Eknath Shinde-Jitendra Awhad
Eknath Shinde-Jitendra Awhad Sarkarnama
विश्लेषण

एकनाथ शिंदे-जितेंद्र आव्हाड जोडीने केले भाजपचे बालेकिल्ले उद्‌ध्वस्त!

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर मंगळवारी जाहीर झालेल्या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा खऱ्या अर्थाने सत्ताधारी शिवसेनेला (shivsena) आणि विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (ncp) बूस्टर देणारा ठरला आहे. नव्या प्रभागरचनेनुसार ठाणे शहरात सहा; तर मुंब्रा, कळवा, दिव्यात पाच नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची ताकद वाढविण्यासाठी होणार आहे. दुसरीकडे, भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात काहीसा दिलासा मिळाला असला, तरी इतर प्रभागांमध्ये केलेल्या बदलांमुळे त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (New ward structur in Thane benefits Shiv Sena-NCP; Losses of BJP)

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी नवी प्रभागरचना जाहीर झाल्याने आपल्या प्रभागाची झालेली मोडतोड आणि मतदानाचे गणित जुळवताना सर्व विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार व्यस्त झाल्याचे दिसत होते. प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर ‘कही खुशी कही गम’, अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून या सरकारमधील दोन्ही वजनदार मंत्री हे ठाण्यातीलच आहेत. याच दोन्ही नेत्यांवर ठाणे जिल्ह्यातील महापालिकांच्या निवडणुकीची जबादारी आहे. विशेष म्हणजे मंगळवारी जाहीर झालेल्या नव्या प्रभागरचनेमध्ये याच दोन मंत्र्यांच्या मतदारसंघात नगरसेवकांची संख्या वाढली आहे.

या भागात वाढणार नगरसेवक

कळवा, मुंब्रा विधानसभा मतदारसंघासह दिव्यातून यापूर्वी ४७ नगरसेवक पालिकेवर निवडून गेले होते. परंतु यंदा येथून ५२ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. यामध्ये कळव्यात २, मुंब्य्रात २ आणि दिव्यात १ अशा पाच नवीन नगरसेवकांची भर पडणार आहे. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड किंबहुना राष्ट्रवादीला ही जमेची बाजू म्हणावी लागणार आहे. ठाणे, कोपरी-पाचपाखाडी आणि अर्धा ओवळा-माजिवडा असे मिळून म्हणजेच अडीच विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी पालिकेवर ८४ नगरसेवक निवडून जात होते. त्यात आता ६ नगरसेवकांची भर पडणार असून येथून आता ९० नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत.

कळवा, मुंब्य्रातही फेरबदल

वर्तकनगर भागात एक प्रभाग यापूर्वी ३९ हजार लोकसंख्येचा होता, तो आता २४ हजार लोकसंख्येवर आला आहे. त्यातही अनेक ठिकाणी रस्त्यांची सीमा न धरता सोसायटींच्या इमारतींची सीमा धरण्यात आल्याचेही दिसत आहे. कळवा, मुंब्य्रातील प्रभागांमध्येही अनेक फेरबदल झाल्याचे दिसत आहे.

शिवसेनेसाठी जमेची बाजू

पालिकेच्या प्रभाग रचनेवर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना पडलेल्या मतांचा प्रभावदेखील दिसून आला आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी शिवसेनेला अधिकची मते मिळाली होती, नेमके त्याच मतदारसंघात नवीन नगरसेवकांची संख्यादेखील वाढणार असल्याचे दिसत असून ही सत्ताधारी शिवसेनेसाठी जमेची बाजू म्हणावी लागणार आहे.

भाजपच्या बालेकिल्ल्यांची मोडतोड

प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपापले बालेकिल्ले ‘सेफ’ केल्याचे दिसत आहे. परंतु ज्या ठिकाणी भाजपचे प्राबल्य यापूर्वी दिसून आले होते. त्या प्रभागाची मोडतोड केल्याचे दिसत आहे. येथील नौपाडा आणि कोपरीतील अनेक प्रभाग हे थेट तोडमोड करून वागळे इस्टेट पट्ट्यात वाढविण्यात आले आहेत. घोडबंदर भागातही अशाच प्रकारे प्रभागांची रचना दिसून आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा कस लागण्याची चिन्हे आहेत.

भाजप उमेदवारांचा कस लागणार

मागील निवडणुकीत चार नगरसेवकांचा एक प्रभाग होता. त्या वेळेस जी लोकसंख्या गृहीत धरण्यात आली होती, तीच लोकसंख्या आता तीन प्रभागांच्या एका पॅनेलसाठी गृहीत धरण्यात आल्याचे दिसत आहे. त्यात नव्या प्रभागरचनेमुळे त्यातील विद्यमान चारपैकी एका नगरसेवकाला दुसऱ्या प्रभागाचा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानुसार सध्याची प्रभागरचना पाहता, शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक ज्या ठिकाणी आहेत, त्यांना इतर प्रभागातदेखील निवडीचा मार्ग सुकर होणार असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे भाजपच्या प्रभागात मात्र, चौथ्या उमेदवाराला बाजूच्या प्रभागात जाताना मात्र डोकदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इथेही भाजपच्या उमेदवारांचा काहीसा कस लागण्याची शक्यता आहे.

हरकती १४ फेब्रुवारीपर्यंत घेता येणार

प्रारूप प्रभागरचनेमध्ये ज्या नागरिकांना हरकती असतील, त्यांनी आपल्या हरकती १४ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात द्यायच्या आहेत. ता. १६ फेब्रुवारी रोजी हरकती आणि सूचनांवर सुनावणीचा अंतिम तारीख २६ फेब्रुवारी आणि अंतिम विवरणपत्र निवडणूक आयोगास सादर करण्याचा अंतिम तारीख २ मार्च रोजी असणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT