Raj Thackeray  Sarkarnama
विश्लेषण

MNS 18th Foundation Day : मराठी पाट्या, टोलमुक्तीसाठी मनसेची वाटचाल पुन्हा एकदा खळखट्याककडे ?

MNS News: मनसे स्टाइल आंदोलन सगळ्यांना ज्ञात आहे. मराठी पाट्या, टोलमुक्तीवरून मनसेने केलेली खळखट्याक सर्वांनाच नेहमीच आठवते.

Sachin Waghmare

MNS Foundation Day Special Story : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. त्यांचं मनसे स्टाइल आंदोलन सगळ्यांना ज्ञात आहे. मराठी पाट्या, टोलमुक्तीवरून मनसेने केलेली खळखट्याक सर्वांनाच नेहमीच आठवते. टोल वाढीच्या प्रश्नावरून राज ठाकरे काही महिन्यांपूर्वी आक्रमक झाले होते. मात्र, राज्य सरकारकडून त्यांना आश्वासन देण्यात आले होते. परंतु देण्यात आलेले आश्वासन पूर्ण होताना दिसत नसल्याने राज ठाकरेंना संताप अनावर होऊन स्वतः टोल नाक्यावर उतरून त्यांनी गाड्यांसाठी वाट मोकळी करून दिल्याचे पाहायला मिळाले.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली आहे. नेहमीच त्यांनी आर या पार अशी भूमिका घेत जनतेला न्याय मिळवून दिला आहे. राज्यातील सत्ताधारी मंडळी व विरोधकांकडून एकाद्या प्रश्नांवर न्याय मिळत नसेल तर ते सरळ राज ठाकरे यांच्या दरबारात जातात. त्या ठिकाणी प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न राज ठाकरेंकडून केला जातो. त्यामुळेच प्रत्येकांना न्याय मिळवून देणारी त्यांची भूमिका राहिली आहे.

मनसेची स्थापना 9 मार्च 2006 रोजी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी झाली. त्यामुळे जनतेच्या प्रत्येक प्रश्नांवर मनसेकडून आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून दिला जातो. सर्वसामान्य मराठी माणसांवर अन्याय होऊ नये, अशीच भूमिका त्यांनी पक्ष स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून घेतली आहे. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळवून देण्यात ते धन्यता मानत असल्याने सर्वसामान्याचे प्रश्न ते चुटकीसरशी सोडवतात, अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. (MNS 18th Vardhapan Divas News)

महाराष्ट्रातील टोलप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून सातत्याने आवाज उठवला जातो. काही वर्षांपूर्वी मनसेने पुकारलेल्या आंदोलनाला मोठे यश आले होते. राज्यातील अनेक मुदत संपूनही सुरू असलेले महाराष्ट्रातील अनेक टोल नाके बंद झाले होते. आता पुन्हा एकदा मनसेने वाढीव टोलप्रश्नी आवाज उठवला आहे. काही ठिकाणी अजूनही अवाजवी टोल वसूल केला जात असल्याचा प्रकार समोर आल्याने मनसेने पुन्हा या प्रश्नांवर आवाज उठवत मनमानी पद्धतीने टोल वसूल केला जात असल्याबाबत पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधले.

लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांचे प्रस्थ वाढविण्यास हातभार लावला होता. त्याचा काँग्रेसला निवडणुकीत चांगलाच फायदा झाला होता. याचप्रमाणे टोलच्या मुद्द्यावर शिंदे व भाजप सरकारने राज ठाकरे यांचे महत्त्व वाढविण्यावर तसेच मनसेला ठाणे, मुंबईत ताकद मिळेल, या दृष्टीने पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केलेले दिसतात, असा आरोप विरोधकांकडून केला जात असला तरी त्यामध्ये काहीच तथ्य नाही.

नागरिकांनी अगोदरच रोड टॅक्स दिला असेल तर त्यांच्यावर टोलचा भार कशाला, असा रोखठोक सवाल राज ठाकरेंनी सरकारला विचारत धारेवर धरले होते. राज्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत ही त्यांनी परखड मत मांडले. टोल नाक्यांवरील असुविधांचा त्यांनी पाढा वाचला. महिलांसाठी टोल नाक्यावर शौचालय का नाही, असा सवाल त्यांनी विचारला. छोट्या वाहनांना टोलमधून वगळण्याची मागणी त्यांनी केली. एवढ्या सर्व असुविधा असताना टोल कशासाठी मागितला जातो, असा सवाल करीत सरकारलाच धारेवर धरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

टोलमुक्त महाराष्ट्राचे केवळ आश्वासन

सत्तेत येण्यासाठी सर्वच पक्षांकडून निवडणुकीपूर्वी वारंवार टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन दिले गेले होते. सरकार स्थापन केल्यानंतर मात्र टोल सुरू आणि खड्ड्यांचे रस्ते हेच नागरिकांच्या नशिबात आहे, असा हल्लाबोल करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोलवरील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अजित पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचा भाषणांचा व्हिडिओ दाखवला होता. आतापर्यंत हे सर्व पक्ष सत्तेत आले. मात्र, टोलबंद झाले नाहीत. टोल नाके हे सरकारचे उदरनिर्वाहचे साधन असून, ते बंद होणार नाहीत, असा घणाघात राज ठाकरेंनी करीत सरकारला धारेवर धरले होते.

सर्वच सरकारवर केला होता घणाघात

राज्यात सत्तेत आलेल्या सर्वच सरकारने टोलबंद केल्याचे दावे केले होते. मात्र, टोलचा सर्व रोख स्वरूपातील पैसा जातो कुठे? त्याच-त्याच कंपन्यांना टोलचे कंत्राट मिळते कसे? त्यातच रोड टॅक्सही वसूल केला जातो, असे असतानाही शहर आणि महामार्गावर खड्डेच असतात, मग या टोलचा उपयोग काय?, असे अनेक सडेतोड प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित करून तत्कालीन युती, आघाडी, महायुती, महाविकास आघाडी सरकारवर घणाघात करीत त्यांना सळो की पळो करून सोडले होते.

राज ठाकरेंनी केला होता गंभीर आरोप

टोल नाके हे सरकारचे पोट भरण्याचे सक्षम साधन आहे, असा आरोप ठाकरेंनी केला होता. टोलच्या माध्यमातून रोख पैसा जमा होतो. ते पैसे सत्ताधाऱ्यांकडे दररोज, आठवड्याला, महिन्याला येतात. त्यामुळे कुठल्याही सरकारला टोल बंद करणे परवडणारे नाही. टोल हे सरकारचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. यातून तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाहीत, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी आतापर्यंतच्या सर्व सरकारवर केला होता.

नाशिकजवळील टोल नाका मनसेनी फोडला होता

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरेंचे वाहन नाशिकजवळील टोल नाक्यावर अडवले होते. त्यांना टोल नाक्यावर अडवल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली होती. त्यामध्ये टोल नाक्याचे नुकसान झाले होते. टोल भरूनही कर्मचाऱ्याने त्यांचे वाहन अडविल्यानेच मनसेच्या सैनिकांनी तोडफोड केली होती. टोल नाके हटवण्यासाठी सुरुवातीपासून मनसेची भूमिका आक्रमक राहिली आहे, त्यामध्ये तसूभरही बदल होऊ दिला नाही.

मराठी पाट्यांबाबत केली सक्ती

टोलप्रश्नासोबतचा मनसेने मराठी पाट्यांबाबत सक्ती केली आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यात मनसे (MNS) स्टाइल आंदोलन करीत इंग्रजीमधील बोर्ड हटवले होते. त्यासोबतच महाविकास आघाडीचे राज्यात सरकार असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवर लावलेल्या भोंग्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला या प्रश्नावरून मावळ भूमिका घेण्यास त्यांनी भाग पाडले होते. याशिवाय अनेक सामाजिक प्रश्नांवर आंदोलन करीत मनसेने जनतेला न्याय हक्क मिळवून दिला आहे.

R

SCROLL FOR NEXT