BMC Election 2026 Sarkarnama
विश्लेषण

BMC Election Result : मुंबईत पहिल्यांदाच असं घडलं अन् सर्वात मोठे 'ते' दोन फॅक्टर फेल; फडणवीस-शिंदेंनी निवडणूक फिरवली...

BMC Result 2026, Mumbai Election Results : ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आल्यानंतर मुंबईत वारं फिरलं, अशीच चर्चा सुरू होती. दोघांनीही मराठीचा मुद्दा पुढे करत मुंबईकरांना भावनिक साद घातली होती.

Rajanand More

Mumbai Election Results : देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये भाजप ९० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २५ हून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईत महायुतीचीच सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. मुंबईत सर्वात मोठे दोन फॅक्टर फेल गेल्याने युतीला विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई महापालिकेसाठी झालेल्या २२७ जागांच्या निवडणुकीचे चित्र अगदी स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची २५ वर्षांपासूनची सत्ता महायुतीने उखडून टाकली आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत असल्याने ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत करिष्मा दाखविण्यासाठी युध्दपातळीवर हालचाली कराव्या लागणार होत्या. त्यामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर ठरला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षासोबतची युती.

ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आल्यानंतर मुंबईत वारं फिरलं, अशीच चर्चा सुरू होती. दोघांनीही मराठीचा मुद्दा पुढे करत मुंबईकरांना भावनिक साद घातली होती. ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोठी सभा घेत त्यांनी आपल्या ताकदीची झलकही दाखविली. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याआधीपासूनच भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करताना जागावाटपापासूनच रणनीती आखली होती. ठाकरेंची ताकद असलेले मतदारसंघ, उत्तर भारतीय मतदारांची संख्या असलेले मतदारसंघ हेरत त्यानुसार उमेदवारी देताना ताकही फुंकून पित अर्धी लढाई जिंकली.

ठाकरे बंधू महायुतीला जोरदार टक्कर देणार, अशीच सुरूवातीपासून चर्चा होती. पण हा सर्वात मोठा फॅक्टर फेल ठरला. ठाकरेंच्या शिवसेनेने १६० हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांना जेमतेम ६० जागा मिळताना दिसत आहेत. तर मनसेला दुहेरी आकडाही गाठता येणार नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे भाजपने जोरदार मुसंडी घेत ९० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. त्यांचा विजयी उमेदवारांचा आकडा १०० च्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंनी लढविलेल्या ९० पैकी आतापर्यंत २६ उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. शिंदे या निवडणुकीत किंगमेकर ठरले आहे. तर ठाकरेंना सत्ता गमवावी लागली आहे.

मुंबईच्या निवडणुकीत दुसरा महत्वाचा फॅक्टर होता तो काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युती. दोन्ही पक्ष एकत्र आल्याने बहुजन समाज, मुस्लिम समाजाच्या मतांची गोळाबेरीज करून चांगली मते मिळतील, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, हा फॅक्टरही निवडणुकीत सपशेल फेल ठरला आहे. या आघाडीला दुहेरी आकडा गाठतानाही नाकीनऊ आल्याचे दिसते. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये या आघाडीला केवळ १२ ठिकाणी विजय मिळू शकतो. विशेष म्हणजे वंचितला १८ ते २० जागांवर उमेदवारही मिळाले नाहीत. त्यामुळे मतदारसंघात आघाडीव अपक्षांना पाठिंबा देण्याची वेळ आली.

मनसेला सोबत घेतल्याने काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्यास नकार देत एकला चलोचा नारा दिला होता. महाविकास आघाडीत फूट पडून दोन नव्या आघाड्या या निवडणुकीत उदयास आल्या होत्या. त्यामध्ये ठाकरे बंधूंची युती काही प्रमाणात करिष्मा दाखविले, अशी सुरूवातीला चर्चा होती. पण महायुतीसमोर ठाकरे बंधूंची जादू चालली नाही. मागील निवडणुकीत मिळालेल्या ८४ जागांपर्यंतही ठाकरेंना पोहोचता आलेले नाही. तीच स्थिती काँग्रेसची. मागील निवडणुकीत काँग्रेसला ३० जागा मिळाल्या होत्या. आता वंचितसोबत आघाडी करूनही त्यांना त्याच्या जवळपासही पोहोचता आलेले नाही. त्यामुळे हे दोन्ही फॅक्टर फेल ठरले आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT