Nana Patole  Sarkarnama
विश्लेषण

Leader of Opposition: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला जाणार; विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित होणार

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : राष्ट्रवादीतील फुटीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे आले. मात्र, विधीमंडळाचे पावसाळी अधिवशेन संपत आले तरी अजूनही काँग्रेसचा विरोधी पक्षनेता ठरलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज (ता. ३१ जुलै) दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विरोधी पक्षनेतेपदाचे नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीतून कोणाचे नाव जाहीर होते, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे. (Congress state president Nana Patole will go to Delhi; name of the Leader of Opposition will be decided)

अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३० ते ३५ आमदार हे शिवसेना-भाजप युती सरकारसोबत सत्तेत गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार हे काँग्रेसकडे उरले आहेत. काँग्रेस (Congress) पक्षाचा विरोधी पक्षनेता होणार, हे आता स्पष्ट झाले असून महाविकास आघाडीतही एकमत झाले आहे. फक्त ती व्यक्ती तथा आमदार कोण हे अद्याप निश्चीत झालेले नाही.

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचे अनेक आमदार शर्यतीत आहेत. अगदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यापासून यशोमती ठाकूर, सुनील केदार, संग्राम थोपटे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, आतापर्यंत एका नावावर एकमत होऊ शकलेले नाही. कॉंग्रेस पक्षात धोरणात्मक निर्णय दिल्लीत होतात. काँग्रेस पक्षश्रेष्ठी ते निर्णय घेतात. त्यांची भेट घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे आज दिल्लीला जाणार आहेत.

नाना पटोले दिल्लीत वरिष्ठ नेत्यांसोबतच हायकमांडशी विरोधी पक्षनेत्याच्या नावावर चर्चा करणार आहेत. सोबतच राज्यातील इतर प्रश्न आणि राजकीय घडामोडीवरही या वेळी उहापोह होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाला आज आणि उद्या सुटी असल्याने त्यांची ही दिल्लीवारी होत आहे. त्यात विरोधी पक्षनेत्याचे नाव फायनल होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून विरोधी पक्षनेत्याचे नाव फायनल झाल्यानंतर येत्या बुधवारी (ता. २ ऑगस्ट) अधिवेशन सुरू झाल्यानंतर ते जाहीर होईल. त्यानंतर राज्याला नवा विरोधी पक्षनेता मिळले. आता काँग्रेसश्रेष्ठी जुन्या आमदारांना संधी देणार की तरुण आमदाराच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ घालणार याची उत्सुकता राज्याला लागून राहिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT