयोजन काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासाच्या आतच उद्धव ठाकरेंनी एका सार्वजनिक कार्यक्रमात राज यांना प्रतिसाद दिल्यानंतर राज-उद्धव हे एकत्र येण्याबाबतची चर्चा सुरु झाली होती. दरम्यानच्या काळात या दोन्ही नेत्यांनी उन्हाळी सुट्टया देखील परेदशात आनंदून झाल्या.

त्यानंतर राज्यात शाळा सुरु झाल्यावर सरकारने प्राथमिक शाळेत त्रिभाषा सूत्रावरुन हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन दोन्ही ठाकरे बंधूनी सारखीच भूमिका घेत या निर्णयाला विरोध केला. दोघेही भाऊ एकच भूमिका घेऊन रस्त्यावर उतरण्याची शक्यता दिसताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेत त्यांना उद्धवपासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे. मात्र त्यांनी ऐकले नाही.

अर्थात सरकारच्या विरोधात मोर्चा काढून रस्त्यावर उतरायची तयारी ठाकरे बंधूनी केली. अधिवेशनाच्या तोंडावर मोर्चा निघाल्यावर विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले जाईल हे जाणून ते आदेश सरकारने मागे घेतले. त्यामुळे मोर्चा तुर्तास रद्द झाला. मात्र हा मोर्चा निघू नये यासाठी हे आदेश मागे घेतल्याचे लक्षात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना ठाकरे आणि मनसेचे नेते एकत्रित येत त्यांनी या आनंद मेळाव्याचे आयोजन केले.

अराजकीय नव्हे हा राजकीयच मेळावा

कुठलाही झेंडा नसेल, मराठी हाच ‘अजेंडा’ असे पालुपद घेऊन राज ठाकरे मेळाव्यातही सहभागी झाले. कोणतेही राजकीय भाषण न करता त्यांनी मराठी भाषेच्या गळचेपीविषयी सामाजिक, सांस्कृतिक वक्तव्य केली. पण हिंदी भाषेची सक्ती किंवा त्रिभाषा सूत्राला अराजकीय पद्धतीने कसे पाह्यचे. हा मूळ विषय राजकीय पटलावरुनच मांडण्यात आला, त्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह हा एका राजकीय धोरणाचाच भाग आहे.

राज ठाकरे यांनीच मेळाव्यात केलेल्या भाषणात, ‘मुंबई स्वतंत्र करता येते का? यासाठी आधी थोडसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्यायली आहे त्याने महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा. मजाक वाटला काय?’ असे वक्तव्य केलं. याचाच अर्थ हा विषय राजकीयच आहे.

मराठी भाषेचा हा आनंद मेळावा असला तरी तो केवळ भाषेपुरता सीमित राहिला नाही. हा मेळावा मराठी अस्मिता, मराठी संस्कृती आणि मराठी असण्याचा सार्थ अभिमानापर्यंत घेऊन गेला. या मेळाव्याला प्रामुख्याने शिवसैनिक आणि मनसैनिक हजर होतेच, शिवाय राजकीय पक्षविरहितही मराठी माणूस या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तो काही राज-उद्धव यांची युती व्हावी या भोळ्या आशेने आला नव्हता. मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात यापुढच्या काळात मराठीपण टिकावे यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून तो आला होता. मराठी भाषा हे आपले मूळ आहे, ते टिकले तर सर्वकाही आहे, याची खात्री मराठी माणसाला झाली आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकताना मराठी देखील प्राधान्याने शिकवली जावी याचे पुरेसे महत्व त्यांना आता पटू लागले आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांचे शिक्षण इंग्रजीत झाल्याचे सांगितले. मात्र मराठी भाषेच्या कडवटपणाविषयी त्यांच्यावर कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. दाक्षिणात्य कलावंत आणि राजकीय नेत्यांनी इंग्रजीतून शिक्षण घेऊनही मातृभाषेबाबत कडवटपणा कसा कायम आहे, याची एक लांबलचक यादीच राज यांनी मेळाव्यात वाचून दाखवली.

दाक्षिणात्य राज्यांच्या राजकारणाचा पाया हा प्रादेशिक अस्मितेवर टिकून आहे. त्यामुळे तेथे सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही प्रादेशिक अस्मितेचेच राजकारण करतात. मग भले कर्नाटक किंवा तेलंगणामध्ये कॉँग्रेसचे सरकार असले तरी कॉँग्रेसचा राष्ट्रीय अजेंडा त्या राज्यांच्या प्रादेशिक मुळावर येत नाही.

किंबहुना महाराष्ट्रात देखील कॉँग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीत ती मोकळीक होती. त्यामुळे महाराष्ट्रात तीव्रपणे प्रादेशिक राजकारणाची गरज निर्माण झाली नव्हती. मूळ शिवसेना हा इथला प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे. पण त्यांनी त्यांचे राजकारण भाजपच्या ओसरीला बांधले आणि प्रादेशिक राजकारणाला मुरड घातली लागली. आता मात्र त्यांनाही ती रिकामी जागा दिसू लागली असल्यास आश्चर्य वाटू नये. भाजपला भिडण्यासाठी प्रादेशिक राजकारणाचे आयुध कामी येवू शकते याची शक्यता शिवसेनेला वाटू लागली आहे.

‘मनसे’ला हातपाय हलवावे लागणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असतानाच पुत्र उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या गादीचा वारस जाहीर केले होते. यातून मग बाळासाहेबांची सावली म्हणून वाढलेल्या राज ठाकरे यांनी बाहेर पडून तेवढ्याच हिकमतीने ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ पक्षाची स्थापना केली. मनसेच्या स्थापनेला राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्राची ब्लूप्रिंट त्यावेळेस सादर केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंसारखे अमोघ वकृत्व, राजकीय टोकदार भाष्य करणारा वक्ता आजतरी कुणी नाही. अत्यंत आखीव रेखीव, सुंदर डिझाईन कल्पून कोणताही इव्हेंट प्रत्यक्षात उतरवण्याची हातोटी राज ठाकरे यांच्याकडे आहे.

मुंबईत मायकल जॅक्सनचा कार्यक्रम असो वा लता मंगेशकरांचा कार्यक्रम किंवा अलिकडेच ‘मराठी माझी मायबोली’ हा मराठी साहित्याचा कार्यक्रम असो. ज्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला त्यांच्यासाठी आयुष्यभरासाठीचा तो ठेवा ठरला आहे. पण या शापित नेत्याचे नशीब काही निवडणुकीच्या रिंगणात फळफळले नाही.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. एवढेच काय राज यांचे चिरंजीव अमित यांचाही विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. गेल्या वर्षा लोकसभा निवडणुकीत राज यांनी ज्या भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यांनी सुद्धा राज यांच्या मुलाला विधानसभा निवडणुकीत मदत केली नव्हती. राज ठाकरे यांनी स्वत: कधी निवडणूक लढवली नाही, मात्र मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मुलाला आमदार करता आले नाही, याचे शल्य राज यांच्या मनात नक्कीच असणार.

यापुढच्या काळात संघटन टिकवायचे असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला विजयासाठी कंबर कसावीच लागणार आहे. कारण बिनशर्त पाठिंबा दिल्याचा वैयक्तिक लाभ अनेक पद्धतीने राज यांना कदाचित झाला असेल, मात्र संघटन वाढण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना त्याचा फायदा काही होत नसल्याचे एव्हाना राज ठाकरेंच्या लक्षात आले असेल.

एका बाजूला राज ठाकरेंचे ‘बिनशर्त’ राजकारण सुरु असताना उद्धव ठाकरे मात्र कोणत्याही तडजोडीशिवाय राजकीय लढाई लढत आहेत. त्यांच्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे. मुंबई महापालिकेत २५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर त्यांचा पक्ष आज अत्यंत कठीण परिस्थितीतून जातोय. अशा परिस्थितीत त्यांचे हात मजबूत करायला राज यांच्यासारख्या नेत्याची जोड मिळाली तर मुंबईची निवडणूक अटीतटीची होईल. शिवसेना-शिंदे पक्षाच्या मदतीने मुंबई महापालिकेत ‘केक वॉक’ करण्याच्या भाजपच्या स्वप्नांना राज-उद्धव यांच्या एकत्रित येण्याने अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक राजकारणासाठी ठाकरेंसाठी जमेची बाजू

स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कासाठी जन्माला आलेली शिवसेना हा या मराठी मातीतला पक्ष आहे. स्थानिकांच्या रोजगारापासून भाषेपर्यंत त्यांनी उभारलेल्या आंदोलनाला मराठी माणसांनी भरभरून पाठिंबा दिला. मात्र महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात मात्र मराठी माणूसच अल्पसंख्य ठरु लागला आहे, हे आजचे वास्तव आहे.

हिंदी भाषेचा यापूर्वी कधी अडसर वाटत नव्हता, ती हिंदी आता टोचू लागू लागली आहे. सत्तेत असलेल्या भाजपचा एक भाषा हे धोरण असल्याने हिंदीचा पुरस्कार त्यांच्याकडून केला जात आहे, हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत मराठीचे कैवारी बनण्याची संधी ठाकरे बंधूंकडे चालून आली आहे. या संधीचे सोने करण्याच्या प्रयत्नात उद्धव यांनी राज ठाकरेंकडे आशेने पाहिले तर आश्चर्य वाटायला नको.

मुंबईत मराठी मतांचे प्रमाण २७ टक्के आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही शिवसेना- ठाकरे पक्षाला मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले होते. तसाच फायदा आगामी महापालिका निवडणुकीतही होण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांना वाटते आहे. विस्कळीत झालेल्या शाखा, शिवसैनिकांना एकत्र आणण्यासाठी राज ठाकरे यांची ‘एंट्री’ उद्धव ठाकरे यांना बळ देणारी ठरणार असल्याने ‘एकत्रिकरणाला’ उद्धव ठाकरे जास्त उत्सुक तर राज मात्र आखडता हात घेत पुढे येत असल्याचे दिसत आहे.

राज आणि उद्धव राजकीय युती करतील का, हे येणारा काळच सांगेल. पण ते एकत्र आले तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच प्रादेशिक राजकारणाचे बी पेरले जाईल, हे मात्र नक्की. त्यासाठीची सुपीक जमीन देखील तयार झाल्याने शेत बहराला येण्याची मराठी माणूस आतुरतेने वाट पाहत आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT