शिंदे गट अस्थिर, ठाकरे गट उत्साही:
शिंदे गट मंत्र्यांवरील आरोप व संघटनाच्या अभावामुळे अस्वस्थ आहे, तर ठाकरे गट मराठी भाषा आंदोलन व विधिमंडळातील यशामुळे उत्साहात आहे.
भाजपची भूमिका आणि डावपेच:
भाजप शिंदेपासून अंतर ठेवत असून उद्धव-राज ठाकरे यांच्याशी अप्रत्यक्ष संपर्क ठेवून आगामी महापालिका निवडणुकीसाठी पर्याय खुले ठेवत आहे.
ठाकरे यांचे आत्मपरीक्षण आणि राज यांच्याशी जवळीक:
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अपयशाची जबाबदारी घेत आत्मचिंतन केले असून राज ठाकरे यांच्यासोबत युतीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे संकेत दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांची आगामी निवडणूक, विधानसभेचे सरलेले अधिवेशन आणि मराठी भाषा आंदोलनाने सत्ताधारी एकनाथ शिंदेची शिवसेना व विरोधी आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवसेना या शिवसेनेच्या दोन्ही गटांत वेगवेगळ्या कारणांनी हालचाल दिसून येत आहे. अधिवेशनात आपले मंत्री आरोपांनी लक्ष्य केल्याने शिंदे गट अस्वस्थ झाला आहे, तर मराठी भाषेविषयीच्या आंदोलनात मनसेची तर अधिवेशनात शिंदे गटाला लक्ष्य करण्यात ठाकरेंच्या पक्षाला यश मिळाल्याने त्यांच्यात चैतन्याचे वारे स्फुरल्याने तो गट जोशात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष डावपेच आखत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र वेगळ्याच प्रकारची अस्थिरता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जमिनीवर पक्षाची बांधणी मजबूत लागते. नेमका त्याचाच अभाव शिंदे सेनेत आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे अस्वस्थ राहतील यासाठी चहुबाजूंनी त्यांना घेरले जात आहे. शिंदेची ही बैचेनी त्यांच्या भाषणांमधून देखील व्यक्त होऊ लागली आहे. महायुतीअंतर्गत आणि विरोधी पक्षांकडूनही त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु आहेत.
एकनाथ शिंदे हे अधिवेशनातल्या एका भाषणात ते म्हणाले होते, ‘फडणवीसांविषयी हे काय काय बोलायचे आणि आता पुष्पगुच्छ घेऊन जातायत. ठाकरेंचा बहुतेक केमिकल लोचा झाला असावा.’ भाजपसोबत उद्धव ठाकरेंची वाढलेली सलगी शिंदेंना मान्य नाही, त्या अस्वस्थेतूनच शिंदेंनी या विधानाद्वारे ठाकरेंना सुनावले. शिंदेंची तगमग पाहून फडणवीसदेखील, ठाकरेंना उद्देशून ‘तुम्ही आमच्या बाजूला येऊ शकता’ असे गंमतीत बोलून मोकळे झाले. संपूर्ण अधिवेशन काळात शिंदेंची ही अस्वस्थता लपून राहिलेली नाही. त्यामुळेच शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागे भाजपचाच डाव असल्याची ‘थिअरी’ सांगितली जाते. राज-उद्धव एकत्र आल्यास ठाकरेंच्या पक्षाची ‘व्होट बॅंक’ मजबूत होईल आणि शिंदेंच्या पक्षाची ताकद व महत्त्व कमी होईल असा कयास आहे. त्यामुळे भाजपचा कसा फायदा होणार, हा प्रश्न आहेच. शिवाय मुंबई महापालिका निवडणूका तोंडावर असताना भाजप ठाकरेंची ताकद का वाढवेल? राजकारणातून ठाकरेंना हद्दपार करण्यासाठी भाजपने टोकाचे राजकारण खेळले ते पाहता यापुढच्या काळात भाजप ‘ठाकरें’च्या राजकारणाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बळ देण्याची शक्यता अजिबातच नाही.
शिवाय मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना मुंबईत भाजप शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेणार असल्याचा दावा आता करत असली तरी निवडणूक जवळ येतील तसा हा निर्णय बदललाही जाऊ शकतो. त्यामुळे भाजपकडून आता तरी चाचपणीच सुरू आहे, मात्र यापुढच्या काळात शिंदेंना बळ मिळणार नाही याची खबरदारी भाजप घेत आहे.
एका बाजूला अशा चर्चा सुरू असताना ठाकरे पितापुत्रही त्यास खतपाणी घालत आहे. शिंदेंना न रुचणाऱ्या गोष्टी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वारंवार करून ते अस्वस्थ कसे राहतील, यावर ते भर देत आहेत. अधिवेशनात पत्र, निवेदने देण्याच्या निमित्ताने फडणवीसांची भेट ही दोघे घेत होते. तसेच फडणवीस आणि आदित्य ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये घडवून आणल्या जात आहेत.
अधिवेशन काळात उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट, त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाला एकत्रित छायाचित्र काढण्याच्या प्रसंगी भाजपकडून उद्धव ठाकरेंसोबत दाखवलेली सलगी, ठाकरेंनी देखील त्याच कार्यक्रमात फडणवीसांशी जाणीवपूर्वक केलेले संभाषण यामुळे शिंदेंच्या पोटात नक्कीच कालवाकालव झाली असेल. हे कमी की काय अधिवेशन संपल्यानंतर वांद्र्यातील सोफीटेल हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची बैठक पार पडल्याची आवई माध्यमांनी उडवून दिली होती. त्यात काही तथ्य नसल्याचे नंतर समोर आले असले, तरी वारे कधी बदलू शकतात, भाजप आपल्याला कधीही दूर सारू शकते याची कल्पना शिंदेंनाही आहे.
निवडणूक चिन्हावर येत्या काही दिवसांत येणारा निकाल शिंदेंच्या विरोधात गेला तर त्यांची कोंडी होणार आहे. तत्पूर्वी भाजपमध्ये विलिनीकरणाच्या चर्चेलाही हवा मिळाली आहे. या पर्यायाची चाचपणी शिंदेंच्या पक्षाकडून सुरू झाल्याचे समजते. एरव्ही पक्ष विस्तारासाठी भाजपने सर्व प्रकारच्या राजकीय व्यक्तींसाठी दरवाजे खुले केले असले तरी शिंदेंसाठी मात्र ते सहज शक्य नाही. भाजपमध्ये राज्यात काम करताना फडणवीसांचे नेतृत्व मान्य करणे ही प्राथमिक अट आहे. शिंदेंना ती मान्य होईल?
एका बाजूला शिवसेना शिंदे पक्षाचे अस्तित्व हे भाजपच्या मर्जीवर टिकलेले असताना त्यांच्या आमदारांचे एकामागोमाग एक प्रताप बाहेर येत आहेत. या पक्षाच्या आमदार, मंत्र्यांची प्रकरणे बाहेर येण्याची मालिका सुरु झाली आहे. विरोधकांच्या आडून कोण निशाणा साधत आहे, याचा सुगावा शिंदे यांना असेलच, त्यामुळे देखील त्यांची अस्वस्थता वाढणे साहजिकच आहे. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यामागे कोणी असण्याचे कारण नाही. परंतु आपल्याला कोणी विचारणारे नाही याची खात्री गायकवाडांना असावी; म्हणून सार्वजनिकरित्या ते हातघाईवर येऊ शकतात. हे प्रकरण ताजे असतानाच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या शयनगृहामध्ये पैशाने भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ समोर आला.
त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर परवाना असलेल्या डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकून बारबालांना पकडण्यात आल्याचा गौप्यस्फोट आमदार अनिल परब यांनी केला. अधिवेशनाच्या काळातच भाजप आमदार संदीप जोशी यांनी मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यावर नोकर भरतीदरम्यान भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून तक्रार केली. एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मागच्या आठवड्यात बैठक घेत इशारा दिला आहे, त्याचा परिणाम किती होणार ही गोष्ट अलहिदा.
राजकीयदृष्ट्या शिवसेना शिंदे पक्षासमोरची आव्हाने मोठी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेशाची मोहीम मात्र त्यांची जोरदारपणे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाचा एक गट रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकरांसोबत युती करण्यास शिंदे यशस्वी ठरलेत. त्याचा किती फायदा होईल हे मात्र येणारा काळच ठरवेल. मात्र राजकीय वावटळीत पक्षाची ताकद वाढवत ठेवण्याचा नियम तरी त्यांच्याकडून पाळला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत २० जागा निवडून आल्यानंतर चाचपडत असलेल्या ठाकरेंच्या पक्षाला हिंदी सक्तीच्या विरोधाच्या आंदोलनाने पुन्हा चालना दिली आहे. यापूर्वी राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चाही करण्यास उद्धव ठाकरे कधी उत्सुक नसत त्यासाठी आज ते आस लावून बसले आहेत. शिवाय शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदारांचे वेगवेगळे कारनामे बाहेर येऊ लागल्याने ठाकरेंच्या शिवसेनेनेही त्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे.
‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणुकीविषयी आत्मचिंतन केले, हे उत्तम झाले. निवडणुकीच्या नऊ महिन्यांनंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाने याविषयी चिंतन करण्याची आवश्यकता होतीच.
या मुलाखतीत ठाकरे म्हणालेत, ‘सगळ्या गोष्टींत हात वर करण्यात काही अर्थ नाही. मी ती जबाबदारी स्वीकारली आहे. लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसले तरी उमेदवार होते, विधानसभेला चिन्ह होते, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हते. ही चूक होती,’ हे ठाकरे यांनी मान्य केले आहे.
विशेष म्हणजे, महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत समन्वयाचा अभाव असल्याची टीका केली जात होती. उद्धव ठाकरे त्यापेक्षा दोन पावले पुढे जाऊन म्हणालेत की, ‘महाविकास आघाडीत समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेले होते.
लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचे आहे हे आपलेपण होते, विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो ‘मी’पणा आला त्यामुळे पराभव झाला,’ हे ठाकरे यांनी मान्य केले. त्याचबरोबर जागा वाटपाबाबत ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ नसल्याचे सांगत महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुटला नव्हता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांकडे जमिनीवरील पक्षाची यंत्रणा शिल्लक नव्हती. असे असतानाही जागा वाटपात ठाकरे पक्षाने लावलेला सूर हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हैराण करणारा होता. ठाकरेंनी आत्मचिंतनाला सुरुवात केलीच असेल तर त्यांच्या पक्षापासून आणि त्यांच्या नेत्यांनीही जागावाटपाबाबत घेतलेल्या भूमिकेचीही झाडाझडती घ्यावी लागणार आहे.
विरोधी पक्षाच्या बाकावर बसल्यानंतर विधान परिषदेत प्रथमच उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. उद्धव ठाकरे सभागृहात अपवादानेच उपस्थित राहतात, सभागृहात आले तरी पंधरा वीस मिनिटे थांबतात. संसदीय कामकाजात त्यांचा सहभाग अद्याप तरी दिसून आलेला नाही. या अधिवेशनात मात्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने त्यांनी भाषण देखील केले हे विशेष. दानवेंच्या निरोप समारंभानंतर छायाचित्र काढण्यासाठीही ठाकरे उपस्थित राहिले. यावेळी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहबोली हा चर्चेचा विषय राहिला आहे.
विधानपरिषदेत विरोधी पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे पक्षाने जोरदार किल्ला लढा लढवला. यावेळी दानवेंच्या जोडीला अनिल परबही मैदानात उतरले होते. अखेरच्या दिवशी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे मुंबईत डान्सबार असल्याचे आणि या बारवर नुकताच छापा पडून बारबालांना अटक केल्याचा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून त्यांनी दिली. त्यातच हनीट्रॅपविषयी शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत रोज नवनवीन माहिती पुढे आणत आहेत. या प्रकरणात अनेक सरकारी अधिकाऱ्यांसोबतच राजकीय नेतेही अडकले असल्याचा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे. विधानसभेमध्ये शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांनी शिवसेना शिंदे पक्षाला सळो की पळो करुन सोडले होते. मात्र ते केवळ मुंबईच्या प्रश्नावरच अडकून पडल्याचे चित्र होते.
प्राथमिक शाळेमध्ये त्रिभाषा सक्तीच्या माध्यमातून हिंदी लादण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न शिवसेना ठाकरे आणि मनसेने एकत्र येत सरकारने काढलेले आदेश मागे घ्यायला लावला. मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्या हक्कासाठी जन्म झालेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा याच विषयाने चालना दिली. मराठी भाषेच्या निमित्ताने ठाकरेंच्या शिवसेनेत बऱ्याच दिवसांनंतर चैतन्य पाहायला मिळाले. सरकारने त्रिभाषा सूत्र तुर्तास मागे घेतले असले तरी निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी जल्लोषाचा उडवलेला बार हा वेळेआधी केलेला उत्साह ठरू नये.
उद्धव आणि राज ठाकरे मराठीच्या निमित्ताने एकत्र आले हे मात्र या मेळाव्याचे ईप्सित होते. हे दोन भाऊ राजकीय व्यासपीठावरही यापुढच्या काळात एकत्र येणार का, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरे यांनी राजही आपल्या सोबत असल्याचे विधान मुलाखतीतही केले आहे. मात्र राजकीय युतीविषयी निवडणुका जाहीर झाल्यावर ठरवू यावर राज आणि उद्धव या दोघांचेही एकमत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंनीसोबत असावे यासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
मुंबई महापालिकेत २५ वर्षे शिवसेनेची सत्ता होती. शाखा या शिवसेनेच्या मुख्य वाहिन्या आहेत, मात्र शिवसेना पक्ष फुटीनंतर मुंबईतील शिवसेनेच्या शाखा विस्कळित झाल्या आहेत. शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. मनसेची मुंबईत पक्षबांधणी पुरेशी नसली, तरी काही भागांमध्ये मनसेचा शिवसेनेला उपयोग होऊ शकतो. महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षासाठी प्रमुख आव्हान हे भाजपचे असणार आहे. ते पेलण्यासाठी राज यांची उद्धव ठाकरेंना मोठी मदत होऊ शकते. मात्र अजूनही राज ठाकरेंनी याबाबतचे आपले स्वारस्य जाहीर केलेले नसल्याने ही युती होणार की नाही याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.
प्रश्न: शिंदे गटात अस्वस्थतेचे कारण काय आहे?
उत्तर: मंत्र्यांवरील आरोप व पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा ही मुख्य कारणे आहेत.
प्रश्न: ठाकरे गटाला सध्या चालना का मिळत आहे?
उत्तर: मराठी भाषा आंदोलन आणि विधिमंडळातील आक्रमक भूमिकेमुळे उत्साह वाढला आहे.
प्रश्न: भाजप सध्या कोणत्या भूमिकेत आहे?
उत्तर: भाजप सध्या शिंदे गटावर विसंबून न राहता ठाकरे-राज यांच्या पर्यायांचा विचार करत आहे.
प्रश्न: उद्धव-राज ठाकरे युती होणार का?
उत्तर: उद्धव इच्छुक असले तरी राज ठाकरेंनी अद्याप यावर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.