Eknath Shinde News : विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारीसाठी दिग्गज नेते रांगेत असताना शिंदेंनी बच्चू कडू यांच्यावर विश्वास दाखवला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. 'प्रहार'पक्षाचे प्रमुख असलेल्या बच्चू कडूंना उमेदवारी देण्यामागे एकनाथ शिंदेंची भविष्यातील रणनीती दिसून येते.
भाजपसोबत जाऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षवाढीला काही मर्यादा आहेत. आणि पक्षवाढीमध्ये त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी हा त्यांचाच मित्रपक्ष भाजप आहे. त्यामुळे आक्रमक आणि संघटन मजबूत करणाऱ्या चेहऱ्याची आवश्यकता एकनाथ शिंदेंना होती. जो चेहरा विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अपिल होऊ शकतो. आणि त्यामध्ये बच्चू कडू यांचे नाव सर्वात आघाडीवर दिसून येते.
बच्चू कडू हे मुळचे शिवसैनिक आहेत. मात्र, उमेदवारी नाकारल्याने त्यांचा स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू झाला होता. 'प्रहार'च्या माध्यमातून शेतकरी आणि दिव्यांगांसाठी आंदोलन करत त्यांनी त्यांची महाराष्ट्रभर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे त्यांचे राजकारण हे भाजपचे कट्टर विरोधक म्हणून उभे राहिले आहे.
एकनाथ शिंदेंची शिवसेना ही कोकण, मराठावडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जम बसवत आहे. मात्र,विदर्भात अजुनही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच मुख्य लढत आहे. एकनाथ शिंदेंचे दोन मंत्री विदर्भातून आहेत. त्यामध्ये संजय राठोड यांच्या मंत्रिपदाला शिवसेनेतून विरोध होता. मात्र, भाजपने त्यांच्य मंत्रिपदासाठी आग्रह धरल्याचे सांगितले जाते. जात समीकरणामुळे राठोड यांना मंत्रिपद मिळाले. मात्र, त्यांच्या मंत्रिपदाचा फायदा हा विदर्भात शिवसेनेच्या पक्ष वाढीसाठी होत नसल्याचे दिसून येत आहे.
रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांना एकनाथ शिंदेंनी राज्यमंत्रिपद दिले आहे. मात्र, जयस्वाल हे भाजपशी टक्कर घेतली, असे दिसून येत नाही. उलट त्यांचीच भाजपशी जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गूड बूकमधील मंत्री आहेत. त्यामुळे जयस्वाल यांच्या नेतृत्वात देखील शिवसेनेच्या वाढीला काही मर्यादा दिसून येतात. म्हणूनच बच्चू कडू यांची उमेदवारी ही शिवसेनेसाठी विदर्भाच्या दृष्टिने नवसंजीवनी ठरू शकते, हेच एकनाथ शिंदेंनी हेरले.
एकनाथ शिंदें सारख्या चतुर राजकारण्याला माहिती आहे की त्यांची येथून पुढची स्पर्धा ही मित्रपक्ष भाजपसोबत असणार आहे. त्यामुळे मजबुत संघटन उभे करून जे नेते आपल्यासोबत कायम राहतील, अशी फळी उभी करण्यासाठी ते प्राधान्य देत आहेत. त्यातूनच राज्यसभेला ज्योती वाघमारे यांना संधी मिळाली. तर, विधान परिषदेला बच्चू कडू यांना शिवसेनेत प्रवेश देत उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेतील अनेक नेते हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा असते. त्यामुळे संकटकाळात जे नेते आपल्यासोबत टिकून राहतील, अशा नेत्यांना ताकद देण्याचे काम शिंदे करताना दिसून येत आहेत.
विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांचे नाव जेव्हा समोर आले तेव्हा त्याला भाजपमधून विरोध करण्यात आला. त्यामध्ये कडू हे शिवसेनेचे नाहीत त्यामुळे त्यांना उमेदवारी नको, असा युक्तीवाद केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिंदे हे कडूंना उमेदवारी देण्यावर ठाम होते. खुप दिवस आधीच कडू आणि शिंदेंमध्ये चर्चा विधान परिषदेच्या उमदेवारी बाबात चर्चा झाली होती. मात्र, भाजपच्या विरोधामुळे त्यांचा शिवसेनेत प्रवेश करत त्यांना उमदेवारी देण्यात आली.
बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने प्रहार पक्षाचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. प्रहार शिवसेनेत विसर्जीत केला जाईल, अशी चर्चा होती. मात्र, प्रहार ही सामाजिक संघटना म्हणून काम करत राहिले हे बच्चू कडूंनी स्पष्ट केले आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोडांच्या जागी बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपदानंतर कडू हे आपला पक्ष शिवसेनेत विसर्जीत करायचा की नाही यावर निर्णय घेतील. सध्या तरी प्रहार शिवसेनेत विसर्जीत होणार नसल्याचेच दिसून येत आहे.
बच्चू कडू हे आक्रमक नेते आहेत. मात्र, भाजपने त्यांच्या मतदारसंघात सुरुंग लावत त्यांना विधानसभेला पराभूत केले. त्यामुळे राजकीय असित्वासाठी बच्चू कडू हे शेतकरी, दिव्यांगांचे प्रश्न घेत आंदोलन करत होते. कर्जमाफीसाठी त्यांनी मोठे आंदोलन उभे केले. मात्र, या आंदोलनाला भाजपकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी केल्याचे दिसून येते. बच्चू कडूंना हे माहिती आहे की ते भाजपच्या विरोधात फार काळ टिकू शकत नाहीत. त्यांना सत्तेच्या मदतीची गरज आहे. आणि गरज एकनाथ शिंदे पूर्ण करतील. तर, एकनाथ शिंदेंना विदर्भात पक्ष वाढीसाठी कडू यांच्या सारख्या आक्रमक नेत्याची गरज आहे जो वेळप्रसंगी भाजपला देखील शिंगावर घेईल. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या राजकीय गरजेतून कडूंच्या गळ्यात आमदराकीची माळ पडली आहे.
शिवसेनेते काही मंत्री आणि आमदार हे भाजपशी जवळीक साधून आहेत. ईडी संकट आणि भविष्यातील तरतूद म्हणून ते स्थानिक राजकारणात देखील आक्रमक भूमिका घेताना दिसून येत नाहीत. त्याचा फटका थेट पक्षाला बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी पक्ष संघटना मजबूत करत असताना नवीन नेत्यांना संधी देत भाजपशी जवळीक साधणाऱ्या नेत्यांना एकप्रकारे बच्चू कडूंच्या उमेदवारीतून इशारा दिल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.