Marathwada Politics News : मराठवाडा पदवीधरचे तीन टर्म सलग आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांचे कौतुक करताना परळीच्या पदवीधरांच्या मेळाव्यात आमदार धनंजय मुंडे यांनी एक विधान केले होते. "मराठवाड्याच्या प्रत्येक तालुक्यात येथील मातीवर हात ठेवला की त्या खाली काय दडलंय हे ओळखू शकणारे बोटावर मोजण्या इतके नेते आहेत. त्यापैकी एक म्हणजे सतीश चव्हाण. त्यांना बरोबर कोणत्या तालुक्यात माती खाली काय दडलयं हे बरोबर कळतं", असे म्हणत त्यांचा विजयी चौकार निश्चित असल्याचा दावा केला होता.
पण यंदाच्या निवडणुकीत मराठवाड्याच्या मातीत काय दडलयं हे न कळाल्यामुळेच सतीश चव्हाण यांचा पराभव झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर गेली अठरा वर्ष एकहाती वर्चस्व गाजवलेल्या महायुतीचे सतीश चव्हाण यांचा विजयी चौकार अखेर हुकला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी परफेक्ट नियोजन करत सतीश चव्हाण यांचा करेक्ट कार्यक्रम केला.
तीन निवडणुका सहज जिंकल्यामुळे प्रचंड ओव्हर काॅन्फिडन्समध्ये राहिलेल्या सतीश चव्हाण यांची यंत्रणा यावेळी कोलडमडून पडली. निवडणुक प्रचारातील आघाडी, ७६ तालुके, आठ जिल्ह्यात पदवीधरांपर्यंत पोहचण्याच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर आणि सर्वाधिक मतदारांची नोंदणी झालेली असतानाह सतीश चव्हाण यांचा झालेला हा पराभव त्यांच्यासाठी निश्चितच धक्कादायक म्हणावा लागेल.
महायुतीचे उमेदवार असले तरी त्यांना मित्रपक्षांचा काडीचा फायदा झाला नाही. स्वतः सतीश चव्हाण यांना मित्रपक्षांकडून काही अपेक्षा नव्हत्या. म्हणूनच सगळी प्रचार यंत्रणा चव्हाण यांनी आपल्या प्रचलित पद्धतीनेच वापरली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट, २०२० मध्ये ज्यांनी सतीश चव्हाण यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर वाहिले, तेच यावेळी त्यांच्याविरोधात उभे होते.
सतीश चव्हाण यांची बलस्थाने, कुमकुवत बाजू माहित असलेले मराठवाड्यातील नेते माजी मंत्री राजेश टोपे, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांनी आपापल्या भागात नाकेबंदी केली. धाराशीव या आपल्याच जिल्ह्यात सतीश चव्हाण यांना फटका बसला तिथे इतर जिल्ह्याबद्दल न बोललेच बरे. बीड जिल्ह्यात प्रचार करताना निवडणूक बॅनरवर गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे यांचे फोटो न छापणे, त्याचे सोशल मिडियावरून झालेले राजकारण याचाही फटका सतीश चव्हाण यांना निवडणुकीत बसला.
सतीश चव्हाण, धनंजय मुंडे यांची मैत्री किती घनिष्ठ होती हे मुंडे यांनी परळी आणि बीडच्या पदवीधरांच्या मेळाव्यातून भरभरून सांगीतले. शिवाय सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही छत्रपती संभाजीनगर येथे मुंडे आवर्जून उपस्थित होते. सतीश चव्हाण यांच्या पराभवानंतर आता सोशल मिडियावर हे फोटो व्हायरल करून या फोटोमुळेच सतीश चव्हाण पराभूत झाले, अशी ट्रोलिंग सुरू झाली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कट्टर सहकारी असलेल्या वाल्मीक कराडचे नाव आल्यापासून अजित पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारापासून विशेषतः बीड आणि मराठवाड्यात त्यांना दूरच ठेवले होते. या उलट सतीश चव्हाण धनंजय मुंडे यांना प्रचारात सोबत घेऊन मतदारांना आवाहन करत होते. याचा फटकाही त्यांना बसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.