

हिमाचल प्रदेशच्या राजकारणात काँग्रेसला धक्का देणारी सर्वात मोठी घडामोड घडली आहे. मागील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाची अक्षरश: वाताहात झाली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांसह ग्रामपंचायतींमध्येही वर्चस्व निर्माण केले आहे.
पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर विधानसभेची लिटमस टेस्ट म्हणून पाहिलेल्या गेलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला अपयश आले आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस सरकारविरोधी लाट असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. निवडणुकीआधी नेतृत्वबदल होणार का, याबाबतही आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिकच्या निवडणुकांना काँग्रेस सामोरे गेले होते. पण बहुतेक ठिकाणी पक्षाला भाजपने धूळ चारली आहे. शहरी भागासह ग्रामीणमध्ये भाजपचाच वरचष्मा राहिला आहे. हिमाचल प्रदेश भाजपकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपने चारपैकी तीन महापालिकांमध्ये सत्ता काबीज केली आहे. तर ११ पैकी १० जिल्हा परिषदा आणि ९२ पकी ५७ नगरपालिका ताब्यात घेतल्या आहेत.
ग्रापंचायतींमध्येही फारसे वेगळे चित्र नाही. राज्यातील ३ हजार ७५८ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २ हजार ३७२ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा सरपंच आहे. मागील काही महिन्यांत झालेल्या या निवडणुकी काँग्रेसला आरसा दाखविणारा ठरल्याचे मानले जात आहे. यापूर्वी पक्षांतर्गत कलहही समोर आला होता. आता स्थानिकमधील अपयशाने सुक्खू यांच्यावरील दबावही वाढला आहे.
काँग्रेसचे हिमाचलसह सध्या कर्नाटक, तेलंगणा आणि केरळमध्ये मुख्यमंत्री आहेत. तर तामिळनाडू, झारखंड आणि जम्मू काश्मीरमधील सरकारमध्ये काँग्रेस वाटेकरी आहे. पुढील वर्षी हिमाचलसह तेलंगणातही निवडणूक आहे. ही दोन राज्ये पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. पण हिमाचलमधील स्थानिकचे निकाल पक्षाचे टेन्शन वाढविणारे ठरले आहे. एकापाठोपाठ एक राज्य हातातून निसटत असताना आता हिमाचलमध्येही पक्षविरोधी लाट असल्याचे चित्र आहे.
मागील काही महिन्यांपासून देशात जेन झीचे वारे वाहत आहे. पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी हे जेन झीला आकर्षित करण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. पण केवळ त्यांच्या भरवशावर सत्ता काबीज करणे शक्य नाही, याची जाणीव करून देणारे हिमाचलमधील निकाल आहेत. राहुल गांधी यांच्यासह स्थानिक नेत्यांनाही जीवाचे रान करावे लागेल.
भाजपसारख्या महाशक्तीसमोर लढताना एकहाती लढा देणे काँग्रेसला शक्य नाही. संघटनात्मक ताकद उभी करावी लागेल. त्यासाठी छोट्या कार्यकर्त्यांपासून बड्या नेत्यांपासून झोकून देत काम करावेच लागेल. अन्यथा हिमाचल, तेलंगणा, कर्नाटकही हातून जाईल, हे निश्चित.
महापालिका महापौर - ४
भाजप - ३
काँग्रेस - १
जिल्हा परिषद अध्यक्ष - ११
भाजप - १०
काँग्रेस - १
नगरपालिका अध्यक्ष - ९२
भाजप - ५७
काँग्रेस - २९
अपक्ष - १
ग्रामपंचायत सरपंच - ३७५८
भाजप - २३७२
काँग्रेस - १३८७
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.