Bihar Politics : नितीशकुमार यांनी आरजेडीशी संबंध तोडून बिहारमध्ये जनता दलने (युनायटेड) पहिल्यांदाच अशा प्रकारे राजकारणात धक्का दिलेला नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे वारंवार अशा प्रकारचे धक्के देत ‘ब्रेकअप’ करीत राहिले आहेत. या कुंपणावरून त्या कुंपणावर, अशी त्यांची ‘पलटूराम’ भूमिका त्यांची राहिली आहे. बिहार आणि देशाच्या राजकारणात त्यांची ही भूमिका स्पष्टपणे दिसून आली आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्रिपदाच्या किती प्रेमात आहेत, हे दिसून येते.
युद्धानंतर आता ‘राजकारणात आणि प्रेमात सर्व काही माफ असते,’ ही नवी म्हण नितीशकुमार यांच्यामुळेच तयार झाली असावी. राजकारणात सर्वाधिक कोलांटउड्या मारणारे ‘पलटूराम’ म्हणून नितीशकुमार यांची ओळख आता जनमानसात निर्माण झाली आहे. पण ही प्रतिमा असताना त्यांनी बिहारच्या प्रशासनावर जोरदार पकड निर्माण केली.
नितीशकुमार यांनी बिहारमध्ये राज्यकारभार चांगल्या प्रकारे हाताळल्याचे चित्र आहे. नव्या दमाचे तरुण नेते तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या तरुणांसोबत नितीशकुमार यांनी वारंवार राजकीय वैर घेतले. असे करताना त्यांनी भाजपाला कधी मुख्यमंत्रिपद दिले नाही. मुख्यमंत्रिपद स्वतःकडे कायम ठेवण्यात त्यांना यश आले. त्यामुळेच ते नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, जो एक विक्रम असेल.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) केवळ 18 महिन्यांत कोलांटउडी मारली आहे. 2022 मध्ये नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यासोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी ‘एनडीए’ला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपवर त्यांनी त्यावेळी जनता दल (युनायटेड) मध्ये फूट पाडल्याचा आरोप केला होता. आता त्याच भाजपसोबत नव्याने नितीशकुमार घरोबा करीत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एक ‘सेक्युलर’ चेहरा म्हणून नितीशकुमार यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे ते पंतप्रधानपदाचेदेखील उमेदवार राहिले असते. इंडिया आघाडीत भाजपविरोधात लढण्याच्या शपथ घेणारे नितीशकुमार यांची ही पाचवी कोलांटउडी असेल. काँग्रेसने 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत त्यांना कुठलेही पद न देणे ही मोठी चूक वाटत असली, तरी नितीशकुमार यांच्या अशाच ‘पलटूराम’ भूमिकेमुळे काँग्रेसने त्यांना इंडिया आघाडीत मोठे पद नाकारल्याचे चित्र घटनांवरून स्पष्ट होत आहे.
2005 मधील विधानसभा निवडणुकीपासून जनता दल (युनायटेड) नितीशकुमार यांच्या प्रतिमेभोवती फिरत आहे. भाजप नेते अरुण जेटली यांनीच 2005 मधील निवडणुकीपूर्वी नितीश यांना मुख्यमंत्री म्हणून ‘प्रोजेक्ट’ करण्याची कल्पना सर्वप्रथम मांडली आणि ती यशस्वी झाली. त्यानंतर 2005 ते 2010 दरम्यान बिहारमध्ये बदल घडवून आणत नितीशकुमार यांनी ताकदीने बळ दिले. नितीशकुमार यांनी 2005 मध्ये भाजपसोबत आघाडी करून पहिले सरकार स्थापन केले.
2013 मध्ये त्यांनी भाजपशी संबंध तोडण्यास सुरुवात केली आणि जनता दल (युनायटेड), भाजपची 17 वर्षांची युती तुटली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कारण, त्या पदासाठी तेदेखील इच्छुक होते. नितीशकुमार यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढवली, पण त्यात त्यांना मोठे यश प्राप्त झाले नाही.
2014 मध्ये निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या पडझडीची जबाबदारी घेत नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्रिपद सोडले आणि जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले. एकेकाळी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राजदच्या पाठिंब्याने ते ‘फ्लोअर टेस्ट’मध्ये टिकून राहिले. 2015 मधील विधानसभा निवडणुकीत ‘महागठबंधन’ने दणदणीत विजय मिळवला आणि नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदावर पुन्हा दावा केला. तेव्हा आरजेडीला लोकांचे बहुमत प्राप्त होते हे विशेष.
‘सीबीआय’ने लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोप केल्यानंतर नितीशकुमार यांना प्रतिमेची चिंता होती. त्यांनी 2017 मध्ये पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुन्हा ‘एनडीए’मध्ये जात मुख्यमंत्रिपद पटकावले. 2020 मधील विधानसभा निवडणुकीतही तेच झाले. बिहारमध्ये भाजपा मोठा भाऊ होत असल्याची चिंता नितीशकुमार यांना वाटू लागली. 2022 मध्ये भाजपा आणि जनता दलाची (युनायटेड) युती पुन्हा तुटली.
राजदच्या पाठिंब्याने त्यांच्या पक्षाला विधानसभेत पुन्हा एकदा बहुमत मिळाले आणि तेव्हापासून नितीश कुमार त्यांच्या मुख्यमंत्रिपदावर आहेत. रविवारी राष्ट्रीय जनता दलासोबतची आघाडी तोडत दशकात चौथ्यांदा पक्ष बदलून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा नितीशकुमार करतील. बिहारच्या राजकारणात इंडिया आघाडी असो की भाजपा सोबत युतीत, मुख्यमंत्र्यांची खुर्ची मात्र नितीशकुमार यांचीच राहिली आहे. नितीशकुमार यांच्या या वारंवार कोलांटउड्यांमुळेच ते राजकारणातील ‘पलटूराम’ म्हणून परिचित असून त्याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत बिहारमध्ये भाजपाला नक्की होण्याचे चिन्ह असून समाजवादी विचारधारेचे नितीशकुमार हे पुन्हा एकदा भाजपाच्या पाठिंब्यावर बिहारमध्ये मुख्यमंत्री होत आहेत.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.