Nitish Kumar, Amit Shah Sarkarnama
विश्लेषण

Nitish Kumar Resigns : शहांचे ते विधान ‘राजकीय जुमला’! भाजपला का हवेत ‘‘पलटू कुमार’ नितीश?

BJP : भाजपशी काडीमोड घेत नितीश कुमारांनी लालूंना जवळ केले होते...

Rajanand More

Bihar News : वर्षभरापुर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीशकुमारांसाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद केल्याचे म्हटले होते. शहांचे हे विधान ‘राजकीय जुमला’ ठरले आहे. पुन्हा एकदा भाजपला आठवेळा मुख्यमंत्रिपद उपभोगलेले नितीशकुमार यांना जवळ करण्याचा निर्णय घ्यावा लागला. नितीश यांची ही पाचवी पलटी असली तरीही भाजपला ते हवेसे वाटत असल्याने यामध्ये नेमके कोणते सत्तासमीकरण दडले आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागल्या आहेत. (Nitish Kumar Resigns)

नितीशकुमारांच्या (Nitish Kumar) सततच्या बदलल्या भूमिकेमुळे त्यांची बिहारमधील (Bihar) लोकप्रियता आणि निवडणुकीतील कामगिरी खालावू लागली आहे. मागील निवडणुकीत त्यांच्या संयुक्त जनता दलाला (JDU) केवळ 45 जागा मिळाल्या. त्यांच्या अधिक जागा मिळून भाजप (BJP) आणि राष्ट्रीय जनता दलाला (RJD) मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. आता पुन्हा ते एनडीएमध्ये (NDA) दाखल होत असताना नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडणार आहे. असे करून एकाच बाणात भाजपने अनेक पक्षी मारल्याचे बोलले जात आहेत.

इंडिया आघाडीला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण तापलेले असताना इंडिया आघाडीतील एक पक्ष फोडून एनडीएमध्ये आणत भाजपने मोठी खेळी खेळली आहे. नितीशकुमार हे भाजप विरोधातील आघाडीतील महत्वाचे चेहरा होते. त्यांनीच इंडिया आघाडीचा पाया रचला असेही म्हणता येईल. भाजपने तिथेच घाव घालत आघाडीला खिळखिळे करण्यात यश मिळवले आहे. नितीशकुमार आघाडीतून बाहेर पडल्याचे परिणाम इतर राज्यांमध्येही दिसू शकतात. खरेतर भाजपचे काही स्थानिक नेते पुन्हा नितीशकुमार यांना सोबत घेण्याविरोधात होते. पण केंद्रातील नेतृत्वाने लोकसभा निवडणुका आणि विरोधकांना नामोहरण करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बिहारमध्ये दुहेरी फायदा

बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची 14-15 वर्षे सत्ता होती. भाजपला त्याचा मोठा फायदा झाला. पण नितीश कुमारांच्या पक्षाच्या जागा कमी होत गेल्या. मागील निवडणुकीत भाजपला 79 जागा मिळाल्या होत्या. त्याचे कारण म्हणून नितीशकुमार यांची बिहारमध्ये बिघडत चाललेली प्रतिमा. सुशासन बाबू, विकास पुरूष ही त्यांची प्रतिमा आता ‘पलटू कुमार’ अशी बनली आहे. त्यांना 2010 च्या निवडणुकीत 115 तर 2015 मध्ये 71 आणि 2020 मध्ये 45 जागा मिळाल्या. पक्षाची ही ढासळती कामगिरी भाजपसाठी फायद्याची ठरत आहे.

मुख्यमंत्रिपदावर दावा

नितीशकुमार मुख्यमंत्री बनले तरी सत्तेतील मोठा वाटा भाजपकडे असणार हे स्पष्ट आहे. एक उपमुख्यमंत्री आणि महत्वाची पदे भाजपला मिळू शकतील. तसेच राज्यात सत्ता आल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाला फायदाच होणार आहे. नितीशकुमार यांना हाताशी धरत आधीच भाजपने आपली ताकद वाढवली आहे. पुन्हा त्यांना सोबत घेत त्यात आणखी भर टाकण्याची संधी भाजपला चालून आली आहे. नितीश यांना मात्र त्यांच्या पलटू मार प्रतिमेमुळे फटकाच बसण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा दावा अधिक बळकट होऊ शकतो. मागील निवडणुकीआधी भाजपने नितीश यांना जागा कमी आल्या तरी मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. यावेळी असे आश्वासन मिळणार नाही, अशीच सध्याची राजकीय स्थिती आहे.

नितीश कुमारच व्हिलन ठरणार

नितीशकुमार यांनी आतापर्यंत पाचवेळा पलटी मारली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते राजकीय व्हिलन ठरले आहेत. मध्य प्रदेशात कोसळलेले कमलनाथ सरकार असो किंवा महाराष्ट्रातील ठाकरे सरकार. दोन्ही ठिकाणी इतर पक्षांतील आमदारांना सोबत घेत भाजपने सत्ता मिळवली. पण बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा देत पलटी मारली. यामध्ये प्रत्येकवेळी नितीशकुमार व्हिलन ठरले आहेत. ते आरजेडीसोबत गेल्यानंतर भाजपने बिहारमध्ये पुन्हा ‘जंगल राज’ आल्याची टीका केली होती. आता ते परत आल्यानंतर ‘जंगल राज’ संपणार असल्याची भूमिका भाजप घेत आहे. राज्यातील मोठा पक्ष म्हणून आपली ही जबाबदारी असल्याचे सांगत भाजप एकप्रकारे नितीश यांनाच व्हिलन करत असल्याचे दिसते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT