
BJP Recalls Virendra Patil’s Incident : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांनी त्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. त्यांच्याकडे सातत्याने याबाबत आक्रमक विधाने केली जात आहेत. पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनीही जागा रिक्त नसल्याचे विधान करून त्यावर पडदा टाकण्याचा प्रय़त्न केला.
दोन्ही नेत्यांनी सावध पावले टाकली असली तरी या चर्चांच्या गदारोळात सिध्दरामय्या यांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीसाठी ते दिल्लीत आले होते. पण त्यांची भेट न झाल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची चर्चा आहे. भाजपकडूनही तसा दावा करण्यात आला आहे.
राहुल यांच्या भेटीमागचे सिध्दरामय्या यांचे नेमके कारण काय, खरंच त्यांना भेट नाकारली का, तसे असेल तर त्यामागचे कारण असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यावरून भाजपला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांची पुन्हा आठवण झाली आहे. भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी सिध्दरामय्या यांचा संदर्भ देत एक्स वर एक पोस्ट केली आहे.
मालवीय यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, सिद्धरामय्या यांना दिल्लीत अपमानजनक वागणूक. राजधानीत ते एवढ्या लांबून आले होते, पण राहुल गांधींनी वेळ दिला नाही. आता भेटीशिवाय ते परत जात आहेत. गांधींनी कर्नाटकातील ज्येष्ठ नेत्याचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
राजीव गांधी यांनी किती निर्दयीपणे आजारी वीरेद्र पाटील यांची उचलबांगली गेली होती, हा इतिहास कधीच विसरला जाणार नाही. तिथूनच राज्यात काँग्रेसचे पतन सुरू झाले. आता कमकुवत सिद्धरामय्या यांना त्यांची खुर्ची घेण्यासाठी आतुर असलेल्या आणि त्यांच्याविरुध्द कट रचणाऱ्या शिवकुमार यांच्या मागे लपण्यास भाग पाडले जात आहे. काँग्रेसने आणि विशेषतः गांधींनी नेहमीच कर्नाटकातील नेत्यांना तुच्छतेने वागवले. आजचे हे फक्त एक उदाहरण असल्याची टीका मालवीय यांनी केली आहे.
दिवंगत वीरेंद्र पाटील हे कर्नाटकच्या राजकारणातील एक मोठं प्रस्थ होतं. ते या राज्याचे दोनदा मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांची पहिली टर्म 29 मे 1968 ते 1 मार्च 1971 दरम्यान होती. तर 30 नोव्हेंबर 1989 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण यावेळी ते फार काळ टिकू शकले नाहीत. 10 ऑक्टोबर 1990 पर्यंतच ते या पदावर राहिले.
कर्नाटकच्या काही भागात त्यावेळी मोठ्या दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी पक्षातीलच काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची राजीव गांधी यांच्याकडे तक्रार केल्याचे बोलले जाते. पाटील यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याबाबत या नेत्यांनी राजीव गांधींना मन वळविले होते. त्यामुळे बेंगलुरू विमानतळावरच राजीव गांधींनी कर्नाटकला नवीन मुख्यमंत्री मिळतील, असे जाहीर केले होते.
पाटील यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. पण त्यानंतरही ते काँग्रेसमध्ये थांबले. मात्र, पक्षाला त्याचा मोठा फटका बसला होता. काँग्रेसपासून लिंगायत समाजाची मते दुरावली गेली. त्याचे राजकीय परिणाम आजही काँग्रेसला भोगावे लागतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या इतर नेत्यांकडूनही पाटील यांच्याबाबतीत घडलेला या प्रकाराबाबत कर्नाटकातील प्रचारसभांमध्ये वारंवार उल्लेख करण्यात आलेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.