Sudhir Desai  sarkarnama
विश्लेषण

सोळा वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या पराभवाचे सुधीर देसाईंनी काढले उट्टे!

कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुधीर देसाई यांचा ९ मतांनी विजय

रणजित कालेकर

आजरा (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) सुधीर देसाई यांनी भारतीय जनता पक्षाचे (bjp) जिल्हा उपाध्यक्ष तसेच बॅंकेचे विद्यमान संचालक अशोक चराटी यांच्यावर ९ मतांनी विजय मिळवला. जिल्हा बॅंक निवडणुकीच्या तोंडावर चराटी व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची झालेली युती चराटी यांना विजयापर्यंत पोचवू शकली नाही. (NCP's Sudhir Desai wins Kolhapur District Bank election by 9 votes)

या निवडणुकीत राष्ट्रवादीत उफाळून आलेला अंतर्गत कलहाचा निवडणुकीच्या निकालावर विशेष परिणाम झाला नाही. देसाई यांना विजयाची मॅजिक फिगर गाठण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे मिळालेले मोठे पाठबळ हे या निवडणुकीचा निकाल फिरवणारे ठरले. यंदा जिल्हा परिषद, पंचायत समिती, आजरा साखर कारखान्यासह प्रमुख सहकारी संस्थाच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत याचे पडसाद उमटणार असले तरी राष्ट्रवादीमधील मरगळ झटकली गेली आहे.

जिल्हा बॅंकेची निवडणुक जाहीर झाल्यावर विद्यामान संचालक चराटी यांनी ठरावधारकांचा मेळावा घेवून शक्तिप्रदर्शन केले होते. त्यांनी मेळाव्यात 61 ठरावधारक मतदार बरोबर असल्याचे जाहीर करत विजयाचा दावा केला होता. मेळाव्यापूर्वी चराटी व जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिंपी यांची युती झाली होती. जिल्हा बॅंकेसह अन्य निवडणुकांत युती एकत्र राहणार असल्याचे दोघांही नेत्यांनी जाहीर केले होते. याची पहिली रंगीत तालीम जिल्हा बॅंकेची निवडणूक ठरली. या निवडणुकीत दोन्ही नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यापाठीमागे अनेक कारणे असली तरी या दोघामध्ये झालेली युती त्यांच्या कार्यकर्त्यांना मान्य नसल्याचे निकाल पेटीतून दिसून आले आहे.

राष्ट्रवादीमध्ये गत वर्षभरापासून अंतर्गत कलह सुरु झाला आहे. याला पंचायत समिती पदाधिकारी बदल व गोकुळची निवडणुक कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे शिंपीची राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेली घुसमट जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून समोर आली. उपाध्यक्ष शिंपी यांनी समर्थक ठरावधारकांसह चराटी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सुरवातीला ही निवडणुक एकतर्फी वाटत होती. पण निवडणुक लांबणीवर पडल्यावर यामध्ये रंग भरत गेले. आजऱ्यातील एका कार्यक्रमात या युतीबाबत ‘नो कॉमेंटस’ असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी चराटी व शिंपी यांना कैचीत पकडण्यासाठी राजकीय चाली केल्या. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध राजकीय गटांना एकत्रि आणत देसाई यांचा विजय सुखकर केला. या वेळी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत तिकीटासह मदतीची ग्वाही दिली गेली असल्याचे समजते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये चराटी व शिंपी यांच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्रित येणार असल्याची चिन्ह आहेत.

निवडणूक लांबणे पिता-पुत्रांच्या पथ्यावर!

राजारामबापू देसाई यांनी 1978 मधे जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रथमच लढवली होती. या निवडणुकीत जयसिंग ऊर्फ बाळ देसाई यांचे पारडे जड होते. पण निवडणुक लांबणीवर पडल्यावर राजारामबापू देसाई 2 मतांनी विजयी ठरले होते. याची पुनरावृत्ती या निवडणुकीत दिसून आली. चराटी यांचे पारडे जड होते. पण निवडणूक लांबणीवर पडल्याचा फायदा राजारामबापू देसाई यांचे चिरंजीव सुधीर देसाई यांना झाला.

पराभवाचे काढले उट्टे!

सोळा वर्षांपूर्वीच्या (2005-06) निवडणुकीत राजारामबापू देसाई यांचा (कै) काशिनाथ चराटी यांनी पराभव केला होता. ही निवडणूक त्यांचे वारस सुधीर देसाई व अशोक चराटी यांच्यात झाली होती. या निवडणुकीत देसाई यांनी चराटी यांचा पराभव करून 16 वर्षापूर्वी झालेल्या पराभवाचे उट्टे काढले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT