MNS Chief Raj Thackeray Politics Sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'ती' मोठी स्पेस गमावली नसती तर मनसेला सत्ता मिळालीही असती...

MNS Chief Raj Thackeray Politics Assembly Elections 2024: मध्यंतरीच्या काळात राज्यातील विरोधी पक्ष खिळखिळा झाला होता. विरोधी पक्षनेतेच सत्ताधाऱ्यांना मॅनेज झाल्याची परिस्थिती होती. त्यावेळी निर्माण झालेली मोठी स्पेस राज ठाकरे यांना काबीज करता आली नाही.

अय्यूब कादरी

बाळासाहेब ठाकरेंची हुबेहूब शैली, तशीच लोकांना खिळवून ठेवणारी वक्तृत्वशैली, तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ...शिवसेनेतून बाहेर पडताना राज ठाकरे यांच्याकडे ही संपत्ती होती. ती आजही आहे, मात्र ती त्यांना सत्तेच्या सोपानापर्यंत घेऊन जाऊ शकली नाही.

आजही तरुणांमध्ये राज ठाकरे यांची क्रेझ आहे, मात्र निवडणुकीच्या, सत्तेच्या राजकारणात त्यांना अपवादानेच यश मिळाले. आता काहीही करून सत्ता मिळवायचीच, असा निश्चय राज ठाकरे यांनी जाहीर केला आहे. तो पूर्णही झाला असता, मात्र ते निष्क्रिय राहिले नसते, सातत्याने भूमिका बदलल्या नसत्या आणि सक्षम विरोधी पक्षाची जागा घेतली असती तर.

शरद पवार यांची टीका

ते कधीतरी उठतात आणि बोलतात, अशी बोचरी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यावर केली होती. शरद पवार यांच्या टीकेत मोठा अर्थ दडलेला आहे. राजकारण हे आपल्या सोयीने करण्याची बाब नसते. राजकारणात टिकायचे असेल तर 24 तास सक्रिय राहावे लागते.

हे आतापर्यंत केले का?

कार्यकर्त्यांसाठी, लोकांसाठी सतत उपलब्ध राहाले लागते. हाय प्रोफाइल राहून राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत. लोकांना शक्य तेथे भेटावे लागते, त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागते, प्रसंगी त्यांच्यासोबत जमिनीवरही बसावे लागते. राज ठाकरे यांनी हे आतापर्यंत केले का? याचे उत्तर सर्वांना माहीत आहे.

शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचा उदय होऊ लागला तशी राज ठाकरे यांची धाकधूक वाढत गेली. खरेतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यानंतर राजकारणात आले होते, मात्र ते राज यांचे पुढे निघून गेले. 2003 मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष बनले आणि राज ठाकरे यांना त्यांच्या राजकारणावर येणाऱ्या मर्यादांची जाणीव झाली.

अखेर 2005 मध्ये त्यांनी शिवसेना सोडली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 2006 च्या मार्च महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यांनी मुद्दा हाती घेतला होता मराठी माणसाचा, जसा तो शिवसेनेचाही होता स्थापनेच्या वेळी. स्थापनेनंतरच्या पुढच्याच निवडणुकीत मनसेचे 13 आमदार विजयी झाले. हे राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी शुभसंकेत होते.

खड्ड्यांत झाडे लावून आंदोलन...

पुढे नाशिक महापालिकेतही मनसेची सत्ता आली. राज्यभरात राज ठाकरे यांची क्रेझ निर्माण झाली. मनसेचे तरुण कार्यकर्ते अनोख्या पद्धतीची आंदोलने करून समाजाचे लक्ष वेधून घेऊ लागले. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत झाडे लावून आंदोलन करण्याची पद्धत बहुधा मनसेच्या कार्यकर्त्यांनीच रूढ केली.

मागण्यांसाठी कार्यकर्ते झाडावर चढू लागले. तशा प्रसंगांत प्रशासनाची तारांबळ उडायची आणि मनसेच्या मागण्या मान्य केल्या जायच्या. आंदोलने करून कार्यकर्ते खटले दाखल करून घेऊ लागले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांचा समाजात सन्मान वाढला. तो सन्मान दुर्दैवाने त्यांना टिकवता आला नाही. काही कार्यकर्त्यांवर ब्लॅकमेलिंगचे आरोप झाले आणि मनसेचा आलेख घसरायला सुरुवात झाली.

या काळात राज ठाकरे यांना बाहेर पडून कार्यकर्त्यांना दिशा द्यायला हवी होती, मात्र तसे झाले नाही. ते जिल्हाध्यक्षांनाही लवकर भेटत नाहीत, अशा तक्रारी वाढू लागल्या. निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप देत नाहीत, त्यांना मदत करत नाहीत, अशीही चर्चा सुरू झाली.

नाशिक महापालिकेत पुन्हा सत्ता आली नाही, आमदारांचीही संख्याही घटली. आधी निवडून आलेल्या 13 पैकी अनेक आमदारांनी राज यांची साथ सोडली. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आपल्याकडे आहे, या राज यांच्या म्हणण्यावर लोकांनी नंतर विश्वास ठेवला नाही.

गेल्या काही वर्षांत राज ठाकरे यांनी भूमिका बदलण्याचा अक्षरशः धडाकाच लावला. 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांच्या पक्षाने लढवली नाही, मात्र राज्यभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात सभा घेतल्या.

लाव रे तो व्हिडीओ...

लाव रे तो व्हिडीओ, हा त्यांचा प्रयोग त्यावेळी खूप गाजला. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला त्याचा फायदा होईल, असे चित्र निर्माण झाले होते, मात्र झाले उलटेच. शिवसेना - भाजप युतीला 48 पैकी 41 जागा मिळाल्या. राज ठाकरे यांची भूमिक सपशेल फसली.

...भोंग्यांविरोधातील आंदोलन

दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आले. राज यांचे चुलतबंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. चुलत भाऊ मुख्यमंत्री बनला, हे आपल्याला आवडले नाही, असा संदेश समाजात जाईल, अशी भूमिका राज ठाकरे यांनी त्यावेळी घेतली.

मशिदीवरच्या भोंग्यांचा प्रश्न त्यांनी उकरून काढला, त्यासाठी आंदोलन केले, गंभीर इशारे देत उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अडीच वर्षांनंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि राज ठाकरे यांचे मशिदींच्या भोंग्यांविरोधातील आंदोलन शांत झाले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पाच वर्षांपूर्वीची भूमिका बदलली आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. निकाल लागला आणि भाजपचे केवळ 9 मिळून महायुतीचे 17 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. राज यांची भूमिका पुन्हा एकदा फसली.

स्वबळावर लढण्याची घोषणा

विधानसभेची निवडूणूक स्वबळावर लढण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. महायुतीशी त्यांनी काडीमोड घेतला आहे. राज ठाकरे यांचे भूमिका बदलण्याचे राजकारण सुरू असताना अनेक शिलेदार त्यांना सोडून गेले. त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते संभ्रमात पडले. 225 ते 250 जागा लढवून मनसेची सत्ता आणायचीच आहे, असा निर्धार त्यांनी केला आहे.

राज्यात युतीची सत्ता असताना राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते. तरीही ते भाजपमध्ये गेले. विरोधी पक्षनेते असलेले अजितदादा पवारही आता भाजपसोबत गेले आहेत. या काळात राज ठाकरे यांना मोठी स्पेस होती, कारण विरोधी पक्षांवरचा लोकांचा विश्वास उडाला होता. ती स्पेस राज ठाकरे यांनी काबीज केली असती तर, कुणी सांगावे, खरेच मनसे सत्तेपर्यंत गेलीही असती.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT