Hasan Mushrif 1 Sarkarnama
विश्लेषण

Hasan Mushrif : मुश्रीफांवरील महायुतीच्या नेत्यांचा कुटील डाव यशस्वी; आधी मित्राने, तर आता सहकाऱ्यांनी केला गेम

NCP Minister Hasan Mushrif Washim Guardian Minister political Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम पालकमंत्रिपदाचा राजीनामा देण्यामागचे राजकारण कोल्हापूरमध्ये चर्चेत आले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Politics : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. एकीकडे मोठा अनुभव सोबती असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडेल, अशी चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डाव साधत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनाच कोल्हापूरचे पालकमंत्री पद दिले. तर हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर पासून 800 किलोमीटर असलेल्या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री देऊन त्यांची राजकारणात आणखीन गोची केली.

महाविकास आघाडीतील नेत्यांबरोबर असलेला घरोबा हा त्यांच्याच महायुतीतील सहकाऱ्यांनी वरिष्ठांना पटवून दिल्याने त्याचा फटका मुश्रीफ यांना बसला. वारंवार नाराजीची भूमिका देखील मुश्रीफ यांनी घेतली. अखेर आठवड्याला 800 किलोमीटरचा दौरा करून दमलेल्या मंत्री मुश्रीफ यांना वाशिमच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडावे लागले. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मात्र त्यांच्याच मित्र पक्षातील सहकाऱ्यांचा कुटील डाव यशस्वी झाला आहे.

मुश्रीफ यांच्यावर पालकमंत्री पदाबाबत झालेला कुरघोडीचा डाव हा त्यांना नवा नाही. यापूर्वी देखील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. मात्र या प्रयत्नात त्यांचे मित्र काँग्रेसचे (Congress) नेते आमदार सतेज पाटील यशस्वी झाले. कोल्हापूरचे पालकमंत्री पद सतेज पाटील यांना मिळाले. तर ग्रामविकास मंत्री म्हणून राहिलेले हसन मुश्रीफ यांना तत्कालीन वेळी अहमदनगर सध्याचे आहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळावे अशी आशा मुश्रीफ यांना होती. पण या ठिकाणी त्यांना अपयश आले. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्न सोडवण्याबाबतची भूमिका मुश्रीफ यांनी घेतली होती. त्यात ते यशस्वी देखील झाले.

राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार आल्यानंतर मुश्रीफ यांचे स्वप्न सत्यात उतरले. केवळ अकरा महिन्याचे का असेना? कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ विराजमान झाले. राज्यात महायुती म्हणून सरकार चालवत असताना मुश्रीफ यांचा घरोबा महाविकास आघाडीचे नेते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबतच राहिला. गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, बिद्री यासह सहकारी संस्थेत मंत्री मुश्रीफ सतेज पाटील यांच्यासोबतच राहिले. त्यामुळे सहाजिकच मित्र पक्षातील नाराजी ही मंत्री मुश्रीफ यांच्यावर वाढतच राहिली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माजी खासदार संजय मंडलिक यांच्या पराभवामुळे मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा निवडणुकीत जाहीर आरोप मंत्री मुश्रीफ यांच्यावर केले.

तर दुसरीकडे राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे नेते धनंजय महाडिक यांचे कट्टर राजकीय वैरी असलेले सतेज पाटील यांच्यासोबत देखील मुश्रीफ यांचा दोस्ताना वाढल्याने त्याची देखील खदखद भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये होती. विधानसभा निवडणूक झाल्यावर मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरच्या वाटेला दोन जागा आल्या. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी मुश्रीफ यांच्यावर तर सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी प्रकाश आबिटकर यांच्यावर आली.

या दोन मंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर दावा केला. पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाला भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमधून काही प्रमुख नेत्यांनी विरोध केल्याचे सांगितले जाते. काही प्रमुख नेत्यांनी थेट वरिष्ठांपर्यंत मुश्रीफ यांच्यावर तक्रार केली. लोकसभा निवडणुकीतील यांच्या भूमिकेमुळे कोणाला आणि किती फटका बसला याची तंतोतंत आकडेवारी सह माहिती मुंबईपर्यंत पोहोचली होती. तर दुसरीकडे पालकमंत्री पद दिल्यास त्याचा फायदा कोणाला अधिक होईल? याची देखील माहिती मुंबईपर्यंत पोहोचवण्यात आली. महायुती मधील मित्रपक्षांनीच मंत्री मुश्रीफ यांच्या पालकमंत्री पदासाठी आडवा पाय घातल्याची चर्चा आज देखील जोरात सुरू आहे.

कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना संधी देण्यात आली. तर मंत्री यांना वाशिम ची जबाबदारी दिली. वाशिम ची जबाबदारी दिल्यानंतर मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली होती. "मी यावर योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यक्त होणार आहे. अजित पवार यांच्याशी याविषयी चर्चा केली असून, श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे"अशा शब्दात त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत होती.

अखेर मुश्रीफ यांनी आज वाशिमच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडले. पण वास्तविक पाहता ज्या कोल्हापुरातून ज्या मतदारसंघातून यांचे राजकारण चालू झाले त्याच भूमीतून कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी त्यांना विरोध झाल्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. शह- कटशहाच्या राजकारणाने कोल्हापूर जिल्हापासून दूर केले. पहिल्या प्रयत्नात त्यांच्यात सहकाऱ्यांचा पहिला गेम यशस्वी झाला. पण पालकमंत्री पदावर पाणी सोडल्याने सहकाऱ्यांचा कुटिल डाव देखील यशस्वी झाला. शेवटी यांनी अशा कट कारस्थान करणाऱ्यांसमोर फार पत्करावी लागली असेच म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT