NCP Ajit Pawar Group : महायुतीतील संघर्ष, स्वपक्षातीलच नाराजीच्या पार्श्वभूमीवर ‘येतील त्यांच्यासह आणि येणार नाहीत त्यांच्याशिवाय...’ अजित पवारांना विधानसभा निवडणुकीची अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. ‘लोकसभे’साठी अजित पवार यांनाच पडती बाजू घ्यावी लागली. विधानसभेला तसे करणे त्यांना परवडणारे नाही. त्यांना आता ताकद दाखवावी लागेल. त्यांना स्वकीयांची किती मदत होणार, हा खरा प्रश्न आहे. अजून तरी अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’तील नेते वज्रमूठ करून एकत्र आल्याचे दिसत नाही. त्यामुळे विधानसभेच्या मैदानात अजित पवार यांची अवस्था एकाकी वाघाप्रमाणे झाली आहे.
अजित पवारांकडे खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हे प्रमुख नेते आहेत. पक्षाची ध्येयधोरणे तयार करणे, पक्षवाढीचे नियोजन करणे, झंझावाती दौरे करून एकसंध राष्ट्रवादी काँग्रेससाठी भक्कम पार्श्वभूमी तयार करण्याच्या कामाचा अनुभव या नेत्यांना आहे. मात्र, ही मंडळी एकत्र काम करताना दिसत नाहीत. सध्या दिसत नसलेली पक्षातील प्रमुख नेत्यांची मोट बांधणे आवश्यक आहे.
लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. त्यानंतर राज्यसभा उमेदवारीसाठीही त्यांना डावलले. तेव्हापासून भुजबळ यांची नाराजी कायम आहे. यातच राज्यात पेटलेल्या मराठा आंदोलनात भुजबळ यांनी जी भूमिका घेतली, त्याचे पक्ष म्हणून ‘राष्ट्रवादी’ने ना स्वागत केले ना विरोध केला. त्यामुळे नाराज छगन भुजबळांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
प्रफुल्ल पटेल यांची राजकीय कारकीर्द दिल्लीतच बहरली आहे. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी पटेल यांच्यासाठी दिल्लीचे दरवाजे कायम उघडे ठेवले. पटेल यांची राज्यसभेवरील चार वर्षे बाकी असतानाही त्यांना अजित पवार गटाने उमेदवारी देऊन सहा वर्षांसाठी सुरक्षित करण्यात आले. पटेल यांच्याऐवजी अन्य एखाद्या कार्यकर्त्याला ही खासदारकी देऊन, बेरजेचे राजकारण शक्य होते. मात्र ते झाले नाही यावरूनच ‘राष्ट्रवादी’तील पटेल यांचे राजकीय वजन दिसते. मात्र, हेच पटेल रणनीती ठरवण्यात अभावानेच दिसतात. कदाचित ‘पडद्यामागे’ ते महत्त्वाची ‘भूमिका’ बजावत असावेत. आता विधानसभा आखाड्यात ‘राष्ट्रवादी’चा झेंडा भक्कम रोवण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल.
पक्षनेते, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे पक्षासाठी भव्यदिव्य कार्यक्रम घेत आहेत. मात्र, या कार्यक्रमासोबत कार्यकर्त्यांना संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी कृती कार्यक्रम देण्याचीही गरज आहे. मात्र, असा काही कार्यक्रम सध्या ‘राष्ट्रवादी’कडे दिसत नाही. काहींनी पक्ष सोडला. कोणी उमेदवारी, महामंडळ, निधीवाटपावरून नाराज आहे. काही आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या सर्व नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष काय भूमिका घेणार? विधानसभा निवडणुकीत तटकरे हे त्यांच्या कन्या आदिती तटकरे यांच्या प्रचारात व्यग्र होतील. पक्षाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे. संसदीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीचे अध्यक्षपद देऊन भाजपने खासदार तटकरे यांना ‘बूस्टर’ दिला आहे. आता तटकरे ‘राष्ट्रवादी’ला किती ‘बूस्टर’ देतात, ते पहावे लागेल.
राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री-नेते दिलीप वळसे पाटील हे तर अपवादानेच ‘राष्ट्रवादी’च्या कार्यक्रमात दिसतात. मंत्री हसन मुश्रीफ यांची त्यांच्याच मतदारसंघात शरद पवार यांनी कोंडी केली आहे. या निवडणुकीत त्यांना नेहमीपेक्षा अधिक संघर्ष करावा लागणार आहे. अशा पद्धतीने ‘राष्ट्रवादी’चे एकेक नेते या ना त्या कारणाने आपापल्या जागेवर ठाण मांडून आहेत. त्यामुळे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांना एकट्यालाच झुंज द्यावी लागेल, अशी आजची परिस्थिती आहे.
अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क : ९८८१५९८८१५
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.