Mahayuti Politics Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis sarkarnama
विश्लेषण

Mahayuti Politics : दादा-भाई हे बरं नव्हं,तुम्ही थेट फडणवीसांनाच विसरलात!

Mahayuti Politics Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे जरी उपमुख्यमंत्री असले तरी सत्तेत असलेल्या सर्वात मोठ्या पक्षाचे ते नेते आहेत. महाराष्ट्राच्या भाजप आणि महायुतीच्या राजकारणाचा शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

Roshan More

Mahayuti Politics : राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री अजित पवार ज्याप्रमाणे 'दादा' नावाने परिचित आहेत. त्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'भाई' म्हणून संबोधले जाते. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उल्लेख 'साहेब' म्हणून केला जातो. मात्र,दादा-भाईंच्या राजकारणात सध्या देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

महायुतीच्या नेत्यांची बैठक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणारच हे गृहित धरले जाते. एव्हाना फडणवीस नसतील तर महायुतीच्या बैठका अनेकदा कॅन्सल किंवा पुढे ढकलल्याचे दिसून आलेले आहे. तास- तास बंद दाराआड चालणाऱ्या सगळ्याच बैठकांचे सारथ्य आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे लपून राहिलेले नाही.मात्र,पहिल्यांदाच वर्षा बंगल्यावर बुधवारी मध्यरात्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली.विशेष म्हणजे या बैठकीला महायुतीचा रिमोट कंट्रोल असलेले देवेंद्र फडणवीसच हजर नव्हते.

महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे जरी उपमुख्यमंत्री असले तरी सत्तेत असलेल्या सर्वात मोठ्या पक्षाचे ते नेते आहेत. महाराष्ट्राच्या भाजप आणि महायुतीच्या राजकारणाचा शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सत्तांतरावेळी कमीपणा घेत त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.मात्र,सुरवातीला सरकारमध्ये सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात असल्याचे चित्र होते.

'वर्षा'वर जी दादा-भाईंमध्ये बैठक झाली. त्या बैठकीत सरकारी योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या याची रणनीती ठरल्याच्या चर्चा आहे.एवढ्या महत्त्वाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहिले की, त्यांना निमंत्रणच नव्हते हे याबाबत काही माहिती समोर आलेली नाही.आधीच महायुतीच खटक्यावर खटके उडत असतानाच वर्षावरील बैठकीला फडणवीसांची दांडी चर्चेचा विषय ठरणार हे नक्कीच होते.

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी महायुतीमधील मतभेद हे आपआपसांत मिटवण्याचे सांगून वादावर जाहीर बोलू नका, म्हणून तंबी देखील दिली. अमित शाह यांच्यासोबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे आता या दोन्ही दादा-भाईंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट आहे.

पहिलीच बैठक फडणवीसांच्या विना

महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून तसेच अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून महायुतीच्या प्रत्येक बैठकीला फडणवीस उपस्थित राहत होते. शिंदे गटात आणि अजित पवार गटात काही कुरबुरी झाल्या तर फडणवीस हेच मध्यस्थी करत होते. मात्र, पहिल्यांदाच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते.

दादा-भाईंमध्ये समझोता

शिंदे गटाकडून अजित पवार गटाला सातत्याने टार्गेट करण्यात आल्याचे दिसून येत आहे. मंत्री तानाजी सावंत यांचे अजित पवार गटातील मंत्र्यांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य असो नाहीतर शिंदेंच्या लातूरच्या जिल्हाध्यक्षांनी, मंत्री गुलाबराव पाटलांनी अजित पवार गटावर केलेली टीका असो. अजित पवारांनी या टीकेवर थेट बोलण्याचे टाळले असले तरी त्यांच्या गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे शिंदे-पवार गटात वाद असल्याचे चित्र होते.

एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत आणि गुलाबराव पाटील यांना मुंबईला बोलावून घेतले होते. त्यांना समज दिल्याची देखील चर्चा होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या दोन्ही गटात दिलजमाई झाली असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्रि‍पदासाठी रस्सीखेच

भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी मुख्यमंत्रिपद हे एकनाथ शिंदेंकडे आहे. भाजपकडे मुख्यमंत्रिपद असावे यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने 160 जागा लढण्याचा आग्रह भाजप पदाधिकारी, नेते केंद्रीय नेतृत्वाकडे धरत आहेत. तर, अजित पवार यांनी मुख्यमंत्रि‍पदा बाबतची आपली मनीषा कधीच लपवून ठेवली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदासाठी महायुतीत रस्सीखेंच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT