Eknath Shinde vs uddhav thackeray  Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics: ठाकरे अन् शिंदेंचे अस्तित्व राखण्यासाठी प्रयत्न

Uddhav Thackeray vs Eknath Shinde local body election 2025: उद्धव आणि राज एकत्र येण्याने महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीने तो प्रश्न निकाली निघाला आहे.

दीपा कदम

Summary

  1. उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांची जवळीक वाढत असून, त्यांच्या युतीस महाविकास आघाडी अडसर ठरणार नाही अशी चिन्हे आहेत.

  2. उद्धव ठाकरे आता पत्रकार परिषदेऐवजी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलनाच्या भूमिकेत दिसत आहेत.

  3. एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीवारी करत मोदी-शहांच्या भेटी घेत असून, महायुतीतील आपले स्थान मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

उद्धव ठाकरेंची शिवसेना अन् राज ठाकरेंच्या मनसेच्या युतीस महाविकास आघाडीचा अडसर ठरणार नसल्याची चिन्हे आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका उद्धव यांनी घेतली आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांमुळे अडचणीत आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अन् त्यानंतरही आपले महत्त्व राखण्यासाठी ते दिल्लीवारी करून मोदी-शहांच्या भेटीगाठी घेत आहेत.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांच्या उपस्थितीपासून उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीवारी केली तीही भलत्याच कारणाने गाजली. मतदारयादीत बोगस मतदार असल्याचे राहुल गांधी यांनी पुराव्यांसह ‘पीपीटी प्रेझेंटेशन’ आघाडीच्या नेत्यांसमोर केले. यावेळी उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसलेले दिसले. त्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

‘कोणतेही सादरीकरण दुरूनच अधिक चांगले दिसते,’ असे सांगत शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून आले. या चिखलफेकीत राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना सहकुटुंब घरी निमंत्रित केले, याकडे दुर्लक्ष झाले. राहुल आणि प्रियाका गांधी-वद्रा यांनी उद्धव, रश्मी आणि आदित्य ठाकरेंना त्यांचा बंगला दाखवला. त्यांच्यासोबत एकत्र भोजन केले. गांधींनी दाखवलेल्या सलगीने ठाकरे कुटुंबीय मनोमन नक्कीच सुखावले असतील.

ठाकरेंची वेगळी चूल?

दिल्लीवरून परतल्यानंतर दोनच दिवसांत ठाकरेंनी महायुतीतील मंत्र्यांविरुद्ध आंदोलन पुकारले. रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय भाजपला उघडे पाडता येणार नाही, हा मंत्र बहुदा उद्धव ठाकरे दिल्लीतून घेऊन आलेत. शिवसेनेने कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन केले. यावेळी मंत्र्यांचे पेहराव आणि त्यांचे अभिनय करत या आंदोलनात रंग भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच दिवशी दिल्लीत विरोधी पक्षांच्या खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला होता. हा मोर्चा अडविण्यात आला आणि अनेक खासदारांना अटक करून सोडून देण्यात आले. नेमके याच दिवशी शिवसेना ठाकरे पक्षाने हे आंदोलन केले. त्यामुळे ठाकरेंच्या आंदोलनाची वेळ चुकल्याची चर्चा सुरू झाली. आंदोलनाची वेळ खरेच चुकली की आपली वेगळी चूल दाखवण्याचा ठाकरे प्रयत्न करू लागलेत?

मविआचा अडसर नाही?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंत कमी होत असलेला दुरावा याची नोंद पुन्हा एकदा घ्यावी लागणार आहे. उद्धव आणि राज एकत्र येण्याने महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीने तो प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येण्यास महाविकास आघाडीचा अडसर नसून दोन भावांच्या मनोमिलनाला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असल्याची चर्चा आहे. दोन्ही ठाकरे बंधू सोबत येण्याच्या चर्चेनेच शिवसेना ठाकरे पक्षासोबत मनसेमध्येही चैतन्य निर्माण झाले आहे. अनेक वर्षांतील अबोला आणि मनातील अढी दूर करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मनापासून प्रयत्न करत आहेत. उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक वर्षांनी राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले. अनेक वर्षानंतर राज ठाकरे आल्याने उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले होते.

ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्यापूर्वी दोन भाऊ एकत्र आल्यास ही युती अधिक सहज-सुलभ होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही दुरावलेले आहेत त्यांनाही एकत्र येण्यासाठी वेळ दिला जात असल्याची चर्चा आहे. गणेशोत्सवात उद्धव ठाकरेही राज ठाकरेंच्या घरी गणेशदर्शनासाठी जातील अशी चर्चा आहे. दरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पक्षबांधणी मजबूत करण्यावर भर दिला आहे.

दोन्ही पक्षांचे जमिनीवरील व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. जागावाटपाबाबत चर्चा करण्यापूर्वी दोन्ही पक्षांनी आपापल्या पक्षसंघटनेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि नाशिक या महापालिकांतही दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता नेत्यांना वाटते आहे. या शहरांत यापूर्वी राज ठाकरेंना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कल्याण-डोंबिवली, नाशिक महापालिकेत मनसेने सत्ता मिळवण्यापर्यंत मजल गाठलेली आहे. या महापालिकांमध्ये ठाकरेंना मानणारा मतदार आहे. ठाकरें बंधूंची युती या महापालिकांत काय किमया करू शकते हे आगामी काळात दिसेल.

‘जनसुरक्षा’ : ठाकरे आक्रमक

मुंबईत जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात परिषद पार पडली. या परिषदेत उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. उद्धव ठाकरे डाव्यांच्या व्यासपीठावर कसे? असा प्रश्न स्वत: ठाकरे यांनी त्यावेळी उपस्थित करत यावर खुलासाही केला. त्यांनी सांगितले, की कम्युनिस्ट आणि शिवसेनेचा एकेकाळी संघर्ष झाला होता. पण राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष, सूड असता कामा नये. आमच्या सर्वांच्या मनात देशप्रेमाचा एक समान धागा आहे. डाव्यांच्या संगतीतही उद्धव ठाकरे आता स्थिरावल्याचे यावरून दिसून आले. जनसुरक्षा विधेयकाला विधानसभेत विरोध करताना बोटचेपी भूमिका घेणाऱ्या विरोधकांनी आता मात्र विरोध सुरू केला आहे.

‘दहशतवाद किंवा देशद्रोही विरोधी कायदा आणताना जातपात, धर्म पाहू नका. जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करेल त्याचा देशद्रोह हाच धर्म समजून त्याला फासावर लटकवा, आम्ही त्यासाठी पाठिंबा देतो. मात्र, जनसुरक्षा कायद्यात त्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही,’ त्याबद्दल नाराजी व्यक्त करत हा कायदा रद्द करण्यासाठी तीव्र लढा देण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. जनसुरक्षा कायदा किती वाईट अन् त्याचा दुरुपयोग हा सर्वसामान्यांबाबत केला जाऊ शकतो, हे जोपर्यंत सर्वसामान्यांना पटवून देत नाही तोपर्यंत जनसामान्यांतून उठाव होणार नाही. आम्ही सत्ताधाऱ्यांच्या सडलेल्या मानसिकतेच्या विरोधात असून देशाच्या किंवा राज्याच्या विरोधात नाही, असेही ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. ‘जनसुरक्षा’ असो वा भ्रष्टाचारी मंत्र्यांना विरोध असो, यापुढे केवळ पत्रकार परिषदा नव्हे तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार असल्याचे उशिरा का होईना ठाकरेंच्या ध्यानी आलेले दिसते.

शिंदेंची मंत्रिमंडळ बैठकीस दांडी

शिवसेना शिंदे पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय नेत्यांमध्ये सर्वाधिक कुटुंबवत्सल आहेत, असा समज करून घेण्यास हरकत नाही. दर एक दोन महिन्यांनी कौटुंबिक सुट्टी शिंदे आवर्जून घेतात. सुट्टी घेतली की सातारा जिल्ह्यातील दरे गावी जाणारे शिंदे अलीकडे मात्र श्रीनगरला जाताना दिसतात. पंधरवड्यापूर्वीही मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारून त्यांनी थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या श्रीनगरलाच चार दिवस घालवले.

काही दिवसांपूर्वी पुण्यात एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’च्या घोषणा देणाऱ्या शिंदेंनी वैयक्तिक सुट्टीच्या काळातही गुजरातवरचे प्रेम ढळू दिले नाही. अचानक एक दिवस श्रीनगरवरून गुजरातमधील जुनागड येथील गिरनारला सहकुटुंब देवदर्शनासाठी गेल्याचे समजते. तिथून महाराष्ट्रात न परतता आल्या पावली परत श्रीनगरला थंड हवेच्या ठिकाणी गेले. मंत्रिमंडळ बैठकीला सर्व मंत्र्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित असते. पण शाळेपेक्षा मैदानात रमणाऱ्या मुलांप्रमाणे शिंदे मंत्रिमंडळ बैठका आणि प्रशासकीय कामात रमत नसल्याचे दिसते.

बैठकीला दांडी मारणाऱ्यांच्या यादीत शिंदेंचा समावेश मुख्यमंत्री फडणवीस आगामी काळात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियोजित प्रशासकीय बैठकांना अनुपस्थित राहण्याची शिंदेची खोड कायम आहे. शिंदेंच्या श्रीनगर आणि दिल्लीत वाढलेल्या चकरांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पहेलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिंदे तीनदा श्रीनगरला गेले आहेत. श्रीनगरमध्ये त्यांनी रक्तदान शिबिरही घेतले होते. श्रीनगरपेक्षाही शिंदे यावेळी चर्चेत राहिले ते दिल्ली वारीमुळे. या महिन्यात तीनदा दिल्लीला गेले आणि मोदी-शहांच्या भेटीसाठी प्रतीक्षा करताना पहायला मिळाले.

मोदी-शहांबरोबर संवाद

महायुतीच्या दुसऱ्या पर्वात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर त्यांचे सूर पुन्हा जुळू शकलेले नाहीत. शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री अनियमितता अन् भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वारंवार वादात सापडत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्यासाठी दिल्लीतच आशेचा किरण दिसू लागला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा आपल्याला पंखाखाली घेतील असा विश्वास शिंदेंना वाटतो आहे. त्याच ओढीने ते वारंवार दिल्लीला गेल्यानंतर त्यांना एकदा या दोघांसोबत हितगुज करता आले.

यावेळी त्यांनी मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, पत्नी लता आणि स्नुषेसह पंतप्रधानांची भेट घेतली. पवित्र श्रावण सुरू असल्याचे औचित्य साधत त्यांनी शंकराची प्रतिमाही पंतप्रधानांना भेट दिली. दिल्लीत ठाण मांडून बसल्यानंतर मोदी आणि शहांची भेट मिळवण्यात शिंदे यशस्वी ठरले असले तरी ही भेट मिळवण्यासाठी शिंदे यांना जी खटपट करावी लागली ती पाहता शिंदे यांच्यासमोर आगामी काळात संघर्ष वाढणार असल्याचे स्पष्ट आहे.

यातूनही मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत शिंदे आहेत. मोदी-शहांसोबतचा संवाद कायम राहील यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख मोदी-शहा असल्याच्या विरोधकांच्या टीकेवर ते काही उत्तर देत नाहीत.

शिवाय या भाजप श्रेष्ठींच्या भेटीसाठी शिंदेंना प्रदेश भाजप किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांना अजून तरी धूप दाखवावा लागत नाही यातच सारे काही आले. दिल्लीश्वरांची ही कृपादृष्टी कायम रहावी, या प्रयत्नात शिंदे आहेत. कारण येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला जागा वाटपात मानाचे स्थान मिळावे या प्रयत्नांत एकनाथ शिंदे आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदेंच्या शिवसेनेत नियमित पक्षप्रवेश सुरू आहेत. त्यांच्याकडे होणाऱ्या पक्षप्रवेशाची तुलना ही भाजपच्या पक्षप्रवेशासोबतच करावी लागेल. महायुतीत जागा वाटपात कुठे मागे पडू नये यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून जनाधार वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर शिंदेंचे महायुतीतील स्थान दोलायमान होण्याची भीती शिंदेंना वाटत असल्याची चर्चा आहे. भाजपच्या ‘वापरा आणि फेकून द्या’ उक्तीनुसार आपलेही तसेच होऊ नये, या प्रयत्नांत शिंदे असण्याची शक्यता आहे.

शिंदेंच्या पक्षाचे अस्तित्व अजूनही न्यायालयीन कचाट्यात आहे, त्यांच्या मंत्र्यांचे कारनामे यामुळे शिंदेंचा हात दगडाखाली आहे. आपल्याला यातून मोदी-शहाच सहीसलामत सोडवू शकतात, अशी शिंदेंची श्रद्धा असावी. त्यामुळेच शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची अद्याप तरी कहाणी अधुरी आहे.

FAQ

प्र.१: उद्धव-राज युतीबाबत महाविकास आघाडीची भूमिका काय आहे?
उ: काँग्रेसकडून बाहेरून पाठिंबा मिळत असून, अडसर नसल्याची चिन्हे आहेत.

प्र.२: उद्धव ठाकरे आंदोलनात काय नवे करत आहेत?
उ: ते आता केवळ पत्रकार परिषद न घेता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

प्र.३: शिंदे वारंवार दिल्लीला का जात आहेत?
उ: मोदी-शहांचा पाठिंबा मिळवून महायुतीतील आपले महत्त्व टिकवण्यासाठी.

प्र.४: शिंदे यांच्यासमोरील मोठा धोका कोणता आहे?
उ: भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि भाजपच्या ‘वापरा-फेका’ धोरणामुळे त्यांचे स्थान डळमळीत होऊ शकते.

(Edited by: Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT