narendra modi | amit shah | devendra fadnavis | eknath shinde  sarkarnama
विश्लेषण

Eknath Shinde : CM शिंदेंची मजबुरी कोणती? भाजप नेत्यांवर टीका झाली की आठवतेय महाराष्ट्राची संस्कृती

Cm Eknath Shinde On Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका झाली की त्यांच्या बचावासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर येत आहेत. त्यांना महाराष्ट्राची संस्कृतीही आठवत आहे.

अय्यूब कादरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून बाहेर पडले आहेत. त्यांचा वेगळा पक्ष आहे, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांची महायुती आहे. शिवसेनेतून फुटून ते 40 आमदारांसह गुवाहाटीला गेले, त्यावेळी ते म्हणाले होते, की "आपल्या मागे महाशक्ती आहे." ही महाशक्ती म्हणजे अर्थातच भाजप. त्या महाशक्तीने त्यांना त्यावेळी सर्वप्रकराची रसद पुरवली होती, असे बोलले जाते. देवेंद्र फडणवीस यांना बाजूला ठेवून महाशक्तीनेच शिंदे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवले आहे.

पुण्यात 21 जुलै रोजी भाजपचे अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तुफान टीका केली, भले मोठे आरोप केले. शरद पवार हे देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी नेते आहेत, उद्धव ठाकरे हे 'औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष' आहे, अशी घणाघाती टीका शाह यांनी केली. अर्थातच या टीकेला उत्तर मिळणारच होते. शरद पवार यांच्या पक्षाने अमित शाह हे 'तडीपार' झाले होते, असे सांगत त्या टीकेची परतफेड केली.

उद्धव ठाकरे यांनीही शाह, फडणवीस यांना जिव्हारी लागेल असे प्रत्युत्तर दिले. अमित शाह हे अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज असल्याची टीका ठाकरे यांनी केली. फडणवीस यांचा उल्लेख त्यांनी ढेकूण असा केला. या टीकेमुळे मुख्यमंत्री शिंदे ( Eknath Shinde ) यांना महाराष्ट्राची संस्कृती आठवली. शाह, फडणवीस यांच्यावर ज्या भाषेत टीका करण्यात आली, ती महाराष्ट्राची परंपरा नाही, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विरोधकांनी टीका केली की मुख्यमंत्री शिंदे यांनी याआधीही विरोधकांचा समाचार घेतला आहेत. त्या यादीत आता देवेंद्र फडणवीस यांचेही नाव आले आहे. फडणवीस यांच्यावरील टीकेलाही मुख्यमंत्री शिंदे आता उत्तर देऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी मोठा धक्का दिला, त्याची कारणे शिंदे यांना माहित नसतील, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला होता. मोदी यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली होती, शरद पवार यांचे नाव न घेता त्यांनी त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा केला होता. उद्धव ठाकरे यांचा उल्लेख बाळासाहेबांचे 'नकली संतान' असा केला होता. उद्धव ठाकरे यांची 'शिवसेना नकली' आहे, असे अमित शाह म्हणाले होते.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. राज्यातील जनता त्यांचा आदर करते. त्यामुळे मोदी, शाह यांनी या दोघांवर केलेली विखारी टीका मतदारांनी आवडली नव्हती. त्याचे प्रतिबिंब लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आले होते. मोदी यांनी शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणत होते, उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची 'नकली संतान' म्हणत होते, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा आठवली नाही. त्यावेळी ती आठवली असती, तर एकनाथ शिंदे यांचे मोठेपण वाढले असते, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. पुण्यातील अधिवेशनातही अमित शाह यांनी शरद पवारांना 'सर्वात भ्रष्ट नेता' म्हटले, त्यावेळीही शिंदेंना महाराष्ट्राची संस्कृती आठवली नाही.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेत वाढले आहेत. त्यांची कारकीर्द शिवसेनेतच बहरली आहे, त्यांनी अनेक वर्षे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. कुटुंबाप्रमाणे ते मिळून मिसळून राहिलेले आहेत. आता ते वेगळे झाले असले तरी इतिहास पुसला जाऊ शकत नाही. मोदी ज्यावेळी उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे 'नकली संतान' म्हणत होते, त्यावेळी शिंदे शांतच होते. उद्धव ठाकरे हे 'औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष' आहेत, असे शाह म्हणत होते, त्यावेळीही शिंदे शांतच राहिले. आता ते महायुतीत आहेत, भाजपसोबत आहेत म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावरील भाजप नेत्यांच्या टीकेला उत्तर देऊ शकत नाहीत, मात्र त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करायला हरकत नव्हती. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडून मोदी, शाहांवर टीका झाली की त्यांना महाराष्ट्राची संस्कृती आठवायला लागली आहे.

शिवसेना फुटली, आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले, ते अद्यापही कायम आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी टीका दोन्ही बाजूंनी होऊ लागली. ही टीका करण्यात शिंदेंचे आमदारही मागे राहिलेले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांवर खालच्या भाषेत टीका केली जाऊ लागली. महायुतीत शिंदे ज्या भाजपसोबत आहेत, त्या भाजपचे काही आमदार उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करतात. विरोध असला तरी राजकीय सौहार्द गरजेचा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशा प्रसंगातही महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती आठवली असती, त्यांनी स्वपक्षासह विरोधकांनाही कानपिचक्या दिल्या असत्या तर लोकांच्या मनात त्यांची प्रतिमा उजळून निघाली असती. महाराष्ट्राच्या दिग्गज मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव कोरले गेले असते.

आता काय होत आहे? मोदी, शाह यांच्यावरील टीका मुख्यमंत्री शिंदेही भाजप नेत्यांइतकीच गांभीर्याने घेऊ लागले आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांच्या टीकेवर भाजप नेत्यांना प्रत्युत्तर मिळाले की त्यांच्या बचावासाठी मुख्यमंत्री समोर येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची अशी कोणती मजबुरी असेल? अजितदादा पवारही महायुतीत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मात्र त्यांना अद्याप तरी महाराष्ट्राची संस्कृती अशी एकतर्फी पद्धतीने आठवल्याचे दिसत नाही. दिल्लीतून आलेल्या भाजप नेत्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांवर केलेली टीका लोकांना आवडली नव्हती, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेंच्या पाठीशी हा अनुभव आहे. हे लक्षात घेता शिंदे यांनी सर्वांनाच म्हणजे भाजपच्या नेत्यांनाही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, परंपरेची आठवण करून द्यायला हवी होती.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT