Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अद्याप या सहा खासदारांपैकी कुणीही जाहीरपणे यावर भाष्य केलेले नाही. मात्र, मागील चार दिवसांतील त्यांच्या कृतीने सगळं चित्र क्लिअर केले आहे. आता घोषणेची केवळ औपचारिकताच उरली आहे. एकनाथ शिंदेंचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे. त्यासाठी करण्यात आलेल्या वाटाघाटींनंतरच सहा खासदारांनी होकार दिला असणार. पण आता या सहा बंडखोर खासदारांना उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौर आणि नागेश पाटील आष्टीकर या सहा जणांनी मशाल विझवत धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सहा जणांपैकी ओमराजेंच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. सोशल मीडियातून त्याचे पडसाद उमटत आहे.
ओमराजे यांचे ठाकरेंविषयीच्या निष्ठेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक व्हिडिओ म्हणजे त्यांनी निष्ठेच्या मीटरवर केलेले विधान. निष्ठेचा मीटर असता तर असे म्हणत त्यांनी एकप्रकारे मीटरमध्ये आकडे आपलेच अधिक असतील, असे सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे इतरही व्हिडिओ शिवसैनिकांनी पोस्ट करत निष्ठेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसरीकडे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले खासदार राजाभाऊ वाजे यांचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई या दोघांसह वाजेंनी ठाकरेंची साथ सोडलेली नाही. दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊतांसह या चौघांच्या पत्रकार परिषदेतील वाजेंचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. राऊतांनी निष्ठेचे कौतुक होत असताना वाजेंच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ते भावनिक झाल्याचे दिसते.
नाशिकचे खासदार असलेल्या राजाभाऊंच्या या अश्रूंसमोर ओमराजेंचा निष्ठेचा मीटर फुटल्याची चर्चा होत आहे. इतर खासदार फुटतील पण ओमराजे कायम ठाकरेंसोबत राहतील, याची खात्री शिवसैनिकांना होती. ठाकरेंसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांचीही तीच भावना असेल. पण ओमराजेंच्या भूमिकेने सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियात नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांमध्ये त्याचे पडसाद उमटत आहे. सहा खासदारांपैकी केवळ ओमराजेंचीच सर्वाधिक होत आहे.
पुढील दोन-तीन दिवसांत ओमराजे शिंदेंसोबत जातीलही. २०२२ च्या फुटीनंतर काही दिवस शिवसैनिकांमध्ये रोष होता. पण कालांतराने तो कमी झाला, शिंदेंनी आपली ताकद दाखवून दिली. पण त्यावेळची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये फरक आहे. सहाही खासदार ठाकरेंच्या चेहऱ्यावर आणि मशाल या चिन्हावर निवडून आलेले आहेत. मुळ शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या आणि महायुतीच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केला आहे. त्यामुळे त्यांचे पक्ष सोडून जाणे, ठाकरेंसह शिवसैनिक आणि मतदारांच्याही अधिक जिव्हारी लागणारे असेल.
बंडाच्या या लाटेत राजाभाऊंसारख्या एकनिष्ठ खासदाराचीही तितकीच चर्चा होत आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून ऑफर आल्याचा दावा वाजेंच्या वडिलांनी केला आहे. जी ऑफर अन्य सहा खासदारांना तीच वाजेंसाठीही असेल. पण वाजेंनी कोणतीही ऑफर न स्वीकारता ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. राज्यात-देशात एनडीएची सत्ता आले. विरोधी पक्षातील आमदार-खासदारांना निधीसाठी झगडावे लागत असल्याचा दावा नेत्यांकडूनच केला जात आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाचे कारण देत अनेक आमदार-खासदार पक्ष बदलताना दिसत आहेत. सहा जणांकडूनही तेच सांगितले जाईल. याचाअर्थ राजाभाऊंसारख्या अनेक लोकप्रतिनिधींना मतदारसंघाच्या विकासाची काळजी नाही, असा होत नाही.
सत्तेत असल्याशिवाय मतदारसंघांचा विकास होणार नाही, असे कारण आता सर्रासपणे दिले जात आहे. कदाचित तशी परिस्थिती निर्माणही केली जात आहे, हे नाकारता येणार नाही. पण यापूर्वीही अनेक लोकप्रतिनिधींनी सत्तेशी झगडा करून आपल्या मतदारसंघाचा विकास केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तर अनेक वर्षे सत्तेत असूनही मतदारसंघ भकास असल्याची उदाहरणेही आहेत.
बंडखोर खासदार संजय जाधव यांची खासदारकीची ही तिसरी टर्म आहे. इतकी वर्षे होऊनही त्यांना विकासाचे कारण देत सत्तापक्षात जावे लागत असेल तर हे त्यांचे अपयश नाही का? पहिल्या टर्ममध्ये तर सत्तेतच होते. त्यावेळी मतदारसंघात किती निधी आणला, कोणती विकासकामे केली, हेही सांगायला हवे. संजय जाधव यांच्याप्रमाणे विकासाच्या नावाखाली पक्षांतरे करणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही हा लेखाजोखा मांडावा. पुन्हा निवडून यायचे असेल तर केवळ विकासाचा 'मीटर' चालू ठेवून राजकारणाचे गणित जुळविता येत नाही. पक्ष, नेता अन् मतदारांशी निष्ठेचा मीटरही महत्वाचा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.