Hindurao Naik Nimbalkar-Ranjitsinh Naik Nimbalkar-Ramraje Naik Nimbalkar Sarkarnama
विश्लेषण

Phaltan Politic's : रामराजेंचा एक नकार अन् सुरु झाला एकमेकांचं अस्तित्व राजकीय संपवणारा संघर्ष...

Nimbalkar Vs Nimbalkar : साताऱ्यातील नाईक निंबाळकर घराण्यातील सत्तासंघर्ष तीव्र होत असून, पिढ्यानपिढ्यांच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईमुळे स्थानिक तसेच राज्याच्या राजकारणात या घराण्याची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 30 January : सोलापूरचे मोहिते पाटील, सांगलीचे वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती, पाटील, महाडिक, पुण्यात पवार, लातुरात निलंगेकर, देशमुख, चाकूरकर, नगरमध्ये विखे पाटील, नाशिकमध्ये भुजबळ, हिरे, बीडमध्ये क्षीरसागर, पंडित, मुंडे अशा राजकीय घराण्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आजही दबदबा कायम आहे. त्याच पद्धतीने सातारच्या राजकारणावर फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचा पगडा पूर्वीही होता अन् आजही आहे.

हिंदुराव नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर हे दोघेही या घराण्यातील प्रस्थापित राजकारणी होते. हे दोघेही सुरुवातीला राजकारणात एकत्र होते. पण याच भावकीतील भांडण आज संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. या घराण्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष टोकाला गेलाय. एकमेकांचं राजकारण संपवण्यासाठी या घराण्यात जे वाट्टेल ते करण्याची तयारी आहे. निंबाळकरांच्या त्या पिढीतील संघर्ष आता पुढच्या पिढीतही उतरला आहे.

पण नेमकं असं काय घडलं की, गुण्यागोविंदाने राजकारण करणारे निंबाळकर एकमेकांचे टोकाचे राजकीय प्रतिस्पर्धी बनले. त्यांच्यामध्ये राजकीय संघर्षची ठिणगी नेमकी कशी पडली, हे आजच्या ‘पॉडकास्ट’मधून जाणून घेऊया...

फलटणच्या (Phalatn) निंबाळकर घराण्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. जो अगदी बाराव्या शतकापर्यंत सुरु होतो. निंबराज परमार नावाचा एक तरुण फलटणजवळच्या शंभू महादेवाच्या रानात 1244 मध्ये येऊन राहिला. निंबराज हा ज्या गावी येऊन राहिला, त्या गावास निंबळक आणि पुढे त्यावरून त्यांच्या वंशजांना निंबाळकर असे नाव पडले. पुढे महमंद तुघलखाच्या काळात निंबाळकरांना ‘नाईक’ हा किताब देण्यात आला आणि फलटणचे निंबाळकर हे नाईक निंबाळकर झाले.

निंबराजनंतर चौदावे पुरुष वणंगपाळ ऊर्फ जगपाळराव हे शूर आणि महापराक्रमी होते. त्यांचे थोरले चिरंजीव मुधोजीराव (दुसरे) हे फलटणचे अधिकारी होते. त्यांचे दोन विवाह झाले होते, धाकट्या पत्नीपासून त्यांना बजाजीराव आणि सईबाई अशी दोन मुलं होती. सईबाईंचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी विवाह झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी म्हणून फलटणकडे आजही आदराने पाहिले जाते. त्यामुळे फलटण आणि निंबाळकरांना ऐतिहासिक वारसा आहे.

फलटणच्या राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक वारशांवर निंबाळकर घराण्याचा मोठा पगडा आहे. आजही एकमेकांचे अस्तित्व संपवायला निघालेल्या राजकीय संघर्षाच्या माध्यमातून फलटणवर निंबाळकरांचे वर्चस्व दिसून येते. पण आज एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले निंबाळकर यांनी कधीकाळी अत्यंत गुण्यागोविंदाने एकत्र काम केले आहे, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण ते खरं आहे.

फलटण आणि परिसरावर असलेला दुष्काळी कलंक पुसण्यासाठी याच निंबाळकरांनी काम केले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. साधारणपणे 80 दशकापासून फलटण विधानसभा मतदारसंघावर चिमणराव कदम यांचे वर्चस्व होते. कदम हे १९८०, १९८५ आणि १९९० असे तीनवेळा विधानसभेवर निवडून आले होते. तत्पूर्वी कृष्णचंद्र भोईटे यांची १९६७ आणि १९७२ ही दोन टर्म आणि चिमणरावांची तीन टर्म वगळता फलटणवर कायम निंबाळकरांचे राजकीय वर्चस्व राहिलेले आहे.

माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पिताश्री हिंदुराव नाईक निंबाळकर हे १९७८ पासून सक्रीय राजकारणात उतरले होते. ते १९८० पासून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. हिंदुराव हे पाण्याच्या प्रश्नावर लढणारे नेते होते. त्यांनी १९९१ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर काँग्रेसची बडी हस्ती, प्रतापराव भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. तत्पूर्वी त्यांचे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वडिल आनंदराव चव्हाण, मातोश्री काँग्रेसच्या तत्कालीन खासदार प्रमिलाकाकी चव्हाण या कुटुंबाशी सलोख्याचे संबंध होते.

तोच नात्याचा वारसा पुढे पृथ्वीराजबाबा आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात दिसून आला. त्याच निवडणुकीत हिंदुराव निंबाळकरांनी फलटण आणि परिसराच्या पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केला. मात्र, राजीव गांधींच्या हत्येनंतर तयार झालेल्या काँग्रेसच्या लाटेत शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या हिंदुरावांचा पराभव झाला. सातारा लोकसभेवर भोसले, तर फलटणमध्ये चिमणराव कदमांचे वर्चस्व होते. भोसले, निंबाळकर, कदम ही सर्व काँग्रेस विचारांची कुटुंब होती.

त्याचदरम्यान, फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत राजघराण्यातील रामराजे नाईक निंबाळकर यांची राजकारणात प्रथमच एन्ट्री झाली. तोपर्यंत हिंदुराव निंबाळकर यांचे राजकारणात बऱ्यापैकी बस्तान बसले होते. पण निवडणुकीच्या राजकारणात त्यांना यश येत नव्हते. फलटण नगरपालिकेची निवडणूक १९९१ मध्ये लागली. त्या निवडणुकीत निवडून आलेले रामराजे हे फलटणचे नगराध्यक्ष झाले, तर हिंदुराव नाईक निंबाळकर हे उपगनराध्यक्ष झाले, त्यावेळी या दोघांनी एकत्रितपणे हातात हात घालून फलटणचे राजकारण केले.

रामराजेंनी फलटणच्या नगराध्यक्षपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, नगरपालिकेला अत्यंत तोकडे उत्पन्न मिळत आहे. पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांना जकातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळायचे, ते आता जीएसटीमुळे बंद झाले आहे. असो, पण नगरपालिकेला उत्पन्न कमी आहे, हे नगराध्यक्ष झालेल्या चाणाक्ष रामराजेंच्या लक्षात आले. नगरपालिकेचे उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनी जकात वसुलीचा ठेका देण्याचा निर्णय घेतला.

तो ठेका हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या निकटवर्तीयांनी चालवायला घेतला. त्या वसुलीवरून प्रथमच रामराजे आणि हिंदुराव यांच्यात पहिल्यांदा कुरबुरी झाल्या. ती निंबाळकरांच्या वादाची सुरुवात म्हणता येईल. पण त्याचे स्वरूप अगदीच किरकोळ होते. पुढे चार वर्षे हे दोन्ही नेते नगरपालिकेत एकत्र काम करत राहिले. नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून रामराजे निंबाळकर यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी गाठीभेटी होत होत्या. त्यातून त्यांची सलगी वाढत होती.

रामराजेंना आता विधानसभेचे वेध लागले होते. निंबाळकरांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्णय रामराजेंनी घेतला होता आणि नगराध्यक्षपदावर काम केल्यामुळे त्यांना राजकारणातील आडाखे लक्षात आले होते. पण काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळण्याची शक्यता कमीच होती आणि पुढे झालेही तसेच. पुढे १९९५ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चिमणराव कदम यांना तिकिट दिले, त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

त्या निवडणुकीत हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी रामराजेंच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. चिमणराव कदमांच्या विरोधात फलटणचे निंबाळकर हे मोठ्या जिद्दीने पाय रोवून उभे राहिले. मोठ्या हिरीरीने हिंदुरावांनी रामराजेंचा प्रचार केला, रामराजे हे विधानसभेवर मोठ्या मताधिक्कयाने निवडून आले. रामराजे नाईक निंबाळकर हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे फलटणच्या नगराध्यक्षपदाची खुर्ची आपल्याला मिळेल, असा आशावाद हिंदुराव नाईक निंबाळकर यांना होता. मात्र, रामराजेंनी हिंदुरावांना नगराध्यक्ष करण्यास नकार दिला आणि फटलणच्या निंबाळकर घराण्यात राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. ती आजपर्यंत टिकून आहे.

राज्यात सर्वाधिक जागा जिंकलेल्या शिवसेना-भाजप युतीला मोठ्या संख्येने निवडून आलेल्या अपक्षांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी फलटण आणि परिसराचा दुष्काळ हटविण्यासाठी कृष्णा खोऱ्याचे पाणी मिळावे, अशी अपेक्षा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आणि त्यानुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. त्याचे अध्यक्षपद हे १९९५ ते २००० पर्यत रामराजेंकडे होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागं वळून पाहिलंच नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर रामराजेंनी शरद पवारांचे नेतृत्व मान्य करत १९९९ मध्ये त्या पक्षात प्रवेश केला. त्यांनी १९९९, २००४ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवली आणि जिंकली. त्याच काळात राज्यात सत्तेवर आलेले काँग्रेस आघाडी सरकारमध्ये रामराजे जलसंपदा मंत्री झाले. त्यांच्याकडे अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असेपर्यंत लाल दिवा होता. कारण ते मंत्रिमंडळात, तसेच शेवटी विधान परिषदेचे सभापती होते.

दुसरीकडे हिंदुराव नाईक निंबाळकर हे शिवसेनेत गेले. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर झालेल्या १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतापराव भोसले यांचा पराभव करून हिंदुराव हे साताऱ्यातून शिवसेनेचे खासदार झाले. पुढच्या काळात दोन्ही निंबाळकरांमधील राजकीय वाद वाढत गेला.

लोकसभेच्या १९९८ मध्ये झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीत हिंदुराव नाईक निंबाळकर विरुद्ध अभयसिंहराजे भोसले यांच्यात सामना झाला. रामराजेंनी अर्थातच अभयसिंहराजेंच्या पाठीशी ताकद उभी केली. त्यात अभयसिंहराजे हे हिंदुरावांचा पराभव करत खासदार झाले. पुढे वर्षभरातच १९९९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदुरावांनी पुन्हा लोकसभेला नशीब अजमावले. पण त्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. त्यानंतर २००४ च्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. त्या पराभवानंतर हिंदुरावांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली.

हिंदुराव नाईक निंबाळकर हे सक्रीय राजकारणात असताना त्यांचे चिरंजीव रणजितसिंह नाईक निंबाळकर व्यवसाय सांभाळत होते. स्वराज डेअरी आणि स्वराज साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क होताच. त्यामुळे हिंदुरावांनी २००४ मध्ये निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी त्यांचे चिरंजीव रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंच्या विरोधात २००४ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण, त्यात त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीपासून हिंदुरावांची दुसरी पिढी रामराजेंच्या विरोधात उतरली होती. नगरपालिकेत त्यांचे बंधू समशेरसिंह हे विरोधक म्हणून काम पाहतच होते.

मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये फलटण आरक्षित झाला, त्यामुळे समोरासमोर लढण्याचा संघर्ष कमी झाला असला तरी समर्थकांच्या माध्यमातून दोन्ही निंबाळकरांमधील लढाई दिवसेंदिवस धारदार होत गेली. रामराजेंनी मात्र मतदारसंघावरील आपली पकड ढिली होऊ दिली नव्हती. २००९ पासून २०२४ पर्यंत सलग १५ वर्षे त्यांच्या विचारांचा आमदार फलटणमधून निवडून येत होता. पण २०२४ मध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या फाटाफुटीनंतर रणजितसिंहांनी आपल्या समर्थकाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तिकिट मिळवून दिले आणि फलटणचा आमदार म्हणून सचिन पाटील यांना निवडून आणले, त्यामुळे दोन पिढीतील संघर्षात प्रथमच रामराजेंच्या विरोधात २०२४ मध्ये आमदार निवडून आला.

हिंदुराव निंबाळकरांचे १५ मार्च २०२० मध्ये निधन झाले, त्यांचा राजकीय वारसा रणजितसिंहांकडे आला होता. काँग्रेसमधील कऱ्हाडच्या चव्हाण घराण्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. चव्हाण यांनी जानेवारी २०१९ मध्ये त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केले. पण, मार्च २०१९ मध्ये त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. लागलीच त्यांना भाजपने माढ्यातून तिकिट दिले. विशेष म्हणजे अकलूजच्या मोहिते पाटलांनीही त्यावेळी तिकिटाची मागणी केली नाही, त्यातून निंबाळकरांची लॉटरी लागली आणि वडील हिंदुराव यांच्यानंतर रणजितसिंह खासदार झाले.

विशेष म्हणजे रणजितसिंह यांचे पिताश्री हिंदुराव यांनी फलटणच्या नगराध्यक्षपदावरून रामराजेंशी मांडलेला उभा दावा आणि त्याच नगराधक्षपदी आपल्या भावाला निवडून आणून रणजितसिंहांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचे मानले जात आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रणजितसिंहाचे बंधू समशेरसिंह यांनी रामराजे यांचे चिरंजीव अनिकेतराजे यांचा पराभव केला, त्यामुळे एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाल्याचे मानले जात आहे.

हिंदुराव निंबाळकर यांनी रामराजेंच्या विरोधात सुरू केलेला संघर्ष रणजितसिंहांनी तेवढ्याच त्वेषाने पुढे चालू ठेवला. किंबहुना त्याला अधिक धार येत गेली. दोन्ही घराण्यातील राजकीय संघर्ष आता फलटणमधे वैयक्तिक पातळीवर पोचला आहे. ईडी, इन्कम टॅक्स, पोलिसांचा वापर केला जात आहे. यंत्रणेला हाताशी धरून एकमेकांची राजकीय खुमखुमी जिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही दोन्ही घराणी एकमेकांच्या विरोधात जीवन मरणाच्या भूमिकेत लढत आहेत.

पण यातून फलटणच्या राजकारणात दोन्ही निंबाळकरांनी पेटवलेला विस्तव आता ज्वालासारखा धगधगत आहे. त्यात दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची मात्र होरपळ होत आहे, हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT