Uday Samant Sarkarnama
विश्लेषण

Shiv Sena Politics: तो दिवस शिवसेनेसाठी काळाकुट्ट दिवस होता...गाव तिथे शिवसेना अधिक शक्तीशाली करणार

Shiv Sena Vision Uday Samant:त्या अडीच वर्षांत शिवसेना एक मोठा ‘यू टर्न’ घेऊन पुन्हा काँग्रेसच्याच वळचणीला जाऊन बसली, तो दिवस शिवसेनेसाठी काळाकुट्ट दिवस होता. सत्तेसाठी कुठलीही तडजोड करणारी अशी शिवसेना महाराष्ट्राने कधी पाहिलीच नव्हती.

सरकारनामा ब्यूरो

उदय सामंत

(उद्योगमंत्री व शिवसेना नेते)

शिवसेनेची येत्या पाच वर्षांतील वाटचाल कशी राहील, या प्रश्नाचे उत्तर खरे तर गेल्या अडीच वर्षांतच महाराष्ट्रातील जनतेला मिळून गेले आहे. मराठी माणसाचे हित, भूमिपुत्राला न्याय, राज्याचा विकास आणि इथल्या जनतेचं कल्याण या सूत्रांवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली.

ज्वलंत विचारांची ही संघटना भविष्यात महाराष्ट्राचे राजकीय वास्तव बदलून टाकेल, असे कोणालाही तेव्हा वाटले नव्हते. परंतु, बाळासाहेबांचे हे स्वप्न साकार झालेलं दिसतंय. आज शिवसेना ही राज्यातील सर्वांत बलवान राज्यस्तरीय पक्ष ठरला आहे. याचे सारे श्रेय हे शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रात्रंदिवस काम करणाऱ्या शिवसैनिकांना आहे.

लोकशाहीत लोकांचा पक्ष कसा असतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली शिवसेना आहे. इथे कुणीही मालक नाही. नोकर नाही. आपण सर्वजण सारखेच आहोत. इथे कुणीही गडी नाही. आपण सारे सवंगडी आहोत. सामान्य लोकांनी, सामान्य लोकांसाठी चालवलेली ही एक असामान्य संघटना आहे

गाव तिथे शिवसेना

एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव आणि त्यानंतर अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या राज्यात केलेलं काम हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. बाळासाहेबांनी जे हिंदुत्वाचे बाळकडू आपल्या शिवसैनिकांना पाजले, त्याचाच हा परिणाम होता. एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकतो हे केवळ आणि केवळ शिवसेनेतच शक्य आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी आख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्राला समृद्ध आणि बलशाली बनविले.

विकासाची गंगा समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचावी यासाठी रात्रीचा दिवस केला. समाजातील सर्व घटकांसाठी जनकल्याणाच्या योजना राबविल्या. शेतकरी, वारकरी, लाडकी बहीण, लाडका भाऊ, ज्येष्ठ नागरिक यांना पाठबळ दिलं. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं. सरकार जनतेच्या दारात नेलं आणि ‘नो रिजन…ॲान दी स्पॅाट डिसिजन’ या धोरणाने शेवटच्या माणसाला न्याय दिला. आणि त्यातूनच एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक माणूस, प्रत्येक घटक शिवसेनेशी जोडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वैचारिक पाठबळावर, विकास आणि जनकल्याणाच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक हे सूत्र अधिक शक्तीशाली करणार आहे.

१९९५ मध्येही मनोहर जोशी सरांच्या रूपाने एक शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसला होता. नारायण राणे हे देखील काही काळ मुख्यमंत्री राहिले. शिवसेनेचे हे तिन्ही मुख्यमंत्री भाजपच्या साथीने सत्तेत राहिले. कारण मुळात जनादेशच तसा होता. मधल्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने उद्धव ठाकरे सरकार सत्तेत काही काळ बसले, पण दोन मंत्री तुरुंगात, भ्रष्टाचार, गैरव्यवहारांचे आरोप, कोरोनाकाळातील गैरव्यवहार आणि निर्नायकी सरकार यात हा काळ संपूर्णपणे वाया गेला. त्याबद्दल काही न बोललेलेच बरे. त्या अडीच वर्षांत शिवसेना एक मोठा ‘यू टर्न’ घेऊन पुन्हा काँग्रेसच्याच वळचणीला जाऊन बसली, तो दिवस शिवसेनेसाठी काळाकुट्ट दिवस होता. सत्तेसाठी कुठलीही तडजोड करणारी अशी शिवसेना महाराष्ट्राने कधी पाहिलीच नव्हती. ती उघड्या डोळ्यांनी बघावी लागली. शिवसेनेच्या मूळ विचारसरणीवरच घाव घालण्याचा तो प्रयत्न होता. त्या एक कृतीमुळे शिवसैनिकांची मने दुखावली, बाळासाहेबांचाही घोर अपमान झाला.

कामातून उत्तर

अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी केलेल्या उठावाचे ते बक्षीस होते, अशी टीका झाली. तथापि, ते बक्षीस नव्हते, तर जनादेशामुळे मिळालेला न्याय होता. अनैसर्गिक आघाडीतून पक्षाला बाहेर काढल्याचे ते फळ होते. बाळासाहेबांचे विचार, शिवसेनेची तत्त्वं आणि धनुष्यबाणाचे पावित्र्य जपण्यासाठी केलेल्या धाडसाचे ते फळ होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नऊ मंत्री आणि ४० आमदार जेव्हा सत्तेबाहेर पडले तेव्हा आमच्यावर टोकाचे आरोप झाले. परंतु, आम्ही आरोपांना कधीही आरोपांनी उत्तर दिलं नाही. आम्ही कायम आमच्या कामातूनच उत्तर दिलं. विकास आणि कल्याणकारी योजनांचे ऐतिहासिक काम अडीच वर्षात झालं. त्यामुळेच राज्यातील जनतेने शिवसेनेच्या पदरात ऐतिहासिक विजय टाकला.

‘डेडिकेटेट टू कॉमन मॅन’

‘शासन आपल्या दारी’ सारखी सरकारला थेट जनतेपर्यंत पोहोचवणारी योजना ही सुद्धा एक अभिनव पाऊल होते. जिल्ह्याजिल्ह्यांत त्या योजनेला जो प्रतिसाद मिळाला त्यातून तिचे महत्त्व आपोआपच अधोरेखित झाले. अधोगतीला गेलेल्या उद्योग जगताला एकनाथ शिंदे यांच्या धाडसी नेतृत्वामुळे पुन्हा उभारी मिळाली. उद्योगस्नेही राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक आपण पुन्हा मिळवला. आज परदेशी गुंतवणूक असो किंवा पायाभूत सुविधांचे प्रकल्प असोत अनेक आघाड्यांवर आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष कामाची पाहणी करणारा मुख्यमंत्री त्यापूर्वी महाराष्ट्राने पाहिला नव्हता. तो शिंदे यांच्या रूपाने दिसला. महाराष्ट्राचे सीएम असले तरी ते नेहमी ‘कॉमन मॅन’सारखे आणि ‘कॉमन मॅन’साठीच काम करत राहिले. आताही ते अभिमानाने सांगतात की मी ‘डीसीएम’ म्हणजे ‘डेडिकेटेट टू कॉमन मॅन’ म्हणूनच काम करतोय. त्यांचा हा समर्पण भाव हेच शिवसेनेच्या यशाचं खरं रहस्य आहे.

२०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतरचा जनादेशही अभूतपूर्व होता, शिंदे यांच्या कारकिर्दीवर लोकांनी उमटवलेली ती पसंतीची मोहोरच म्हणावी लागेल. शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. ऐंशीपैकी ६० जागा निवडून आणण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली. आजवर इतके निर्भेळ यश शिवसेनेला कधीच मिळाले नव्हते.

खणखणीत हिंदुत्व

बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि भारतीय जनता पक्षाची उजवी, संघनिष्ठ विचारसरणी यांची नाळ जुळली. ती जवळपास ३५ अधिक वर्षे अभिन्न राहिली आहे, कारण दोन्ही पक्षांचा ‘डीएनए’ एकच आहे, हे लक्षात घ्यायला हवे. हिंदुत्वाच्या एकाच खणखणीत नाण्याच्या या दोन बाजू आहेत. दोन्ही बाजू एकत्र असल्याशिवाय हिंदुत्वाचं हे नाणं जनतेच्या बाजारात चालत नाही. शिवसेना ही नि:संशय हिंदुत्ववादी संघटना आहे, आणि त्याच विचारसरणीचा राजकीय पक्षही आहे. हे हिंदुत्व पारंपरिक हिंदुत्वाच्या कल्पनेपेक्षा विकासाला अधिक महत्त्व देणारं आहे. एकाअर्थी विकासवादी हिंदुत्व अशी त्याची मांडणी करता येईल. शाश्वत विकास, पण तो सामाजिक संतुलन साधत केलेला हवा. जातीपातीचा त्याला स्पर्शही नको. किंबहुना, धडाक्यात केलेला शाश्वत विकास हा कालबाह्य सामाजिक रूढी आणि नकोशा द्वेषविद्वेषाच्या भावनांचे तडे बुजवणाराच ठरेल, यावर शिवसेनेचा विश्वास आहे. शिंदे साहेबांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातही असे तडे बुजविण्याचा सतत प्रयत्न केला होता.

Balasaheb Thackeray News

राज्याला अग्रेसर ठेवणार

आज अनेक आघाड्यांवर महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे. तो लौकिक गेल्या अडीच वर्षात अधिकच झळाळून उठला, आणि येत्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणखीनच वेगात पुढे जाणार आहे. २०४७ पर्यंत भारताचा समावेश विकसित देशांमध्ये व्हावा, अशा धोरणाने पंतप्रधान मोदी वाटचाल करत आहेत. या वाटचालीत शिवसेना त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत चालेल, आणि महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यातही आपला वाटा उचलेल. हा नवा वारसा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वातच घडताना आपण सारे पाहातो आहोत.

नवा भारत आकारतो आहे. महाराष्ट्र कात टाकतो आहे. शिवसेनाही नव्या उत्साहाने, नवी वाटचाल करत आहे. बदलत्या राजकारणात शिवसेनेने आपला वेग, आणि दिशा विकासाभिमुख केली, पण बाळासाहेबांची शिकवण मात्र हृदयाशी घट्ट धरुन ठेवली आहे, कारण तेच तर शिवसेनेचे खरे संचित आहे. त्या संचिताच्या जोरावरच पुढल्या पाच नव्हे, पन्नास वर्षांची दमदार वाटचाल करायची आहे. घराघरांत शिवसेना, मनामनांत शिवसेना हाच शिवसेनेचा निर्धार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची पुण्याई आणि राज्यातील जनतेच्या आशीर्वादाने हा निर्धार आम्ही नक्की पूर्ण करू.

वेगवान निर्णय

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे कारभारातील गतिमानता. अतिशय वेगवान निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी यामुळे अडीच वर्षांची त्यांची कारकीर्द कमालीची उजळून उठली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हीजन आणि भक्कम पाठबळ होते, दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांना शिंदे यांचे नेतृत्व भावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकार्यामुळे भारावलेल्या एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना-भाजपचे डबल इंजिन सरकार किती तडफेने काम करू शकते, याचे उदाहरण संपूर्ण भारतासमोर ठेवले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ हे एकनाथ शिंदे यांचेच अपत्य. या योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. इतका की देशा-परदेशात या योजनेचा बोलबाला झाला. अनेक राज्यांनी ही योजना लागू करण्याची इच्छा दर्शवली, बहुतेक सर्वच पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात या योजनेचीच कॉपी केली. हे या योजनेचे सामाजिक आणि राजकीय यश म्हणावे लागेल.

Eknath Shinde

कल्याणकारी योजना हा शाश्वत विकासाचाच एक अविभाज्य भाग समजला पाहिजे. ज्या गृहिणींना एरवी ‘रांधा-वाढा-उष्टी काढा’ हा मंत्र जपत संसाराचा गाडा ओढावा लागत होता. त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा दीड हजाराची ओवाळणी मिळू लागली. ‘दीड हजारात काय होते?’ पासून ‘बहिणींना लाच दिली’ पर्यंत असंख्य आक्षेप, लाखोल्या, टीका ऐकून घ्यावी लागली. पण लाडक्या बहिणींना त्यामुळे स्वाभिमान, आत्मविश्वास परत मिळाला, ही वस्तुस्थिती विसरता येणार नाही. आज अनेक बहिणी या दीड हजाराच्या जोरावर कर्तृत्व गाजवू लागल्या आहेत. त्यांच्या यशोगाथाही माध्यमांनी दाखवाव्यात. या योजनेला विरोध करणाऱ्यांनीच पुढे त्यांच्या जाहीरनाम्यात मिळत्या जुळत्या योजना घातल्या यावरुन तिचे महत्त्व आणि गरज लक्षात येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT