Nagpur farmer protest : प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा माजी मंत्री बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून, 'स्थानिक'पूर्वी 'योग्य टायमिंग' साधल्याचं विश्लेषण राजकीय तज्ज्ञ करू लागले आहेत. सत्तेत असल्याने बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती संघटना, काहीशी खिळखिळी झाली होती. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनात, वर्षभरापासून सातत्य ठेवल्याने सत्ताधाऱ्यांविरोधात मराठवाडा आणि विदर्भात काहीशी लाट निर्माण होऊ लागली आहे.
बच्चू कडू यांच्या आता 22 मागण्यांपैकी काही मागण्या मान्य जरी झाल्या, तर त्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत 'प्रहार'ला होईल, असे राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्ष नेतृत्वांच्या दौऱ्यात गुंतल्याने बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे महाग पडू लागलं आहे. शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू जबरदस्त लढाई लढताना, 'प्रहार' आणखी मजबूत केली आहे. पदाधिकाऱ्यांनी देखील 'मौके पे चौका', या भूमिकेत या आंदोलनात स्वतःला झोकून देत, अधिक ताकद भरली आहे. आंदोलनामुळे 'प्रहार'च्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोश निर्माण झाला असून, काहींनी 'स्थानिक'साठी गणितं देखील आखायला सुरूवात केली.
सत्ताधारी पक्ष नेतृत्वांच्या दौऱ्यात बिझी असतानाच, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप (BJP) महायुती सरकार स्थापन होण्यापासून बच्चू कडू आक्रमक झाले. यासाठी त्यांनी सुरूवातीला राज्यातील काही भागात दौरे केले. यात्रा काढल्या. यानंतर बेमुदत उषोषणाचे हत्यार उपसले. या आंदोलनाला विरोधकांनी देखील पाठिंबा मिळाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने पाठिंबा देताच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने देखील पाठिंबा दिला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावेळी चर्चा करून, मागण्यांवर कार्यवाहीचं आश्वासन दिलं. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागं घेण्यात आलं.
आंदोलन मागे घेतल्यानंतर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचे मागण्यांवर सरकारबरोबर पत्रव्यवहार सुरू राहिले. परंतु अपेक्षित, असा प्रतिसाद मिळत नसल्याने बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांग यांच्या मागण्यासंदर्भात राज्यात यात्रा काढल्या. यातच राज्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला. शेतकऱ्यांच्या अक्षरशः शेत जमिनी वाहून गेल्या. भाजप महायुती सरकारने मदतीचे आश्वासन दिले. दिवाळी गोड करणार असल्याचे म्हटले. परंतु जाहीर केलेली मदत वेळेवर पोचू शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 'काळी दिवाळी' केली. काही ठिकाणी आता जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या वाहनांवर हल्ले सुरू आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे राज्यात वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. यात बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती संघटना कोणाच्या बाजूने, याची चर्चा आहे. परंतु बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगासाठी सुरू केलेल्या आंदोलनावरून 'एकला चलो'ची भूमिका अप्रत्यक्षपणे अधोरेखित केल्याचे दिसते. यात्रा, आंदोलन, बेमुदत उपोषण आणि आता नागपूरमधील महाएल्गार मोर्चा, यात बच्च कडू यांचा 'प्रहार' स्वतंत्र असल्याचे अधोरेखित झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर बच्चू कडू यांनी महाएल्गार मोर्चानं जाम केलं. या मोर्चातून शेतकऱ्यांच्या मागण्या साध्य असलं, तरी राजकीय 'इप्सित'ही साध्य केलं. राज्यभरातील शेतकरी नागपूरमध्ये जमवला. 'प्रहार'चा पदाधिकारी एकत्र आणला. एवढचं काय मनोज जरांगे पाटील यांनी देखील शेतकऱ्यांसाठी दोन नोव्हेंबरला आयोजित केलेल्या बैठकीची तारीख बदलवली.
या मोर्चाला सुरूवातीलाच काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. याशिवाय अजित नवले आणि रविकांत तुपकर, यासारखे शेतकरी नेते देखील आंदोलनात सहभागी करून घेतलं. या मोर्चाचा थेट नागपूरच्या सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू सहकारी मंत्री गिरीश महाजन यांनी बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधून, त्यांना आणि त्यांच्या सहकारी आंदोलकांना मुंबई चर्चेस बोलवलं. परंतु बच्चू कडू यांनी सरकारचा हा निरोप धुडकावून लावला आहे. हे बळ आगामी 'स्थानिक'साठी पुरेसं ठरतं, असे विश्लेषकांचं निरीक्षण आहे.
बच्चू कडू यांनी सरकारचा हा निरोप धुडकावताच, आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी आणि 'प्रहार'चे पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले अन् 'रेल्वे रोको'चं हत्यार उपसलं. बच्चू कडू यांनी आपल्या 22 मागण्या आहेत. ते मागण्या मान्य होईपर्यंत मागं हटणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 'युद्धात पण जिंकायचं अन् तहात देखील जिंकायचं', असा निर्धार बच्चू कडूंनी केला आहे. त्यांची ही भूमिका म्हणजे, शेतकऱ्यांपासून ते दिव्यांगांपर्यंत आणि सर्वसामान्यांपासून ते बेरोजगारापर्यंतच्या आहेत. त्यामुळे सरकारची कुठेतरी कोंडी करण्यात बच्चू कडू या आंदोलनाच्या माध्यमातून यशस्वी झाल्याचे निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी नोंदवत आहेत.
बच्चू कडू यांनी या आंदोलनातून काय साध्य केलं आहे, तर राज्यात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची बांधणी साधली, प्रहार जनशक्ती संघटनेला पायाभरणी अधिक मजबूत करून घेतली. महाविकास आघाडीत असताना, बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळालं होते. पुढे शिवसेना फुटली. त्यावेळी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. तिथं सत्तेत होते. परंतु त्यांचं मंत्रिपद हुकलं. तेव्हापासून ते सत्ताधाऱ्यांवर नाराज होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात नेहमीच भूमिका घेतली. यातून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाविषयी देखील सहानुभूतीपूर्वक बोलले. शिवसेना पक्ष चोराला नव्हता पाहिजे, चिन्हं नव्हत घ्यायला पाहिजे, असे त्यांनी थेट विधान केल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यातच लोकसभा निवडणुकीत ते आणि त्यांची 'प्रहार' संघटना तटस्थ राहिली. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. खातंही उघडता आलं नाही. सत्तेत राहिल्याचा फटका संघटनेला बसल्याची कुठेतरी अनुभूती बच्चू कडू यांना झाली. यातून त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यावर निवडणुकीनंतर भर दिला.
विधानसभा निवडणुकीतील परभवानंतर प्रहार संघटनेमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचा रास्ता पकडला. ही गळती रोखण्यासाठी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन हाती घेतलं. तसंच दिव्यांगाच्या मानधन वाढीसाठी आंदोलन सुरू केलं. यातच दिव्यांगांच्या महिन्याचा मानधनात एक हजार रुपयांची वाढीची मागणी मान्य झाली. हे बच्चू कडू याचं यश! पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू ठाम राहिले. यासाठी त्यांचे आता दुसऱ्यांदा आंदोलन सुरू आहे.
बच्चू कडू यांनी राज्याची उपराजधानी तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेला नागपूरलाच घेरलं. या आंदोलनावर काय तोडगा निघेल तो निघेल. परंतु 'स्थानिक'च्या अनुषंगाने बच्चू कडू यांनी पक्ष संघटनेची मजबूत पेरणी केल्याचं निरीक्षकांचे निरीक्षण आहे. या आंदोलनानंतर बच्चू कडू 'स्थानिक'साठी जुळवाजुळव कशी करतात? सत्ताधारी आणि विरोधकांशी कशी 'डिल' करतात? याकडे आता लक्ष असेल!
शेतकऱ्याला जात नसते, त्याची जातपात शेतजमीन आणि पिक असतं. त्यामुळे राज्यात आरक्षणाच्या लढाईवरून सर्व जातींचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मैदानात उतरले आहे. परंतु तिकडं न जाता, बच्चू कडू यांनी या आंदोलनामागे शेतकरी निवडला. दिव्यांग निवडला, बेरोजगार निवडला, या आंदोलनाद्वारे आपल्याभोवती सर्वसमावेशक, अशी ताकद निर्माण करण्यावर बच्चू कडू जाणीवपूर्वक भर दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.