Mumbai Police file a non-cognizable case against MLA Sanjay Gaikwad after an assault incident involving a canteen employee at the MLA residence.  Sarkarnama
विश्लेषण

Sanjay Gaikwad Case : आमदार गायकवाड जे बोलले तेच घडलं, फोर्स कमी पडला अन् पोलिसांकडून मोहिम फत्ते!

Sanjay Gaikwad Booked for Assault at MLA Canteen : मारहाणप्रकरणी मुंबई पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर तीन दिवसांनंतर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तीन दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. ती अखेर पूर्ण करण्यात आली.

Rajanand More

Mumbai Police Registers Non-Cognizable Offense : मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा राडा. मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण करतानाचा त्यांचा रावडी अवतार कॅमेरात कैद झाला अन् वाऱ्यासारखा सोशल मीडियातून महाराष्ट्रभर गेला. त्यांनी या मारहाणीचे समर्थनही केले, पण हे करताना आपण त्यासाठी खूप ताकद लावली नाही, असेही म्हटले. पण गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी लावलेली ‘ताकद’ मात्र त्यांच्या कामी आली.

मारहाणप्रकरणी मुंबई पोलिसांनी गायकवाड यांच्यावर तीन दिवसांनंतर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तीन दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. ती अखेर पूर्ण करण्यात आली. पण गुन्हा दाखल करताना पोलिसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सूचक इशारा लगेच समजला असावा. मीडियाशी बोलताना फडणवीस यांनीच फोर्स, दखलपात्र, अदखलपात्र असे शब्द वापरून पोलिसांना काय निर्देश द्यायचे ते दिले होते. त्यानंतर काही वेळांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. विशेष म्हणजे गायकवाड यांनीही अदखलपात्र गुन्हा दाखल होणार, हे आधीच म्हटले होते.

काय म्हणाले होते फडणवीस?

गुन्हा दाखल होण्याच्या काही तास आधीच विधानभवनाच्या आवारात मीडियाशी बोलताना फडणवीस म्हणाले होते की, पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. त्यासाठी कुणी तक्रार करण्याची आवश्यकता नाही. दखलपात्र गुन्हा असेल तर पोलिस योग्य कारवाई करतील. काही दखलपात्र गुन्हे तर काही अदखलपात्र गुन्हे असतात. त्यानुसार या प्रकरणात कारवाई होईल. फोर्स किती यूझ केलाय, याच्या आधारवर तो गुन्हा ठरतो.

फडणवीसांच्या या विधानातील ‘फोर्स किती यूझ केलाय’ हे शब्द पोलिसांना पुरेसे ठरले. त्यानुसार पोलिसांनी गायकवाड यांच्यावर अपमानित करणे आणि मारहाण करणे, अशा किरकोळ स्वरुपाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले. जे कायद्याच्यादृष्टीने अदखलपात्र ठरतात. याचा अर्थ वकिली भाषेत सांगायचा तर गायकवाड यांचा फोर्स कमी पडला. त्यांनी लगावलेल्या ठोश्यामुळे संबंधित कर्मचारी रक्तबंबाळ व्हायला हवा होता, म्हणजे त्याची दखल घेतली गेली असती.

आमदार गायकवाड यांच्य मारहाणीचा व्हिडीओ पाहिला तर त्यामध्ये गायकवाड यांच्या एका ठोश्यानंतर संबंधित कर्मचारी जमिनीवर पडल्याचे स्पष्टपणे दिसते. गायकवाडांच्या ठोश्यामध्ये किती ‘फोर्स’ होता, हे त्यावरून स्पष्टपणे दिसते. पण तरीही दखलपात्र गुन्हा दाखल होण्याइतपत परिणामकारक तो नसावा. यामध्ये आणखी एक वकिली तर्क लावला जाऊ शकतो. आमदार गायकवाड यांचा मारहाणीचा हेतू.

शिळे जेवण किंवा आरोग्याला हानीकारक असलेले पदार्थ दिल्याने गायकवाड संतापले होते. तसे त्यांनीही म्हटले आहेच. यापूर्वीही अनेकदा तक्रारी आल्या होत्या. पण यावेळी त्यांचा संयम सुटला. म्हणून कर्मचाऱ्याला मारहाण केली. यामागे गायकवाडांचा हेतू अत्यंत ‘शुध्द’ होता. संबंधित कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका पोहचेल किंवा त्याला इजा करण्याच्या उद्देशाने ही मारहाण केली नाही. वकिली डावपेचात इथेही गायकवाड सहीसलामत सुटतात. या सगळ्या कायदेशीर बाबींचा विचार करूनही पोलिसांनी फारसा ‘फोर्स’ न लावता अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी कोर्टात एक दावा केला होता. पतीने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ नव्हे, असा धक्कादायक युक्तीवाद संबंधित वकिलाने केला अन् महाराष्ट्रात मोठा वाद झाला. सर्वच राजकीय पक्षाच्या महिला नेत्यांसह सामाजिक संघटना, राजकीय पक्षांतील इतर नेत्यांनीही या विधानावरून संबंधित वकिलाचा निषेध केला होता. त्यांची सनद रद्द करण्यापर्यंतची मागणी झाली होती. त्यांनी एका केसचा हवाला देत आपल्या विधानाचे समर्थनही केले होते. त्यांचे हे विधान आक्षेपार्ह होते कारण सामाजिक चौकट त्याला मान्यता देत नाही.

हगवणे आणि गायकवाड ही दोन्ही प्रकरणे अत्यंत वेगळी आहेत. पण सामाजिक भानाचं काय? गायकवाड यांचे कृत्य कायद्याच्या चौकटीत अदखलपात्र ठरविण्यात आले असेलही पण समाजमनाने त्याची केव्हाच दखल घेतली आहे. आमदार गायकवाड यांचे कृत्य लोकप्रतिनिधी म्हणून निंदनीय आहेच, पण त्यावर पडदा टाकणेही तितकेच निंदनीय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT