NCP Sunil Tatkare sunetra pawar sarkarnama
विश्लेषण

NCP Politics : सुनील तटकरेंना हटवण्यासाठी राष्ट्रवादीतूनच लागली तगडी फिल्डिंग? टप्प्या-टप्प्याने घडतायत घडामोडी

NCP Sunil Tatkare : पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर आणि नेतृत्वावर ताबा मिळवण्यासाठी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे हालचाली करत असल्याच्या चर्चा झाल्या आणि राष्ट्रवादी अंतर्गत तटकरे, पटेलांच्या विरोधात नाराजी निर्माण झाली.

Roshan More

NCP News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे चित्र आहे. माध्यमांनी रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी पाच ते सहा तास सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची बैठक झाल्याचे वृत्त दिले. या वृत्तात प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याचा सल्ला दिल्याने म्हटले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

त्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडावे, अशी मागणी केली. तर, प्रवक्ते उमेश पाटील यांनी देखील ट्विट करत सुनील तटकरेंचे नाव न घेता त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या अचानक निशाण्यावर आले नाहीत. त्यामध्ये वेगवेगळी कारणे असल्याचे दिसून येत आहेत.

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका मोठ्या दिशाहीनतेतून आणि अंतर्गत संघर्षातून जात होता. त्यावेळी पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर आणि नेतृत्वावर ताबा मिळवण्यासाठी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे हालचाली करत असल्याचे बोलले जात होते.

निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पक्षाचे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न प्रफुल पटेल यांनी केल्याचा आरोप झाला. तटकरेंची देखील त्यांना साथ होती, अशी चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला.

माध्यमांमध्ये चर्चा आहेत की, सुनील तटकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेत अर्थमंत्रिपद त्यांना मिळावे, अशी मागणी केली. याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, नंतर निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे पत्र पाठवण्यात आले त्यामध्ये तटकरे आणि पटेल यांच्या नावासमोर त्यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानंतर पटेल आणि तटकरे पक्षासाठी कसे महत्त्वाचे आहेत, याचे ट्विट देखील पार्थ पवार यांनी करत सर्व वादाला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला.

तटकरे हे भाजपधार्जिणी भूमिका घेत असल्याची चर्चा देखील राष्ट्रवादीमध्ये आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जास्त जवळ जात आहेत, तसेच स्वतःच्या फायद्यासाठी अर्थमंत्रिपद स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या. त्यातच त्यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सकारात्मक भाष्य केले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांना हटवण्यासाठी टप्प्याटप्यात कार्यक्रम रचला जात असल्याचे चित्र आहे.

तटकरे हे ओबीसी समाजातून येतात. राष्ट्रवादी काँग्रेसची मुळची जनाधार हा 'मराठा' समाजाचा आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी मराठा व्यक्तीची निवड व्हावी, अशी सुप्त मागणी पक्षात आहे. मुळ जनाधार पक्षापासून लांब जाता कामा नये, अशी पक्षातील आमदारांचे म्हणणे आहे. तटकरे यांना पार्थ पवार यांचे नेतृत्व स्वीकारण्यास जड जात असल्याचेही बोलले जात आहे.

अन् ती बातमी बाहेर आली...

प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीतील अंतर्गत माहिती मीडियाने देताना थेटप्रशांत किशोर यांनी सुनील तटकरेंना हटवण्याची मागणी केल्याचे वृत्त दिले. या बैठकीचे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच बाहेर आल्याची चर्चा आहे. अंतर्गत व्यक्तीने हे वृत्त माध्यमांपर्यंत पोहोचवत सुनील तटकरेंना सूचक इशारा दिल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर तातडीने तटकरेंनी पत्रकार परिषद घेत प्रशांत किशोर यांची सल्लागार म्हणून नेमणूक झाली नसल्याचे म्हटले. त्यांची नेममूक झाली असती तर आपल्याला माहिती असती, असे सांगितले. तर, पार्थ पवार यांनी देखील ट्विट करत हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले.

तटकरे टार्गेटवर, नेते सक्रीय

तटकरे यांच्याविरोधात पक्षातीलच काही प्रमुख पदाधिकारी बोलत आहेत. रुपाली पाटील ठोंबरे आणि उमेष पाटील यांच्यामार्फत माध्यमांमध्ये तटकरेंच्या कार्यपद्धतीवर आणि भाजपधार्जिण्या भूमिकेवर उघडपणे चर्चा सुरु झाली. उमेश पाटील हे पवार कुटुंबाचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट टाकून नाव न घेता सुनील तटकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आणि त्यांच्यावर पक्षाचे नुकसान करत असल्याचा आरोप केला.

केवळ पक्षांतर्गतच नव्हे, तर नियमितपणे विविध विषयांवर माध्यमांसमोर बोलणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातूनही तटकरे हे कसे भाजपच्या जवळ गेले आहेत, ते पक्षाचे हित सोडून स्वतःचे राजकीय अस्तित्व कसे जपतात, असे वक्तव्य केले.

तटकरेंची भूमिका वादात?

सुनील तटकरे स्वतः खासदार असताना व मुलगी आदिती तटकरे आमदार आणि मंत्री असतानाही त्यांनी मुलगा अनिकेत तटकरे यांच्या आमदारकीसाठी अट्टाहास धरला. विधान परिषदेची उमेदवारी मुलाला मिळवली. यासाठी पक्षाची ताकद असलेल्या नाशिक व रायगडचे पारंपरिक पालकमंत्रीपद, तसेच परभणी आणि सातारा-सांगली विधानपरिषदेच्या जागांवरचा दावा सोडावा लागला. यामुळे पक्षातील इतर निष्ठावंत पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष आहे.

SCROLL FOR NEXT