Bihar CM latest update : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्रिपदावर असताना राज्यसभेचा अर्ज भरणारे कदाचित ते एकमेव उमेदवार असावेत. त्यांनी स्वत: सोशल मीडियातून आपली राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. पण केवळ राज्यसभेसाठी मुख्यमंत्रिपद सोडणारेही ते एकमेव नेते ठरतील. पण खरंतर हे केवळ जनतेला सांगण्यासाठी होते. नितीश कुमार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याने मुख्यमंत्रिपद सोडणे तेही शपथ घेतल्यानंतर काही महिन्यांत हे राजकीय दबाव असल्याखेरीज शक्य नाही, अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे.
नितीश कुमार हे २००५ पासून मुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे सध्या त्यांच्यासोबत असलेल्या भाजपविरोधात निवडणूक लढवूनही ते मुख्यमंत्री झाले. अनेकदा राजकीय उलथापालथ होऊनही त्यांनी आपले पद शाबूत ठेवले होते. मग यावेळीच त्यांना राज्यसभा कशी आठवली, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. विशेश म्हणजे मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या संयुक्त जनता दलाने भाजपच्या तोडीस तोड कामगिरी करत तब्बल ८५ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला ८९ जागा मिळाल्या होत्या. राज्यात पक्षाची स्थिती अत्यंत मजबूत असताना नितीश कुमार यांनी असा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामध्ये चार कारणे सांगितली जात आहेत.
१. भाजपचा प्रचंड दबाव?
२०२० च्या निवडणुकीत नितीश कुमार यांना भाजपच्या तुलनेत जवळपास निम्म्याच जागा मिळाल्या होत्या. त्यानंतरही भाजपने मनाचा मोठेपणा दाखवत त्यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. २०२५ च्या निवडणुकीतही तेच घडले. नितीश कुमारांना चार जागा कमी मिळाल्या, मात्र, भाजपने त्यांनाच सीएम करत शब्द पाळला. पण निवडणुकीआधी विरोधकांनी दाखविलेली महाराष्ट्र फॉर्म्यूल्याची भीती खरी ठरली. विधानसभेतील आकड्यांचे गणित पाहिल्यास जेडीयूला सोडूनही भाजप सरकार बनवू शकते. भाजपकडे सध्या ८९ आमदार आहेत. चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, जीतनराम मांझी, एमआयएम, बीएसपी या पक्षांना सोबत घेऊन किंवा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचे आमदार फोडूनही भाजप सत्ता काबीज करू शकते.
२. आकड्यांचे गणित जुळेना
विधानसभा निवडणुकीत आरजेडी आणि काँग्रेसला केवळ ३१ जागा मिळाल्या आहेत. या आघाडीला किमान ४० ते ४५ जागा मिळाल्या असत्या तरी नितीश कुमार भाजपसमोर झुकले नसते. कारण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी ते आघाडीसोबत जाऊ शकले असते. पण आता तशी शक्यता नाही. त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदावर राहण्यासाठी अजूनही महिनाभराचा वेळ आहे. राज्यसभेची शपथ घेईपर्यंत ते या पदावर राहतील. पण या कालावधीत त्यांना काहीच हालचाल करता येणार नाही, अशी स्थिती आहे. आघाडीसह एमआयएम आणि बीएसपीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला तरी भाजपच्या रणनीतीपुढे ते फार काळ टिकणार नाही.
३. केंद्रात एनडीएचे सरकार सुरक्षित
केंद्रात एनडीए सरकारमध्ये जेडीयू असून पक्षाचे १२ खासदार आहेत. नितीश कुमारांनी मोदी सरकारचा पाठिंबा काढला तरी सरकारला कसलाही धोका नाही. जेडीयू बाहेर पडल्यास सरकारकडे २८० खासदारांचे पाठबळ उरते. अशा स्थितीत नितीश कुमार कोणताही धोका पत्करणार नाहीत.
४. नितीश कुमार यांचे वय
नितीश कुमार यांनी नुकतीच वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या तब्बेतीवरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणूक २०३० मध्ये आहे. तोपर्यंत त्यांचे वय ७९ होईल. नितीश कुमार यांच्या तोडीस तोड नेता सध्या भाजपमध्ये नाही. पण पुढील चार वर्षे भाजपला त्यासाठी प्रयत्न करता येतील. त्यामुळेच भाजपने वेळ साधत नितीश कुमारांना राज्यसभेवर जाण्यासाठी दबाव टाकल्याची चर्चा आहे. पुढील निवडणुकीत नितीश कुमार सोबत राहिले तर त्यांना आताएवढे महत्व राहणार नाही, हे स्पष्टच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.