Ashish Deshmukh News: काटोलचे माजी आमदार काँग्रेस नेते आशिष देशमुख मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज दिसून येत आहेत. देशमुख आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातलं संघर्ष काही दिवसांपासून सुरू आहे.दोन्ही नेते एकमेकांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान आशिष देशमुख लवकरच काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात सामील होणार असल्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार देशमुख लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
आशिष देशमुख यांना राजकीय वारसा घरातूनच मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांचे चिरंजीव आहेत.
आशिष देशमुख यांचे शिक्षण
आशिष देशमुख यांचा जन्म 11 डिसेंबर 1974 ला झाला.त्यांनी इंडस्ट्रियल स्पेशलायझेशनमध्ये अभियांत्रीकी पदवी मिळवली आहे. तसेच एमबीए फायनान्स आणि पीएचडीही पूर्ण केली आहे. उच्चशिक्षित असलेल्या आशिष देशमुखांनी 'ग्रामविकासाचा पासवर्ड'हे पुस्तकही लिहिले आहे. आशिष देशमुख यांची महाराष्ट्रातील सर्वाधिक शिकलेल्या राजकीय नेत्यांमध्ये गणना केली जाते.
अशी आहे राजकीय कारकिर्द
2014च्या निवडणुकीपूर्वी आशिष देशमुख यांनी भाजप तर्फे सक्रिय राजकारणात प्रवेश केला. भाजपने त्यांना काटोलमधून उमेदवारी दिल्यानंतर ते तिथून विधानसभेवर निवडून आले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेल्या त्यांचे काका अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. 2018 मध्ये देशमुख यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा असो वा शेतकऱ्यांचे प्रश्न असो, जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरुन आंदोलनात आशिष देशमुख कायम दिसतात. त्यामुळे देशमुखांचा काँग्रेस प्रवेश म्हणजे नागपुरात रस्त्यावर लढणारा नेता काँग्रेसला मिळाला आहे.
काँग्रेसला आक्रमक चेहऱ्यांची नितांत गरज असण्याच्या काळात विदर्भात आशिष देशमुख यांच्या रुपाने अभ्यासू आणि आक्रमक नेता पक्षात आल्याने काँग्रेसला याचा मोठा फायदा होईल, अशी त्यावेळी चर्चा होती. 'गांधी घराण्याशी देशमुख कुटुंबीयांचे जुने संबंध आहेत. तसंच आता पुढची दिशा ही गांधींच्या विचारधारेनुसार आणि तत्वांवर असेल. मला राष्ट्रीय पातळीवर काम करायचं आणि त्यानुसार माझे प्रयत्न सुरू आहेत', असं सांगत देशमुख यांनी काँग्रेस प्रवेश केला होता.
दरम्यान, आशिष देशमुख मागील काही दिवसांपासून पक्षानर नाराज दिसून येत आहेत. देशमुख आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातलं संघर्ष काही दिवसांपासून सुरू आहे. 2022 मध्ये काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे देशमुख यांनी नाराजी व्यक्त करत, आपल्या काँग्रेस प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा दिला होता.
आशिष देशमुख यांना आजच काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
नाना पटोलेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला एक खोका मिळत असल्याचा दावा , आशिष देशमुख यांनी केला होता. आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंवर असे गंभीर आरोप केले होते. पटोले हे लवकरच गुवाहाटीला असतील, त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला १ खोका दिला जातो, असा खळबळजनक आरोप आशिष देशमुख यांनी केला होता. त्यामुळे त्यांना आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आली आहे. उत्तर येईपर्यंत त्यांचं काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. या कारणांमुळे आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.
Edited by : Rashmi Mane