MNS 18 Vardhapan Din 2024 : ...म्हणून राज ठाकरेंची झोळी रिकामीच

Maharashtra Navnirman Sena foundation day : केवळ आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर सभांना गर्दी खेचणारे राज ठाकरे हे राज्यातील एकमेव नेते आहेत. त्यांच्या सभांना गर्दी तर होते, मात्र त्याचे मतांत रूपांतर होत नाही. आज मनसेच्या स्थापनेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. विचारांना कृतीची जोड न दिल्याने या 18 वर्षांत मनसेचे एकूण 18 आमदार निवडून येऊ शकले नाहीत.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS Vardhapan Divas news : एखाद्याला चांगला, प्रभावी नेते व्हायचं असेल तर त्याच्याकडे वक्तृत्वकला असणे, भाषणाची शैली असणे ही पण एक प्रमुख अट असते. आपल्या भाषणाच्या जोरावर सभांना गर्दी खेचणारे, लोकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे सध्या राज ठाकरे हे राज्यातील एकमेव नेते आहेत, असे म्हणता येईल.

यापूर्वी ही ताकद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, भाजपचे नेते, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आदी नेत्यांकडे होती. या नेत्यांच्या सभांना गर्दीही व्हायची आणि त्याचे मतांतही रूपांतर व्हायचे. मात्र, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभांना गर्दी तर होते. मात्र, त्या प्रमाणात मते मिळत नाहीत, असे चित्र आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी मतभेद आणि तिकीट वाटपात डावलल्याच्या कारणावरून राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. 9 मार्च 2006 रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यांच्या पक्षाचे वय आज 18 वर्षे झाले आहे. मनसेची स्थापना करताना राज ठाकरे यांना अनेक बुद्धिजीवी लोकांनी सहकार्य केले होते.

राज्याच्या विकासाची ब्लूप्रिंटही राज ठाकरे यांनी तयार केली होती. उद्धव ठाकरे यांची ओळख शांत, संयमी अशी आहे. याउलट राज ठाकरे यांची ओळख आक्रमक नेते अशी आहे. राज ठाकरे आणि बाळासाहेबांच्या वकृत्वशैलीत साम्य आहे. त्यामुळे मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडे तरुण मोठ्या संख्येने आकर्षित झाले होते.

राज ठाकरे यांनी केलेले बंड लोकांनी सुरुवातीला डोक्यावर घेतले. पक्षाच्या स्थापनेनंतर 2006 मध्ये झालेल्या मुंबई (Mumbai) महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 27 नगरसेवक विजयी झाले होते. त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचे 13 आमदार निवडून आले होते. एका अर्थाने राज ठाकरे यांना मिळालेले मोठे यश होते.

मात्र, त्यांना हे सातत्य टिकवता आले नाही. त्यानंतरच्या दोन विधानसभा निवडणुकांत मनसेचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला. असे असले तरी त्यांचे भाषण ऐकायला लोकांची प्रचंड गर्दी व्हायची. मते मात्र मिळत नव्हती. त्यामुळेच कदाचित राज ठाकरे यांनी सातत्याने आपल्या भूमिका बदलल्या, मात्र त्याचा फायदा न होता उलट तोटाच झाला आणि मते न मिळण्याचा हा सिलसिला कायम राहिला.MNS 18 Vardhapan Din 2024

Raj Thackeray
MNS 18th Vardhapan Divas : मनसेचा राजकारणातील करिश्मा आजही कायम !

राज ठाकरे यांच्या पक्षाचे वय आता 18 वर्षे झाले आहे. या 18 वर्षांत त्यांना आपल्या पक्षाचे एकूण 18 आमदार निवडून आणता आले नाहीत. मनसेच्या सहा- सात वर्षांनंतर स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीने मात्र लक्षणीय कामगिरी केली आहे. राज ठाकरे यांना आपल्या विचारांना कृतीची जोड देता आली नाही. त्यांची भाषणशैली प्रभावी आहे, ते विरोधकांवर, सत्ताधाऱ्यांवर टीका करतात, ती लोकांना आवडते.

लोकांना एक हीरो लागत असतो सत्ताधाऱ्यांना, प्रस्थापितांना जाब विचारणारा. ती पोकळी राज ठाकरे यांनी भरून काढली, असे म्हणता येईल. ते सत्ताधाऱ्यांना लोकांच्या मनातले प्रश्न विचारतात, लोकांना करता येत नाही तशी त्यांची टिंगल करतात. या कारणांमुळे राज ठाकरे यांच्या सभांना अजूनही गर्दी होते. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात यश मिळवण्यासाठी हे पुरेसे नसते.MNS 18 Vardhapan Din 2024

फक्त भूमिका घेऊन चालत नाही, त्याप्रमाणे कामही करावे लागते. स्थापनेनंतर काही वर्षांतच आपला मिळालेल्या यशाने हे सिद्ध झाले आहे. राज ठाकरे यांनी याकडे दुर्लक्ष केले. राजकारण हे 24 तास करायचे असते, याचाही त्यांना विसर पडला. संघटना बांधणीकडे त्यांनी म्हणावे तितके लक्ष दिले नाही. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्ते सैरभेर झाले. अनेकांनी पक्षांतर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांची भाषणे ऐकून कार्यकर्ते चार्ज होऊन परत यायचे, मात्र त्या कार्यकर्त्यांना त्यांनी ठोस असा कार्यक्रम दिला नाही. त्यामुळे खळखट्याक, रस्त्यांवरील खड्ड्यांत बेशरमाची झाडे लावून आंदोलन करणे, यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांना काही करता आले नाही, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. काही वर्षांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते मोठ्या संख्येने भाजपमध्ये गेले. विरोधी पक्षनेते राहिलेले नेतेही भाजपमध्ये गेले. त्यावेळी विरोधी पक्षांची पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्याची संधी राज ठाकरे यांनी गमावली. मग नुसती भाषणे करून मते कशी मिळतील? भाषण ऐकायला लोकांची गर्दी होईल, मते मात्र मिळणार नाहीत.raj thackeray latest news in marathi

राज ठाकरे यांनी विसंगत वाटतील अशा भूमिका सातत्याने घेतल्या, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी मशिदींवरील भोंग्यांचा विषय हाती घेतला. परवानगी नसलेले, ठरवून दिलेल्यापेक्षा मोठा आवाज असणारे भोंगे काढले पाहिजेत, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, असे भोंगे हे फक्त मशिदींवरच असतात, असे ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न राज्यातील लोकांना आवडला नाही. सर्वधर्मीयांमध्ये मिळून-मिसळून राहणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची राज ठाकरे यांच्या अशा भूमिकेमुळे मोठी कुचंबणा झाली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मात्र राज यांनी ही भूमिका गुंडाळून ठेवली. पुन्हा कार्यकर्ते सैरभैर...

Raj Thackeray
Loksabha Election 2024 : पहाडासारख्या भास्कर जाधवांची इमोशनल पोस्ट; रविवारी काहीतरी घडणार...

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे केंद्रातील भाजपच्या सरकारविरोधात मोहीम उघडली होती. त्यावेळी त्यांचा लाव रे तो व्हिडिओ हा प्रयोग प्रचंड चर्चेत आला होता. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे त्यांनी याद्वारे वाभाडे काढले होते. राज्यातील प्रमुख शहरांत त्यांच्या सभा झाल्या आणि गंमत अशी की त्यांनी लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार उतरवला नाही. मग हा अट्टाहास कशासाठी केला, असा प्रश्न लोकांनाही आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पडला.

त्यांच्या मोहिमेविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या गेल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांची पुन्हा कोंडी झाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकच आमदार निवडून आला. सरकारविरोधात आघाडी उघडूनही लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न दिल्याने राज ठाकरे यांच्याविषयी संशय बळावला, त्यांना नुकसानही सहन करावे लागले. त्यापासूनही त्यांनी धडा घेतला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी पुन्हा भूमिका बदलली.

त्यावेळी त्यांचे चुलतबंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्याचे राज ठाकरे यांना बघवत नाही का, अशी टीका त्यावेळी त्यांच्यावर झाली. समाजात खोलवर तसा संदेशही गेला. याचा काय परिणाम होईल, हे मुंबई महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीतून समोर येईल.

(Edited by Amol Sutar)

R

Raj Thackeray
BJP News : भाजपची डोकेदुखी थांबेना! संगमनेरनंतर आता नेवासामध्ये धुसफूस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com