Sanjay Shirsat Sarkarnama
विश्लेषण

Sanjay Shirsat: आरोपांच्या फैरींमध्ये शिरसाट एकाकी; गमवलेली पत पुन्हा मिळवून विरोधकांना पुरून उरणार का?

Imtiaz Jaleel attack on shivsena Minister Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आहेत; परंतु एकानेही शिरसाट यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले नाही किंवा त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस केले नाही.

Jagdish Pansare

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर काही दिवसांपासून सातत्याने आरोप होत आहेत. शिवसेनेतील पक्षफुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू सातत्याने मांडल्यामुळे शिरसाट चर्चेत आले होते. मात्र, मंत्रिपद मिळाल्यानंतर ते सातत्याने वादात सापडत आहेत. विरोधी पक्षांतील नेत्यांनी शिरसाट यांना लक्ष्य केले आहेच, पक्षामध्येही ते एकाकी पडल्याचे दिसत आहे.

रिक्षाचालक, कंपनीतील कामगार ते राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रिपदापर्यंत पोचणारे संजय शिरसाट सध्या राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहेत. अर्थात ही चर्चा चांगल्या अर्थाने कमी आणि त्यांच्या कारनाम्यांमुळे जास्त होत आहे. तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामध्ये संजय शिरसाट यांची महत्त्वाची भूमिका होती.

गुवाहाटीच्या हॉटेलमधून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जाहीर पत्र लिहून अंगावर घेणारे शिरसाट पक्षाचे राज्य प्रवक्ते म्हणून आता भूमिका जोरकसपणे मांडताना दिसतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय राऊत यांची तोफ धडाडली की त्याला तेवढ्याच सडेतोडपणे शिरसाटांचे उत्तर ठरलेलेच असते.

निधीवरून नाराजी

छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आल्यानंतर राज्यातील महायुती सरकारमध्ये शिरसाट यांच्या वाट्याला मंत्रिपद आले. सामाजिक न्याय खात्यासारखे महत्त्वाचे खाते मिळाल्यानंतर शिरसाट आपली छाप पाडतील आणि खऱ्या अर्थाने समाजातील गोरगरीब विद्यार्थी, नागरिकांचे भले होईल, अशी अपेक्षा होती.

मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर वसतिगृहांची अचानक पाहणी, अधिकाऱ्यांची झाडाझडती, दुरुस्तीसाठी निधी देत शिरसाट यांनी लक्ष वेधून घेतले; परंतु सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवल्यानंतर त्यांचे आपल्या सरकारशी खटके उडू लागले.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर शिरसाट यांचा रोष आहे. ‘‘माझ्या खात्याचा निधी इतरत्र वळवता येत नाही, तसा नियम आहे. निधीच मिळणार नसेल तर माझे खातेच बंद करून टाका,’’ असा संताप त्यांनी व्यक्त केला होता. अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही तक्रार केली. पण प्रशासन आणि सर्वाधिक काळ राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव असलेल्या अजित पवार यांनी शिरसाट यांचे आरोप आणि खाते बंद करण्याची भाषा हलक्यात घेतली.

एकूणच अजित पवार ऐकणार नाही हे लक्षात आल्यानंतरही शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करणे सुरूच ठेवले. महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यंतरी मुंबईत शिरसाट यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून शिरसाट काहीसे शांत असल्याचे चित्र आहे.

पालकमंत्री म्हणून वादग्रस्त

विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याचे शिरसाट यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. पक्षांतर्गत विरोधकांवर मात करत शिरसाट यांनी बाजी मारली. शहरातील कायदा व सुव्यवस्था, गुंडगिरी, नशेखोरी रोखण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी पालकमंत्री होताच जाहीर केले.

स्थानिक पालकमंत्री मिळाल्याने शहरवासीयांच्याही अपेक्षा वाढल्या. पण दोन-चार महिन्यांतच ते संशयाच्या जाळ्यात अडकले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून शिरसाट यांच्या मुंबईतील ७२व्या मजल्यावरील फ्लॅट, शहरात २० हजार चौरस फुटांवर उभारण्यात आलेला आलिशान बंगला, त्याच्यासमोर कोट्यवधी रुपये किमतीच्या महागड्या गाड्या, जेसीबी, हायवा यांवरून आरोप सुरू झाले.

‘तुमचीही अंडीपिल्ली बाहेर काढीन,’ असे धमकावत शिरसाट यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले आणि विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी होतोय, असे वाटत असतानाच शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील एका मोठ्या हॉटेल खरेदी प्रकरणात त्यांचा मुलगा सिद्धांत याचे नाव आले. व्हिट्स हॉटेल खरेदीच्या लिलावामध्ये सहभागी होत ते ६४ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले.

यावरून ओरड होताच, मराठी माणसाने उद्योग, व्यवसाय करू नये का? हॉटेल खरेदीसाठी बँकेचे कर्ज घेतले आहे, न्यायालयाच्या आदेशाने लिलाव प्रक्रिया सुरू आहे, असे म्हणत शिरसाट यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले, एमआयएमने या वादात उडी घेतली आणि हे प्रकरण अंगलट येणार हे लक्षात येताच शिरसाट यांनी आरोप करणाऱ्यांना आव्हान देत लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचे जाहीर करत सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.

इम्तियाज जलील यांची एंट्री

हॉटेल व्हिट्स खरेदी प्रक्रियेतून माघार घेत शिरसाट यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, तोच माजी खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्याविरोधात मोहीम उघडली. शेंद्रा एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेला भूखंड आरक्षण हटवून कंपनी उभारण्यासाठी खरेदी केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. राजकीय दबाव आणत हा भूखंड शिरसाट यांनी मुलगा, पत्नीच्या नावे खरेदी केल्याची कागदपत्रेच इम्तियाज यांनी माध्यमांसमोर आणली.

केवळ शेंद्रा एमआयडीसीतील भूखंडच नाही, तर शहरालगत विविध गटांमध्ये पंधरा ते वीस एकर जमीन, शहरातील अदालत रोड येथे प्लॉट अशी एकामागोमाग प्रकरणे बाहेर आली. सहजापूर येथे राखीव असलेली वर्ग २ची जमीन दोन मुले आणि पत्नीच्या नावे खरेदी केल्याचे प्रकरणही यात होते. जलील आक्रमकपणे तुटून पडले असताना, एरवी विरोधकांना अंगावर घेऊन उत्तर देणाऱ्या शिरसाट यांनी गप्प राहण्याची भूमिका स्वीकारली.

‘जलील यांच्या आरोपांवर काही बोलणार नाही, त्याच्या आरोपाने काही होणार नाही, त्यांनी ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केला आहे,’ असेच ते माध्यमांना सांगत राहिले. मात्र, जलील यांच्याकडून सातत्याने हल्ले सुरू असताना वर्ग दोनच्या जमिनीची माहिती देताना त्यांनी केलेल्या जातिवाचक उल्लेखावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. अगदी घरावर समर्थकांना पाठवून शेणफेकीचा प्रकार फसला. जलील यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत आंबेडकरी समाज आणि संघटनांनी शहरातून मोठा मोर्चा काढत त्यांच्या अटकेची मागणी केली. पण हे सगळे प्रयत्न बूमरँग होऊन शिरसाट यांच्यावरच उलटले.

इम्तियाज जलील-दानवे ‘युती’

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात एमआयएमचे इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यात ‘युती’ झाल्याचे चित्र दिसून आले. दानवे यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी एमआयएमने मदत केली होती. शिरसाट यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या जलील यांना रसद पुरवत अंबादास दानवे यांनी त्याची परतफेड केल्याचे बोलले गेले. जलील यांनी दानवे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन शिरसाट व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे खरेदी करण्यात आलेल्या बेकायदा मालमत्तेची कागदपत्रे त्यांना दिली. विधिमंडळ अधिवेशनात हा विषय लावून धरा, असा आग्रह त्यांनी धरला.

मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या भेटीसाठी वेळ मिळवून देण्यास मदत करतो, असे आश्‍वासन दानवे यांनी जलील यांन दिले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिरसाट-दानवे यांच्यात सातत्याने खटके उडाले आहेत. संधी मिळताच दानवे यांनी जलील यांच्या मदतीने शिरसाट यांची कोंडी करण्यास सुरुवात केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आता शिरसाट यांचे हे प्रकरण गाजणार एवढे मात्र निश्चित. जलील यांनी केलेले आरोप कसे खोटे आणि जातीयवादातून करण्यात आले आहेत, हे दाखवण्यासाठीच मोर्चाचा घाट घालण्यात आला होता, हे आता लपून राहिलेले नाही. शिरसाट यांच्यावर विधिमंडळात आरोप होतील, तेव्हा याच मोर्चाचा दाखला दिला जाईल.

पक्षातून साथ मिळेना

शिरसाट यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे, बेकायदा संपत्ती खरेदी केल्याचे आरोप होत असताना त्यांच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आहेत; परंतु एकानेही शिरसाट यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले नाही किंवा त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस केले नाही. शिरसाट यांना पक्षांतर्गत विरोध टोकाचा आहे. शिरसाट यांचे माजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार, प्रदीप जैस्वाल, खासदार संदीपान भुमरे यांच्याशी संबंध बिघडलेले आहेत. तर मित्रपक्ष असलेल्या भाजपने शिरसाट यांच्यावर आरोप होत असताना दूर राहून गंमत पाहण्याची भूमिका स्वीकारली आहे.

भाजपचा सुरुवातीपासूनच पालकमंत्रिपदावर डोळा असून, एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांना हे पद दिल्याने भाजपच्या गोटात नाराजी होतीच. शिरसाट अडचणीत सापडले असताना त्यांची आणखी कोंडी करण्यासाठी भाजपमधील एक गट विरोधकांना रसद पुरवण्यात अग्रेसर होता, अशीही चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या वादापासून दूर आहे. एकूणच आरोपांमुळे खिंडीत सापडलेल्या शिरसाट यांना आता स्वतःलाच ही लढाई लढावी लागणार आहे.

पोलिसांशीही पंगा..

पालकमंत्री झाल्यापासून शिरसाट यांनी पोलिस प्रशासनाच्या कारभाराबद्दल वारंवार नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या मतदारसंघात वाढते दरोडे, चोऱ्या, लुटमारीच्या घटनांमध्ये पोलिस दलातीलच काही, अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या मतदारसंघातील वाळूज भागात लड्डा नावाच्या उद्योजकाच्या घरी दरोडा पडला आणि त्यात कोट्यवधी रुपयांचे सोने, रोख रक्कम लुटण्यात आली होती. पोलिसांशी झालेल्या चकमकीत या घटनेतील आरोपीचा मृत्यू झाला आणि पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. परंतु जप्त केलेला मुद्देमाल अगदीच कमी होता. यावरूनही संजय शिरसाट यांनी पोलीसांवर गंभीर आरोप केले होते.

निवडणुकीत खांदेपालट?

शिरसाट यांच्यावरील आरोपामुळे शिवसेनेच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे. आधीच पन्नास खोके, गद्दारीवरून गेली तीन वर्षे शिंदे यांचा पक्ष लक्ष्य होत आहे. त्यात शिरसाट यांच्या बेकायदा मालमत्ता खरेदीच्या प्रकरणाने डोके वर काढले आहे. अशावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाचे जिल्ह्यातील नेतृत्व त्यांच्या हाती ठेवायचे की नाही, यावर पक्ष पातळीवर खल सुरू असल्याचे बोलले जाते. छत्रपती संभाजीनगरची महापालिका शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची असणार आहे.

शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने महापालिका निवडणुकीचे नेतृत्व त्यांच्याऐवजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे सोपवले जाऊ शकते. असे झाले तर शिरसाट यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल. एकूणच संजय शिरसाट यांचा राजकीय प्रवास सध्या वेगळ्या वळणावर आला आहे. विरोधकांच्या चक्रव्यूहात अडकलेले शिरसाट ते कसे भेदतात? आरोपांमुळे गमवावी लागलेली पत ते पुन्हा मिळवून विरोधकांना पुरून उरतात का, याचे उत्तर येणाऱ्या काही दिवसांत मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT