Raj Thackeray, Amit thackeray  Sarkarnama
विश्लेषण

MNS 18th Foundation Day : राज ठाकरेंची पुढची पिढी मैदानात, मात्र जुने प्रश्न कायम

अय्यूब कादरी

Raj Thackeray Latest News : नेत्यांच्या भोवताली असणारे लोक चांगले नाहीत, ते नेत्याला आम्हाला भेटू देत नाहीत, पीएही चांगले नाहीत... ही सर्वपक्षीय राजकीय नेत्यांविषयी ऐकायला मिळणारी तक्रार आहे. त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही अपवाद नाहीत. त्यांनी तळागाळापर्यंत संघटनेची बांधणी केली नाही, असा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले नाही या व अशा अनेक तक्रारी आहेत. आता त्यांची पुढची पिढी, म्हणजे त्यांचे पुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत, मात्र जुने प्रश्न, जुन्या तक्रारी मात्र कायम आहेत. या तक्रारी दूर करून कार्यकर्त्यांची मने जिकण्याचे आव्हान अमित ठाकरे यांच्यासमोर उभे आहे.MNS 18th Foundation Day

जानेवारी 2020 मध्ये गोरेगाव येथे झालेल्या महामेळाव्यात अमित ठाकरे यांना राजकारणात लाँच करण्यात आले. ते राजकारणात सक्रिय झाल्यापासून त्यांचा पक्ष एखाद्या मोठ्या निवडणुकीला सामोरा गेलेला नाही. एखादा नेता यशस्वी की अयशस्वी याचे मोजमाप निवडणुकीतील यशावरून करण्याची पद्धत आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांची सध्या तरी झाकली मूठ सव्वालाखाची आहे. पक्षसंघटना बांधणीच्या पातळीवर बदल झाल्याचे दिसत असले तरी ते पुरेसे आहेत का, यावर विचार होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मनसेचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तळागाळापर्यंत पक्षसंघटनेची बांधणी करण्याच्या बाबतीत परिस्थिती कधी सुधारणार, याची त्यांना प्रतीक्षा आहे. अमित ठाकरे सक्रिय झाल्यानंतर त्यात फरक पडेल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. ते सक्रिय झाल्यामुळे तरुण पिढी मनसेकडे आकर्षित होईल, असाही विश्वास पदाधिकाऱ्यांना आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षबांधणी करण्यासाठी, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी निवडणुका Loksabha Election नसल्या तरी राज्यभरात दौरे करावे लागतात. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे लागते. कार्यकर्त्यांच्या स्थानिक अडचणी जाणून घ्याव्या लागतात. पदाधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे बळ द्यावे लागते. पक्षाचा एखादा कार्यकर्ता विधानसभेच्या निवडणुकीला थांबला आहे आणि पक्षप्रमुख त्याच्या प्रचाराला येत नाहीत, हा प्रकार कार्यकर्त्यांसाठी वेदनदायक असतो. मनसेमध्ये असे प्रकार घडलेले आहेत. अमित ठाकरे सक्रिय झाल्यानंतर या परिस्थितीत बदल होईल, असा विश्वास कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आहे. ग्रामीण भागात राज ठाकरेंच्या ( Raj Thackeray ) चाहत्यांची संख्या मोठी आहे. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांना न्यायालयीन तारखांसाठी ग्रामीम भागात जावे लागले होते. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आणि कळंब येथील न्यायालयांतही ते आले होते. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांची झालेली गर्दी आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. ही गर्दी मतांमध्ये बदलावी, यासाठी अमित ठाकरे ( Amit Thackeray ) यांना आता ठोस कार्यक्रम राबवावा लागणार आहे.MNS 18th Foundation Day

विविध समस्यांमुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात चारा, पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. राजकारण करायचे असेल तर शेतकरी आणि त्यांच्या समस्यांना डावलून चालणार नाही. मनसेने या बाबीकडे आधी फारसे लक्ष दिले नव्हते. आता अमित ठाकरे काय करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज ठाकरे यांच्या प्रेमापोटी लाभाची अपेक्षा न करता, प्रसंगी पदरमोड करून, कर्जाबाजारी होऊन अनेक कार्यकर्त्यांनी उमेदीची वर्षे मनसेसाठी दिली आहेत. अशा अनेक कार्यकर्त्यांनी आता मनसे सोडली आहे. त्यांना परत पक्षात आणून त्यांचा सन्मान करण्यासाठी अमित ठाकरे यांच्याकडे एखादी योजना आहे काय, किंवा त्यांचा तसा काही विचार आहे काय, हे पाहणे रंजक ठरणार आहे. MNS Vardhapan Divas 2024

काही मोठ्या नेत्यांभोवती ठरावीक लोकांचे कोंडाळे असते. असे कोंडाळे राज ठाकरे यांच्याभोवती आहे आणि ते आम्हाला राजसाहेबांपर्यंत पोहोचू देत नाही, अशी तक्रार कारकर्ते, पदाधिकारी करतात. ही तक्रार खरी असेल तर राज ठाकरे, अमित ठाकरे यांनी ती गांभीर्याने घ्यायला हवी. असे कोंडाळे आपल्याभोवती निर्माण होणार नाही, याची काळजी अमित ठाकरे यांना घ्यावी लागणार आहे. ठरावीक लोकांच्या गराड्यातून बाहेर पडून पक्षाची खरी ताकद असलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत अमित ठाकरे यांना पोहोचावे लागणार आहे. असे नाही झाले तर समस्या कायम राहतील. पक्षात जीव ओतायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे, या सर्वश्रुत असलेल्या बाबीची अमित ठाकरे यांना अंमलबजावणी करावी लागेल.

SCROLL FOR NEXT