Omar Abdullah Sarkarnama
विश्लेषण

Omar Abdullah : धर्म विचारून गोळी मारणाऱ्यांनो... आमच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकाच! ओमर अब्दुल्लांनी मनं जिंकली...

Omar Abdullah’s Strong Condemnation of the Pahalgam Attack : भाषण करताना ओमर अब्दुल्ला भावूक झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्टपणे जाणवत होता. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दामध्ये आक्रमकपणा होता.

Rajanand More

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी जम्मू आणि काश्मीरला घेरले आहे. दहशतवाद्यांना शोधून त्यांना अद्दल घडविण्यासाठी यंत्रणांनी कंबर कसली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे विशेष अधिवेशनही घेण्यात आले. या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलेल्या भाषणाने धर्म विचारून गोळ्या मारणाऱ्यांना दहशतवाद्यांच्या अक्षरश: चिंध्या केल्या. ओमर यांच्या या भाषणाने देशवासियांचीही मने जिंकली.

भाषण करताना ओमर अब्दुल्ला भावूक झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्टपणे जाणवत होता. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दामध्ये आक्रमकपणा होता. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करणारे हे भाषण देशवासियांना एकजुटतेचा संदेश देणारेही होते. मी कोणत्या तोंडाने पूर्ण राज्याचा दर्जा मागू, असे उद्विग्नपणे सांगत त्यांनी आपल्या मनात सुरू असलेली घालमेलही बोलून दाखविली.

दहशतवादी हल्ल्याचा काश्मिरमधील जनतेकडूनही विरोध केला जात आहे. ठिकठिकाणी रॅली काढल्या जात आहेत. अब्दुल्ला यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख करताना राजकीय जीवनात असे दृश्य पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगितले. आम्ही पर्यटकांना जम्मू-काश्मीरमध्ये बोलावले होते. पण त्यांना सुरक्षितपणे घरी पाठवू शकलो नाही. इच्छा असूनही मी माफी मागू शकत नाही. त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. आपल्यापैकी किती जणांवर हल्ले झाले, ते मोजू लागलो तर थकून जावू. आमची लहान बहीण शगूनपासून सकिनापर्यंत, कुणाकुणाचे नाव घेऊ. अनेकांनी आपल्या नातेवाईकांना गमावले आहे. मुलांनी आपल्या वडिलांना रक्तात माखलेले पाहिले आहे, अशा भावना अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या आहेत.

Vinay Narwal Killed in Pahalgam Terror Attack

खरंतर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेमध्ये राज्य सरकारची काही भूमिका नाही. पण त्यानंतर अब्दुल्ला यांनी जबाबदारी झटकून न देता संवेदनशीलता दाखवत आपण अशाप्रसंगी राज्याचा दर्जा देण्याची मागणी करू शकत नाही, असे सांगितले. ही ती वेळ नाही. कोणतेही राजकारण केले जाणार नाही. आम्ही मृत्यू झालेल्या सर्वांसाठी प्रार्थना करू. मुख्यमंत्री म्हणून त्यांना सुरक्षेची हमी देण्याची माझा जबाबदारी होती, पण देऊ शकलो नाही, असे अब्दुल्ला म्हणाले.

ओमर अब्दुल्ला यांनी दहशतवाद्यांनाही स्पष्ट शब्दांत इशारा दिला. जम्मू-काश्मीर सरकार देशासोबत असल्याचे सांगताना त्यांनी त्यांचे सरकार दहशतवादाविरोधातील लढाई अधिक मजबूत करणार असल्याचेही स्पष्ट केले. लोक आपल्यासोबत असतील तरच दहशतवाद संपेल. लोकांचा आक्रोश पाहून जर आपण योग्य पावले उचलली तर ती दहशतवादाच्या शेवटाची सुरूवात असेल, असा विश्वासही ओमर यांनी व्यक्त केला आहे.

दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंची हत्या केल्याने जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. ओमर यांनीही त्याचा तीव्र निषेध केला. असे करावे, हे तुम्हाला कुणी सांगितले? कुणाची अशी इच्छा होती? जम्मू आणि काश्मीरमधील जनतेला असे कधीच वाटत नाही, असे अप्रत्यक्षपणे बोलताना ओमर यांनी दहशतवाद राज्यातून हद्दपार करण्यासाठी आपण केंद्र सरकारसोबत खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या भाषणातील अनेक मुद्द्यांनी देशावासियांची मने जिंकली अन् जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनाही दहशतवादाविरोधातील लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. त्यामुळेच म्हणावेसे वाटते, धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्यांनो, हे भाषण ऐकाच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT