eknath khadse sarkarnama
विश्लेषण

Eknath Khadse : नाथाभाऊंकडील 'ती' सीडी, जाळ नाहीच, निघाला फक्त धूर

अय्यूब कादरी

माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी 2020 मध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यभरात खळबळ माजली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते आणि विरोधकांच्या मागे 'ईडी'चा ससेमिरा लागल्याचा तो काळ होता. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या नाथाभाऊंना त्या आधीच्या युती सरकारमध्ये मिळालेले मंत्रिपदही गमवावे लागले होते. त्यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला होता आणि ते चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते.

भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून नाथाभाऊंनी ( Eknath Khadse ) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी नाथाभाऊंनी चांगलाच दम भरत, 'कोणताही भूखंड घेतलेला नसताना माझी बदनामी करून चौकशीचा ससेमिरा लावला,' असा आरोप भाजपमधील त्यांच्या विरोधकांवर केला होता. 'कोण, किती भूखंड घेतले आहेत, हे लवकरच बाहेर काढणार,' असेही ते म्हणाले होते. 'भाजप सोडल्यामुळे आपल्या मागे ईडीची चौकशी सुरू करण्यात येईल,' असे गृहीत धरून, 'माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी काढतो', अशी धमकी त्यांनी दिली होती.

नाथाभाऊंच्या या धमकीला येत्या ऑक्टोबर महिन्याच चार वर्षे पूर्ण होतील, मात्र 'ती सीडी' काही बाहेर निघाली नाही. या 'सीडी' प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. नाथाभाऊ भाजपला ( Bjp ) नक्कीच अडचणीत आणणार, असे लोकांना वाटू लागले होते. असे असतानाही भाजप नेते मात्र निश्चिंत होते. भाजपमधील कुणी फारसे घाबरले आहे, असे वाटले नव्हते. दरम्यानच्या काळाच नाथाभाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात विविध प्रकरणांत गुन्हे दाखल झाले. या संकटांच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये जाणार असे सांगितले होते. 'आपला प्रवेश झाला आहे, मात्र राज्यातील काही नेत्यांचा विरोध असल्यामुळे भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली नाही,' असे ते म्हणाले आहेत.

नाथाभाऊंच्या सीडीला 'जमीन खा गयी या पेगाससने निगल लिया...' असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. यावर त्यांनी नुकतेच भाष्य केले आहे. 'सीडी म्हणजे मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप असे आपल्याला म्हणायचे होते. ही क्लिप मी भाजपच्या एका नेत्याला दिली होती आणि त्याने ती दिल्लीतील वरिष्ठांना दाखवली. त्या क्लिपमध्ये भाजपच्या एका नेत्याचे अश्लील चाळे चित्रित केलेले होते. मात्र, ती क्लिप नंतर गायब झाली. ज्याला दिली होती त्याच्याकडूनही गायब झाली आणि माझ्या मोबाईलमधूनही गायब झाली,' असे स्पष्टीकरण नाथाभाऊ यांनी दिले आहे. त्यामुळे वेगळाच संशय बळावला आहे. 'ज्याला ती क्लिप दिली होती, तो आता कोट्यधीश झाला आहे,' असा दावाही त्यांनी केला आहे.

केंद्रातील भाजप सरकारने विरोधकांसह स्वपक्षातील काही नेत्यांची हेरगिरी करण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये 'पेगासस मालवेअर' घुसवल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला हौता. त्यावरून देशभरात गदारोळ माजला होता. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होती, त्यावेळीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचे मोबाईल पेगाससद्वारे हॅक केल्याचा आरोप झाला होता. नाथाभाऊ म्हणतात तसे त्यांच्या मोबाईलमध्ये क्लिप होती आणि ती गायब झालेली आहे. पेगाससच्या माध्यमातून एखाद्याच्या मोबाईलमधील डेटा चोरणे किंवा तो नष्ट करणे शक्य असल्याचे सांगितले जाते. या 'सीडी'मधील त्या क्लिपवर पेगाससचा तर हल्ला झाला नसेल ना, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

या क्लिपचा विषय निघाला तो नाथाभाऊंसाठी भाजपचे दरवाजे किलकिले होत नसल्यामुळे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे काम केले. त्यामुळे रावेर मतदारसंघातून त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांच्या विजयाला हातभार लागला. दिल्लीत जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामुळे प्रवेश रखडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फडणवीस यांनी आपल्याला राज्यपाल करतो, असे आश्वासन दिले होते, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. यावरूनही कलगीतुरा सुरू झाला आहे.

त्या क्लिपचे नष्ट होणे आणि नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागणे, याचा परस्पर संबंध नक्कीच असणार आहे. ती कथित क्लिपच नष्ट झाली असेल तर नाथाभाऊंना भाजपमधील त्यांचे विरोधक घाबरतील, असे कारणच राहिलेले नाही. नाथाभाऊंनी यापूर्वीही फडणवीस आणि महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या दोघांनी मिळून भाजपमधील बहुजन नेतृत्व संपवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत, असेही ते म्हणाले होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम झाला आणि त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली. त्यांच्याकडील कथित 'सीडी'चे अस्त्रही आता नष्ट झाले आहे. हा चक्रव्यूह ते कसा भेदतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT