Mulshi ZP Panchayat Samiti Election  sarkarnama
विश्लेषण

Mulshi Politics : मुळशीत 64 टक्के मतदान; घडाळ्याची टीकटीक वाढणार की मशाल पेटणार? सगळेच अंदाज ठरणार फेल!

Mulshi ZP Panchayat Samiti Election : मुळशी तालुक्यात तब्बल 64 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे धक्कादायक निकाल लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Roshan More

Mulshi News: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक शनिवारी पार पडली. पुणे जिल्ह्यात तब्बल 68.35 टक्के मतदान झाले. मुळशी तालुक्यात देखील मतदानाचा उत्साह दिसून आला. तालुक्यात 63.93 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काटे की टक्कर झाल्याची चर्चा आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर निवडणूक प्रचाराचा नूर एकदम पालटून गेला होता. मोठ्या प्रचारसभेपेक्षा उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आघाडीवर दिसत होता. मात्र, जसजसा प्रचार पुढे सरकाला तशी ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तुल्यबळ लढत असल्याचे दिसून आले.

मुळशीचे आमदार शंकर मांडेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. पौड गटातून बाबा कंधारे यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारून मिलिंद वाळुंज यांना देण्यात आली. कंधारे हे बंडखोरीच्या तयारीत होते. मात्र, अजित पवारांच्या शब्दाला मान देत त्यांनी माघार घेतली होती. त्यामुळे पौड आंबटवेट गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अविनाश बलकवडे विरुद्ध मिलिंद वाळूंज यांच्यात मुख्य लढत असल्याचे चित्र आहे.

मतदानाच्या दिवशी धरणग्रस्त भागात ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक, पदाधिकारी ही मतदारांना बाहेर काढत मतदान घडवून आणत होते.तर, धरणाच्या खालील भागात राष्ट्रवादीची घड्याळ चालल्याची चर्चा आहे. त्यामुळे या हाय होल्टेज लढतीचा निकालाची उत्सुकता असणार आहे. उद्याच (सोमवार) निकाल स्पष्ट होणार आहे.

भूगाव गट आणि गणात ठाकरेंचे उमेदवार तगडे असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल पवार यांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करून भूगाव गणातून उमेदवारी मिळवली होती. अनिल पवार यांना भूगावमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.अभ्यासू, नम्र व्यक्तिमत्व ही पवार यांची ओळख या निवडणुकीत त्यांना मोठी फायदेशीर ठरल्याचे चित्र आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मतदार आणि ठाकरेंचा मतदार त्यांच्यासोबत आल्याचे देखील बोलले जात असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र दबडे यांना भूगाव गणात अनिल पवार यांच्यासोबत लढत झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आणि आमदार मांडेकर यांचा पाठींबा तसेच या गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार शांताराम इंगवले यांची असलेली ताकद यामुळे दबडे यांना देखील संधी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत.

तुतारीला अवघड पेपर?

पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्या असताना मुळशी तालुक्यात मात्र वेगळेच चित्र दिसले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात होते. भूगाव गणात दगडू कारंजावणे तर जिल्हा परिषदेसाठी महादेव कोंढरे उमेदवार होते. पौड गणात कोमल वाशिवले या उमेदवार होत्या. कोमल वाशिवले यांच्यासाठी लढत तुलनेने सोपी होती. मात्र, मुळशी तालुक्यात तुतारीसाठी अवघड पेपर असल्याची चर्चा मतदानानंतर सुरु होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT