Sanjay Shinde-Ajit Pawar&Baban shinde-Devendra Fadnavis
Sanjay Shinde-Ajit Pawar&Baban shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
विश्लेषण

Assembly Session : बननदादा फडणवीसांच्या, तर संजयमामा अजितदादांच्या पाठीशी : शिंदे बंधूंच्या विधानसभेतील बसण्याची चर्चा

विजय दुधाळे

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (Baban shinde) हे सत्ताधारी बाजूकडील दोन नंबरच्या बाकावर बसलेले दिसून आले, तेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी मागे बसले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर करमाळ्यातून निवडून आलेले आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) मात्र नेमके त्याचवेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मागील बाकावर बसून होते. त्यामुळे शिंदे बंधूच्या विधानसभेतील बसण्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे. (One brother with Fadnavis, other with Ajit Dada: Talks about Shinde brothers sitting in Assembly)

मुंबईत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा असण्याची शक्यता आहे. विधानसभेत आज जलसंपदा विभागाच्या संदर्भातील प्रश्नोत्तरे सुरू होती. त्यात खडकवासला मतदारसंघाचे भीमराव तापकीर हे धरण आणि त्यासंदर्भाने प्रश्न विचारत होते, त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे सत्ताधाऱ्यांकडे आले.

त्या वेळी फडणवीसांच्या पाठीमागील बाकावर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक बसले होते. मात्र, शिंदे हे फडणवीसांच्या पाठीमागील बाकावर बसणार असल्याचा निरोप सभागृहातील शिपायाने दिला. त्यानंतर कोळंबकर त्या जागेवरून उठून पाठीमागे जाऊन बसले आणि त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे जाऊन बसले. सोबत कसलीतरी फाईलही होती.

बननराव शिंदे हे बराच वेळ फडणवीस यांच्या पाठीमागील बाकावर बसून होते. बबनदादांच्या भाजपप्रवेशाची चर्चा मागील काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यात रंगती आहे. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि बबनदादा यांनी दिल्लीत जाऊन फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजप प्रवेशाबाबत नो कॉमेंट असे उत्तर दिले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी माढ्यातील एका कार्यक्रमात मात्र भाजप प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ‘योग्य वेळी योग्य निर्णय करू’ असे उत्तर दिले होते. त्यातच आज ते विधानसभेत चक्क सत्ताधारी बाकावर आणि तेही फडणवीस यांच्या पाठीमागील बाकावर आढळून आल्याने चर्चा तर होणारच ना. मात्र, त्यांच्यातील चर्चेचा तपशील कळू शकलेला नाही.

दुसरीकडे, अजित पवार यांच्या खास मर्जीतील म्हणून ओळख असलेले आमदार संजय शिंदे हेही नेमके त्याचवेळी विरोधी बाकावर विरोधी पक्षनेत्याच्या मागील बाकावर बसले हेाते. अजितदादांच्या पाठीमागील बाकावर बसलेले संजयमामा अनेकदा दिसून येतात. त्यांनीही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अगोदर भाजपला पाठिंबा दर्शविला होता.

महाविकास आघाडीचे सरकार येणार असे दिसताच त्यांनी महाआघाडीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीतही महाआघाडीच्या उमेदवारांच्या मतदान करत आपण आघाडीच्या पाठीशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले होते. मात्र, बबनदादांच्या सत्ताधारी बाकावरील उपस्थितीने शिंदे बंधूंच्या विधानसभेतील बसण्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT