Congress News : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. अशातच आता वित्त मंत्रालयाने चिंता व्यक्त केल्यानंतर विरोधकांना हातात आयतं कोलीत मिळाले आहे.
हाच धागापकडून विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी धक्कादायक चिंता व्यक्त केली आहे. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) यावरून बोलताना पाटील यांनी भविष्यात महाराष्ट्राला अन्नधान्य मिळेल का नाही, याबाबतची चिंता व्यक्त केली आहे. कोल्हापुरात आलेल्या महापुराची पाहणी दरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.
ही लोकप्रिय योजना निवडणुकीच्या दृष्टीने केलेली आहे. वित्त विभागाने आक्षेप घेतला असेल तर वित्त विभाग कोणाकडे आहे हे सर्वांना माहिती आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. केवळ लोकप्रिय घोषणा करायच्या असा प्रयत्न सुरु आहे.
जो धक्का लोकसभेला महाराष्ट्राने दिला त्यातून सावरण्यासाठी ही घोषणा केली आहे. निवडणुकीसाठी सगळं चाललंय हे जनतेला कळालंय. रस्ता आणि जलजीवनच्या कामासाठी पैसे नाहीत. महाराष्ट्राला धान्य मिळेल की नाही अशी अवस्था निर्माण होईल. केवळ दोन महिन्यासाठी चित्र निर्माण करायचं, असा प्रयत्न राज्य सरकारचा आहे, असं म्हणत सतेज पाटील यांनी चिंता व्यक्त केली.
सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनीही पूरग्रस्त भागातील पाहणी केली. यावेळी पूरग्रस्तांनी प्रसंगाची माहिती पाटील यांना दिली. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी, ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना सानुग्रह अनुदान तात्काळ द्यावे.
एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसानग्रस्तांना मदत मिळत असते. मात्र मध्यंतरीच्या काळात शासनाने त्यात बदल करून वाढीव घोषणा केली. पण केवळ कागदी घोडे नाचवले म्हणजे झाले असे नाही. मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचली का नाही हे देखील महत्त्वाचा आहे, असे सतेज पाटील म्हणाले.
पुणे येथील घटनेवरून बोलताना,पुण्यातील खडकवासला धरणाचे पाणी सोडणार आहे याची माहिती प्रशासनाने कुणाला दिली नाही. प्रशासन देखील एकमेकांवर बोट दाखवत आहे. पाणी कुणी सोडलं हे मंत्र्याला देखील माहिती नाही. त्यामुळे नेमकं काय चाललंय हे माहिती नाही.सरकारचे आपत्तीवर नियोजन होत नाही हेच यातून सिद्ध होते. सरकारमध्ये समन्वय नाही, असेच म्हणावे लागेल.
कोल्हापूर सांगली,सातारा, पुणे त्यासोबत विदर्भात ही महापुराचा फटका बसला आहे. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाले आहे. जर केंद्राची मदत नाही आली तर महाराष्ट्रावर केंद्र सरकार राजकारण करीत आहे, असेच म्हणावे लागेल, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.