Local Body Elections Result sarkarnama
विश्लेषण

Local Body Election Result : भाजपला खडबडून जागं करणारा निकाल; शिंदे, अजितदादांना हलक्यात घेणं नडलं?

BJP survey failure : पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला होता. त्यामध्ये भाजपला १७५ नगराध्यक्षपदावर यश मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

Rajanand More

Nagaradhyaksha election results : महाराष्ट्रातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंयायतींच्या निवडणुकींचा निकाल अखेर आज जाहीर झाला. काही ठिकाणी अद्यापही मतमोजणी सुरू असली तरी कोण निवडणूक जिंकणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यानुसार भाजपचे नगराध्यक्षपदाचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. पण निवडणुकीदरम्यान भाजप नेत्यांनी केलेले दावे, तसेच पक्षाचा अंतर्गत सर्व्हेही फोल ठरले आहेत.

निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अपेक्षित निकाल लागल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्ष निकालाचे चित्र पाहिल्यानंतर भाजपच्या पदरी काहीशी निराशाच पडल्याचे म्हणावे लागेल. साधारणपणे तीन आठवड्यांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजपला नगराध्यक्षपदाच्या २०० जागा मिळतील, असा दावा ठामपणे केला होता.

चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानुसार, राज्यात २५६ ठिकाणावर भाजप कमळावर निवडणूक लढवत होते. त्यापैकी २०० नगराध्यक्ष भाजपचे निवडून येतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला होता. पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला होता. त्यामध्ये भाजपला १७५ नगराध्यक्षपदावर यश मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

प्रत्यक्ष निकालामध्ये भाजपला २०० तर सोडाच पण १७५ च्याही जवळपास पोहोचता आलेले नाही. राज्यात भाजपचे १२० ते १३० च्या जवळपास नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही जवळपास ५० जागा एकट्या विदर्भातील आहेत. खरंतर भाजप नेत्यांनी केलेल्या दाव्याच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. त्यामुळे भाजप नेत्यांसाठी हा तसा पाहिला तर धक्काच म्हणावा लागले. भाजपचा स्ट्राईक रेट कमी राहिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व इतर नेत्यांनी बहुतेक नगरपरिषद व नगरपंचायती पिंजून काढल्या होत्या. खुद्द फडणवीस हे दररोज पाच-सहा सभा घेत होते. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत इतिहास घडविला होता. त्यानंतर राज्यपातळीवरील ही पहिलीच निवडणूक असल्याने भाजपने संपूर्ण ताकद लावली होती. मात्र, नेत्यांनी केलेल दावे फोल ठरल्याचे निकालावरून दिसते.

दरम्यान, निवडणुकीमध्ये महायुती म्हणून मोठे यश मिळाल्याचे म्हणावे लागेल. भाजप मोठा भाऊ ठरला असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना जवळपास ५५ नगरराध्यक्षांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जवळपास ४० जागा जिंकत तिसरा क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसनेही जवळपास ३४ जागा जिंकत सर्वांनाच धक्का दिला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप विरूध्द शिवसेना आणि भाजप विरुध्द राष्ट्रवादी अशी थेट लढत होती. काही ठिकाणी सर्वपक्षीय विरूध्द भाजप असाही सामना झाला. विधानसभेतील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला आहे. पण या निवडणुकीत शिंदे आणि अजितदादांच्या ताकदीला न जुमानल्याने भाजपला स्ट्राईक रेट अपेक्षित राखता आला नाही. भाजप विरूध्द शिवसेना अशा थेट लढतीत अनेक ठिकाणी शिंदे वरचढ ठरले आहेत. चंद्रकांतदादांनी कमळ चिन्हावरील उमेदवारांचा सांगितलेला आकडा गृहित धरल्यास भाजपचा स्ट्राईक रेट ५० टक्केही दिसत नाही. त्यामुळे हा निकाल भाजपसाठी खडबडून जागं करणारा, असाच म्हणावा लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT