Ajit Pawar, Dhananjay Munde, Sharad Pawar, Sarkarnama
विश्लेषण

Sharad Pawar Beed Sabha: धनंजय मुंडेंची बारी आलीच; शरद पवार बीडच्या आखाड्यात उतरणार

Beed News: १७ ऑगस्टला शरद पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे.

Ganesh Thombare

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील थोरल्या, धाकट्या पवारांचा भरवशाचा, हुकमी नेता म्हणजे कृषी मंत्री धनंजय मुंडे...थोडक्यात काय; तर धनंजय मुंडे म्हणजे, राजकारणातले धनूभाऊ...दोन्ही पवारांच्या जवळ असल्याने तसे धनूभाऊंच्या वाटेला कोण जात नाही. तसे विरोधी बाकांवरचे कोणी पवारांवर बोललेच, तर धनूभाऊ त्यांची गय करीत नाहीत.

थेट 'का रे'च्याच भाषेत दम भरून ते मोकळे होतात. मात्र, याच धनूभाऊंवर आता थोरल्या पवारांनी अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी 'नेम' धरला आहे. त्यासाठी पवारसाहेब थेट बीडमध्ये जाणार आहेत. तेव्हा, थोरले पवार धनूभाऊंना शब्दांनी घायाळ करणार की, अप्रत्यक्षपणे कान उपटणार, हेही पुढच्या दोन दिवसांत कळेनच.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यामुळे पक्षात दोन गट पडले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची घडी काहीसी विस्कटली. हीच कार्यकर्त्यांची फौज पुन्हा उभी करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत.

पक्षात पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांनी पहिली जाहीर सभा अजितदादांच्या गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या बालेकिल्यात अर्थात येवल्यात घेतली होती. त्यानंतर आता १७ ऑगस्टला शरद पवार बीडमध्ये सभा घेणार आहेत.

या जाहीर सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून पक्ष फुटीनंतर मराठवाड्यात पवारांची पहिलीच सभा होत असल्याने पवारांच्या निशाण्यावर अर्थातच मंत्री धनंजय मुंडे असणार आहेत. राष्ट्रवादीतील आणि मराठवाठ्यातील 'दमदार' नेता म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. अजितदादांना साथ देत धनंजय मुंडे हे देखील सरकारमध्ये सामील होत मंत्री झाले. त्यामुळे बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसला.

आता मराठवाड्यात पुन्हा पक्ष वाढवण्यासाठी शरद पवारांनी यंत्रणा कामाला लावली असून बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर या सभेची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे स्वत: देखील बीडमध्ये तळ ठोकून आहेत.

येवल्यातील सभेत मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर शरद पवारांची आता बीडमध्ये सभा होत असल्याने या सभेच्या माध्यमातून अजितदादांचा दुसरा नेता म्हणजेच धनंजय मुंडे हे शरद पवारांच्या टार्गेटवर असणार आहेत. त्यामुळे पवार काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT