Mahayuti News Sarkarnama
विश्लेषण

Mahayuti News: शिंदेंकडे असलेल्या विभागाच्या पतंगाचा दोर फडणवीसांकडे; शिंदे गटातल्या मंत्र्यांमध्ये चलबिचल

Maharashtra Politics Devendra Fadnavis Challenged to Eknath Shinde: शिंदे गटातल्या मंत्र्यांमध्ये ज्याप्रमाणे चलबिचल आहे, त्यापेक्षा वेगळी परिस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाही.

दीपा कदम

Mumbai News: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं असले तरी शिवसेनेत मात्र अंतर्गत धुसफूस सुरु झाल्याचे चित्र आहे. आता पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झालेत, पण पूर्वीप्रमाणे शिंदेंना ते प्रशासकीय कारभारात मोकळीक देण्याची शक्यता नाही.

शिंदेंकडे असलेल्या विभागाच्या पतंगाचा दोर फडणवीस स्वत:कडेच ठेवतील आणि ताणून ठेवतील याचीही कल्पना शिंदेंना आहे. त्यामुळे शिंदेच्या मंत्र्यांसोबतच शिंदेंचीही धुसफूस होणे त्यांच्या दृष्टीने साहजिकच आहे. यातून मोकळा श्वास घेण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहण्याचा शहाणपणा शिंदेंकडे आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये शिंदे गटासाठी भाजप आव्हान उभे करू लागली असताना उद्धव ठाकरे गटानेही ‘देवाभाऊ…’ म्हणून फडणवीसांना साद घातली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या धोरणांचे त्यांच्या मुखपत्रातून कौतुक करण्यात आले होते. पक्षाच्या मुखपत्राच्या अग्रलेखात फडणवीसांचे कौतुक ही बाब एकनाथ शिंदेंसाठी नक्कीच सुखद नाही. राजकारणात आजचा शत्रू उद्याचा मित्र असू शकतो, यासाठी कोणताही विधिनिषेध पाळला जात नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील पाच वर्षांत घडलेल्या घटनांनी इतिहास घडविलेला आहे. काँग्रेससोबत शिवसेनेने जाणे, शिवसेना पक्षप्रमुखांना शिवसैनिकांनी आव्हान देऊन मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हायला लावणे या घटना राजकीय भाष्यकारांच्याही कल्पनेपलीकडच्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने घातलेली साद फडणवीसांच्या कानावर गेली आणि त्यांनीही ठाकरेंना टाळी दिली तर या कल्पनेनेही शिंदेंची नववर्षात झोप उडालेली असू शकते.

राज्यात विरोधी पक्ष मूठभर शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सत्ताधारी निर्धास्त असायला हवे होते, तसे ते नाहीत. कारण मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी कारभार सुरळीत करण्याच्या नावाखाली जी सफाई मोहीम हाती घेतली आहे, त्यातून सर्वाधिक अनियमितेच्या कारभाराची रद्दी ही तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातीलच निघू लागली आहेत.

एसटी महामंडळातील बस खरेदी प्रकरण हे प्रकरणही त्यातलेच. हा केवळ एकमेव योगायोग नाही, असे अनेक योगायोग यापुढच्या काळात शिंदेंना अस्थिर ठेवण्यासाठी घडण्याची शक्यता आहे. याची कल्पना शिंदेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आली आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेच्या गोटात धुसफूस सुरू झाली आहे.

शिंदे गटातल्या मंत्र्यांमध्ये ज्याप्रमाणे चलबिचल आहे, त्यापेक्षा वेगळी परिस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाही. भाजप घटक किंवा मित्र पक्षांना कशा पद्धतीने संपवते ते त्यांनी जवळून पाहिलेले आहे. एका ‘प्लॅन’मध्ये तर ते स्वत: सहभागी होते. त्यामुळे यापुढच्या काळात शिंदे गटालाही ‘कट टू साइज’ ठेवण्याचा प्रयत्न भाजप करणार याची कल्पना शिंदेंनाही आहे.

भाजपने ते करायलाही सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात भाजपसोबत राहूनही शिवसेना शिंदे गटाचा विस्तार करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. शिवाय फडणवीसांनी रचलेल्या चतुर चालींना ओलांडून त्यांना पुढे जावे लागणार आहे.

देवेंद्र फडणवीस २०१४मध्ये मुख्यमंत्री झाले असताना शिंदे आणि फडणवीसांची गट्टी जमली होती. विधानसभा निवडणुकीनंतर नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध आधीच्या दोन वर्षांएवढे सुमधुर राहिलेले नाहीत, असे म्हणायला वाव आहे. कोणतेही मतभेद किंवा मनभेद नसल्याचे सर्व नेते माध्यमांपुढे सांगत असले तरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात एक अस्वस्थता निश्‍चितपणे आहे. यातून बाहेर पडून चांगला कारभार करण्याचे आव्हानही शिवसेनेच्या मंत्र्यांपुढे आहे.

एका बाजूला पक्षबांधणी करणे, सरकारमध्ये आपला वरचष्मा कायम राहील याची काळजी घेणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करणे अशा त्रिस्तरीय पातळीवर शिंदेंना काम करावे लागणार आहे. त्याशिवाय फडणवीस प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान देत आहेत, जे शिंदेंच्या शिलेदारांना मान्य नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित चांगल्या जागा येऊनही शिंदेंच्या गटामध्ये स्थिरता आलेली नाही.

मंत्रिपदाची शपथ घेऊनही मंत्र्यांमध्ये उत्साह नाही. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर सर्व विभागांचा ज्या पद्धतीने आढावा घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे आपण नामधारी मंत्री असल्याची भावना मंत्र्यांची झाली आहे.

विशेष करून आपल्याला चाप लावला जात असल्याचे शिंदे यांच्या म्हणजेच शिवसेनेच्या मंत्र्यांना वाटू लागले आहे (अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या मंत्र्यांची भावनाही सारखीच असेल). शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या हक्काने आणि हट्टाने ज्या गोष्टी शिंदेंच्या गळी उतरवल्या जायच्या त्या फडणवीसांच्या बाबतीत शक्य नाही, त्यामुळे मंत्रिपद मिळूनही चित्त समाधानी नाही अशी स्थिती शिवसेना शिंदे गटाची आहे.

शिंदेंच्या सुसाट सुटलेल्या गाडीला फडणवीसांचा ‘बूस्टर’ होता. शिंदेंना विश्वासात घेण्यासाठी फडणवीसांनी ती पावले उचलली होती. ठाकरेंना आव्हान देवू शकेल अशी व्यक्ती त्यांनी हेरून त्यांच्यासोबतच्या मैत्रीला त्यांनी खतपाणी घातले होते. मात्र त्यानंतरच्या राजकीय उलथापालथीत शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर मात्र त्या दोघांमधील पूर्वीचे संबंध आता तितके मधूर राहिलेले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT