मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी (NCB) अधिकाऱ्याकडून त्यांना आलेलं पत्र आज उघड केलं आहे. त्यामध्ये एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पत्रामध्ये सुरूवातीलाच सध्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त व तत्कालीन एनसीबी प्रमुख राकेश अस्थाना (Rakesh Asthana) यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना सांगून अस्थाना यांनी वानखेडे यांना एनसीबीमध्ये आणल्याचा दावा करण्यात आला आहे.
मलिकांनी हे पत्र एनसीबीच्या अधिकाऱ्यानं दोन दिवसांपूर्वीच पाठवल्याचा दावा केला आहे. त्यांच्यासह हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक दिलीप वळसे पाटील, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनाही पाठवण्यात आलं आहे. मलिक यांनी हे पत्र आज ट्विटरवर टाकलं आहे. या पत्रामध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आलं आहे. यामध्ये एनसीबीने आर्यन खानसह गुन्हे नोंदवलेल्या इतर 26 प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे.
नवाब मलिक यांनी या पत्राच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली आहे. या पत्रातील सत्यतेबाबत एनसीबीकडून चौकशी झाल्यास सत्य समोर येईल. कोणताही कार्यरत अधिकारी आपल्याच कार्यालयातील माहिती उघड करताना नाव जाहीर करत नाही. त्यामुळे या पत्रावर विश्वास ठेवावा लागेल, असंही मलिक म्हणाले. एनसीबीला वानखेडे यांची चौकशी करताना या पत्राची मदत होईल. एनसीबी महासंचालकांना हे पत्र दिले जाईल, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.
काय म्हटलंय पत्रात?
अधिकाऱ्यानं पत्रात म्हटलं आहे की, मी एनसीबीचा एक कमर्चारी असून मागील दोन वर्षांपासून मुंबई कार्यालयात कार्यरत आहे. मागील वर्षी एनसीबीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्जशी संबंधित चौकशी सोपवण्यात आली त्यावेळी तत्कालीन महासंचालक राकेश अस्थाना यांनी एसआयटी स्थापन केली. कमल प्रीत सिंह मल्होत्रा यांना त्यांनी बनवत मुंबईत या प्रकरणाची चौकशी सोपवली.
त्याचवेळी महसूल विभागात कार्यलत असलेले समीर वानकेडे यांना अस्थाना यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगून बेकायदेशीरपणे एनसीबीमध्ये विभागीय संचालक या पदावर आणलं. अस्थाना यांनी वानखेडे व मल्होत्रा यांना साम, दाम, दंड या मार्गाने बॉलीबूड कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यानुसार काम सुरू केले. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांनी कलाकारांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली, असे आरोप पत्रात करण्यात आले आहेत.
या पत्रामध्ये संबंधित अधिकाऱ्याने वानखेडे यांनी अनेक निर्दोष लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं असल्याचं म्हटलं आहे. खोट्या प्रकरणांसाठी त्यांनी वेगळी टीम तयार केली असल्याचे सांगत या टीममधील अधिकारी व कमर्चाऱ्यांची नावेही पत्रात देण्यात आली आहेत. एखाद्या प्रकरणात कमी ड्रग्ज मिळाले तर ते वाढविले जाते. लोकांच्या घरी तपासणी करून ड्रग्ज एनसीबीचे कमर्चारीच ठेवतात आणि लोकांना अडकवतात. एनसीबीच्या कार्यालयातच खोटे पंचनामे तयार केले जातात, असे आरोप पत्रात करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.