Mamata Banerjee Sarkarnama
विश्लेषण

Mamata Banerjee news : नंदीग्रामबाबत ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय, कार्यकर्त्यांना धक्का; बंगालचे राजकारण कोणत्या दिशेला जाणार?

Mamata Banerjee bypoll, Nandigram by election 2026, TMC Nandigram candidate : नंदीग्राम पोटनिवडणुकीतून ममता बॅनर्जींची माघार; नवख्या संचिता प्रधान डे यांना संधी, तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी.

Rajanand More

Nandigram Assembly bypoll : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजकीय वाटचालीला घरघर लागल्याची चर्चा आहे. तब्बल ६० हून आमदार आणि २० लोकसभेचे खासदार सोडून गेल्यानंतर ममतादीदींच्या राजकारणाला ब्रेक लागला आहे. तरीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक आशेचा किरण दिसत होता. बंडखोरांनीही शब्द दिला होता. पण अखेर ममता बॅनर्जी यांनी निर्णय घेतलाच...

नंदीग्राम विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी स्वत: मैदानात उतरतील, अशी जोरदार चर्चा होती. त्यांचा भवानीपूर मतदारसंघात पराभव झाल्याने पुन्हा विधानसभेत जाण्यासाठी नंदीग्रामच्या रिंगणात त्या आपले नशीब आजमावतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. पण अखेर रविवारी तृणमूल काँग्रेसने संचिता प्रधान डे यांना उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे डे या नंदीग्राम पंचायत समितीची निवडणूक लढल्या होत्या, त्यात त्यांचा पराभव झाला होता.

नंदीग्राम सारख्या हायहोल्टेज मतदारसंघात एका नवख्या महिला कार्यकर्त्याला उमेदवारी देत ममता बॅनर्जी यांनी भाजपला ही लढत सोपी केल्याची चर्चा आता रंगली आहे. पराभवाच्या भीतीने त्यांनी माघार घेतली, अशी खिल्लीही उडविली जात आहे. ममता बॅनर्जींचा हा निर्णय कार्यकर्त्यांना धक्का देणारा मानला जात आहे. कारण बंडखोरीने ग्रासलेल्या पक्षाला दीदींच्या उमेदवारीमुळे एकप्रकारे लढण्याची ऊर्जा मिळाली असती. कार्यकर्त्यांना झोकून देऊन काम केले असते, अशी चर्चा होती.

नंदीग्राम हा मतदारसंघ ममता बॅनर्जी यांच्या राजकीय वाटचालीतील एक महत्वाचा गड मानला जातो. २००७ मध्ये त्यांनी नंदीग्रामध्ये मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाची धग संपूर्ण राज्यात पसरली होती. एक आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यावेळी संपूर्ण देशाचे लक्ष त्यांनी वेधले होते. त्यानंतर चार वर्षांतच बंगालमध्ये तृणमूलने सत्ता काबीज केली होती. डाव्या पक्षांची तब्बल तीन दशकांची सत्ता ममतादीदींनी उखडून टाकली होती. त्यावेळी ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून विधानसभेत पोहोचल्या होत्या. त्यानंतर सलग १५ वर्षे त्या मुख्यमंत्री राहिल्या.

ममता बॅनर्जी आता नंदीग्रामची पोटनिवडणूक लढणार नसल्याने मागील १५ वर्षांनंतर त्या पहिल्यांदाच विधानसभेत नसतील. पक्षावर मोठे संकट उभे ठाकलेले असताना त्यांचे विधानसभेत नसणे, पक्षासाठी मोठा झटका असणार आहे. नंदीग्रामध्ये नेहमीच तृणमूल आणि भाजपमध्ये संघर्ष राहिला आहे. विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी एकदा ममतादीदींचा तिथे पराभवही केला होता. आता राज्यात भाजपची सत्ता असल्याने पुन्हा नंदीग्रामध्ये उतरून राजकीय धोका पत्करण्यास ममता बॅनर्जी तयार नसाव्यात.

बंडखोर गटाने ममता बॅनर्जी उमेदवार असतील तर आपण उमेदवार देणार नाही, असे स्पष्ट केले होते. कदाचित ममता बॅनर्जी यांना उकसवण्याचाही प्रयत्न असावा. कारण आता बलाढ्य बनलेल्या भाजपसमोर ममता बॅनर्जी यांचाही निभाव लागणार नाही, हे सध्याचे चित्र आहे. बंडखोर गटाची स्थानिक पातळीवर फारशी ताकद नाही, हे मागील काही महिन्यांत दिसले आहे. त्यामुळे आता त्यांनी उमेदवार जाहीर केला तरी भाजपच्या मतांवर फारसा परिणाम होणार नाही. मात्र, ममता बॅनर्जी उमेदवार असत्या तर कदाचित ही निवडणूक अटीतटीची पाहायला मिळाली असती.

पोटनिवडणुकीत ममतादीदी विजयी झाल्या असत्या तर तृणमूलच्या आणि त्यांच्याही राजकीय भविष्यासाठी नवी नांदी ठरली असती. पण पराभव झाला तर त्यांचे राजकीय भवितव्यच पणाला लागले आहे. त्यामुळेच त्यांनी सुरक्षित पर्याय निवडल्याची चर्चा आहे. 'सर सलामत तो पगडी पचास' या उक्तीप्रमाणे त्यांनी यापुढील काळात सन्मानाने राजकारण करत भाजपला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हाची लढाई त्यांना लढायची आहे. हा लढा जिंकला तरच त्यांना पुढचा राजकीय लढा ताकदीने लढता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT