Gold purchase impact India : इराण युध्दामुळे जागतिक पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झाल्याने भारतासह जगभरातील अनेक देशांना त्याचा फटका बसला आहे. युध्दाचे ढग दूर न झाल्यास भारताला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी देशवासियांना काही उपाययोजनाही सुचविल्या आहेत. वर्षभर सोनं खरेदी करू नका, परदेशी प्रवास टाळा, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याला पंतप्रधानांनी देशभक्तीची जोड दिली आहे. पण पंतप्रधानांनी असे आवाहन का केले, त्यामागची नेमकी कारणे कोणती, देशातील लोकांनी सोनं खरेदी केलं नाही तर काय होईल, असा अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.
भारतात सोन्याची मागणी दरवर्षी तब्बल ६०० ते ८०० टन एवढी असते. त्यामध्ये सर्वाधिक वाटा सोन्याच्या दागिन्यांचा आहे. जगात सर्वाधिक दागिन्यांची विक्री भारतात होते. विविध सण-उत्सव, विवाह तसेच अन्य घरगुती कार्यक्रमांसाठी भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते, ती गुंतवणूक म्हणून नव्हे तर त्याला परंपरेचीही जोड आहे.
सोन्याची ही प्रचंड गरज परदेशातून आयात करून भागवावी लागते. दरवर्षी अब्जावधी डॉलर किंमतीचे सोने भारतात आयात केले जाते. सोन्याची आयात जेवढी अधिक असते, तेवढे अधिक परकीय चलन भारताबाहेर जाते. पंतप्रधान मोदींनी नेमके त्यावरच बोट ठेवले आहे. परकीय चलन देशाबाहेर जाऊ नये, यासाठीच त्यांनी प्रामुख्याने सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे.
सोने खरेदी थांबविली तर काय होईल?
भारतीयांनी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केली तर त्याचा थेट परिणाम परकीय चलनावर बचतीवर होईल. आयात घटल्याने देशातून परकीय चलन कमी प्रमाणात बाहेर जाईल. परिणाम डॉलरची मागणी घटून रुपयाचा भाव वाढू शकतो. देशातील पैसा बाहेर न जाता देशांतर्गत गरजा भागविण्यासाठी वापरता येईल. पेट्रोल-डिझेलबाबतही तेच. भारताला कच्च्या तेलासाठी इतर देशांवरच अवलंबून राहावे लागते. त्यातूनही परकीय चलन देशाबाहेर जाते. त्यामुळे पंतप्रधानांनी प्रामुख्याने या दोन गोष्टींवर जोर दिला आहे.
लोकांकडून सोने खरेदीमध्ये होत असलेली गुंतवणूक कमी होऊन ती शेअर बाजार, म्युच्यूअल फंड, बँकांची बचत ठेव तसेच इतर सरकारी योजनांमध्ये वाढल्यास त्याचा थेट फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. बँकांकडील पैसा वाढल्याने त्याआधारे अधिकाधिक कर्जपुरवठा करणे शक्य होईल. उद्योगांकडे अधिक भांडवल उपलब्ध होईल, त्यांच्या विस्तारास मदत होईल. रोजगारवाढीसाठीही त्याचा काहीसा फायदा मिळू शकतो.
असाही नकारात्मक परिणाम
पंतप्रधानांचे सोने खरेदी न करण्याच्या आवाहनाचा थेट फटका दागिन्याच्या उद्योगाला बसू शकतो. देशभरात या उद्योगामध्ये लाखो कारागीर, कामगार, दुकानदार अवलंबून आहेत. सोने खरेदी कमी झाल्यास त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. प्रामुख्याने लग्नसराई, सणासुदीच्या काळात सोनेखरेदी मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी लोकांनी हात आखडा घेतल्यास हा उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्यांना संकटाचा सामना करावा लागू शकतो.
नेमका उपाय काय?
वर्षभर सोने खरेदी न करण्याच्या मोदींच्या आवाहनावर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधानांवर टीका सुरू केली आहे. सध्याच्या जागतिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे आवाहन केले असले तरी भारतासारख्या पंरपरा, श्रध्दा आणि भावनांशी नाळ जोडली गेलेल्या देशात सोन्याच्या झळाळीलाही महत्व आहे. लग्न समारंभ, अनेक मुहुर्त गाठून लोक हमखास सोने खरेदी करतात. त्यामुळे लोकांचा सोन्यातील गुंतवणुकीकडे असलेला कल हळुहळु बदलणे गरजेचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.