Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
विश्लेषण

Abdul Sattar News : अब्दुल सत्तार यांचा 'कही पे निगाहे कही पे निशाणा..'

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा खासदार दिवंगत माणिकराव पालोदकर यांचा काल जन्मशताब्दी सोहळा सिल्लोड मध्ये साजरा करण्यात आला. राज्याचे अल्पसंख्यांक विकास व पणन मंत्री तथा सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी या विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते.

अब्दुल सत्तार हे माणिकराव पालोदकर यांना आपले राजकीय गुरू मानतात. त्यामुळे सध्या शिवसेनेत असले तरी सत्तार यांनी आपल्या राजकीय गुरूंची आठवण ठेवत त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत त्यांना आदरांजली वाहिली. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा माणिकराव पालोदकर यांनी विजय मिळवत प्रतिनिधित्व केले होते. याच काळात ते मंत्रीही होते. त्याआधी 1971 मध्ये त्यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून दिल्लीत प्रतिनिधित्व केले होते.

काँग्रेसमधील अशा जेष्ठ नेत्याचा विसर काँग्रेस च्या नेत्यांना पडला असला तरी शिवसेनेत मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी मात्र आठवणीने माणिकराव पालकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार आणि या निमित्ताने विविध उपक्रम घेत कृतज्ञता व्यक्त केली. अब्दुल सत्तार यांचा मुळात राजकारणातील प्रवेशच माणिकराव पालोदकर यांच्या छत्रछायेखाली झाला.

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून सत्तार यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघावर आपली एक हाती हुकूमत कायम राखली आहे. ग्रामपंचायत ,पंचायत समिती, नगरपरिषद व विधानसभा अशा सर्वच क्षेत्रावर वर्चस्व ठेवत सत्तार यांचे राजकारण सुरू आहे. मतदारसंघावरील मजबूत पकडीमुळे त्यांनी पक्षांतर केले तरीही मतदारांनी त्यांना निवडून दिले. सत्तार सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला होता. याच पक्षाकडून ते विधानसभेवर निवडून गेले मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या बंडामध्ये सत्तार सहभागी झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्या या बंडाचा कुठलाही विपरीत परिणाम मतदार संघावर किंवा सत्तार यांच्या वैयक्तिक राजकारणावर झाला नाही.

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत अब्दुल सत्तार यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दिवंगत माणिकराव पालोदकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या आयोजनामागे सत्तार यांची दूरदृष्टी असल्याचे बोलले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी आपले राजकीय मित्र माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात भूमिका घेतली.

काँग्रेस महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांना उघड मदत करत सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे सहाजिकच दानवे यांनीही आता अब्दुल सत्तार यांच्या विरोधात दंड थोपटत त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा विडा उचलला आहे. अशावेळी कुठलीही जोखीम न घेता सत्तार यांनी मतदारसंघात सोशल इंजीनियरिंग सुरू केले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर म्हणजेच मराठा (Maratha) आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरला. मराठवाड्यातील आठ पैकी सात लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. काळाची ही पावले ओळखत अब्दुल सत्तार यांनी आतापासूनच सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. 2019 च्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांना मराठा आरक्षण लढ्याचा फटका काही प्रमाणात बसला होता.

माणिकराव पालोदकर यांचे चिरंजीव प्रभाकर पालोदकर यांनी याच मुद्द्यावरून अब्दुल सत्तार यांना जोरदार टक्कर दिली होती. मात्र यावर मात करत सत्तार यांनी पालोदकर यांच्यावर 23 हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. सत्तार यांना त्यावेळी एक लाख 23 हजार 383 म्हणजेच 51.75% मतदान झाले होते. तर त्यांच्या विरोधात लढलेले प्रभाकर पालोदकर यांना 99002 म्हणजेच 41.52% इतकी मते मिळाली होती.

मराठा आरक्षणाचा लढा तीव्र असताना कुठल्या पक्षाचा झेंडा हाती न घेता अपक्ष लढत पालोदकर यांनी सत्तार यांना रोखण्याची खेळी केली होती. मराठा असल्याचा तेव्हा पालोदकर यांना चांगला फायदाही झाला, मात्र केवळ मराठा मतांवर अवलंबून राहिल्यामुळे पालोदकर पराभूत झाले.तर सत्तार यांनी आपले राजकीय कौशल्य पणाला लावत प्रचार यंत्रणा राबवली आणि एक मराठा लाख मराठा या वातावरणातही आपली आमदारकी कायम राखत विजयाची हॅट्रिकही साधली.

2019 चा हा अनुभव गाठीशी असल्यामुळे सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघात यावेळी वेगळी भूमिका घेतली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले होते. सरकारला एक महिन्याची मुदत देत सध्या त्यांचे उपोषण स्थगित आहे. सरकार या विषयावर तोडगा काढू शकले नाही तर मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळी सरकार विरोधात असलेल्या नाराजीचा फटका आपल्याला बसू नये, याची काळजी अब्दुल सत्तार वाहताना दिसत आहेत.

माणिकराव पालोदकर यांना मानणारा मोठा वर्ग सिल्लोड सोयगाव मतदार संघात आहे. त्यामुळे या वर्गाला दुर्लक्षित करून निवडणूक जिंकता येणार नाही याची जाणीव सत्तार यांना आहे. या जाणिवेतूनच सत्तार यांनी माणिकराव पालोदकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने भव्य सोहळ्याचे आयोजन करत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. सत्तार यांच्या या आयोजनाकडे विरोधक मात्र राजकीय खेळी म्हणून पहात आहेत.

माणिकराव पालोदकर यांची जन्मशताब्दी साजरी करत सत्तार मराठा समाजाला चूचकारु पाहत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. माणिकराव पालोदकर यांचा जन्म शताब्दी सोहळा हे तर निमित्त असून यातून सत्तार यांचे कही पे निगाहे कही पे निशाना, असेच धोरण असल्याचे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीत महायुतीने सपाटून मार खाल्ल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार मोठा राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झालेला आपला प्रासंगिक करार ते पुढे सुरू ठेवतात की मोडतात? हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जोपर्यंत आपल्यावर विश्वास आहे तोपर्यंत हा प्रासंगिक करार कायम राहील, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी धोक्याची घंटा आधीच वाजवली आहे. आता त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT