Uddhav Thackeray : आपले 40 आमदार सांभाळू न शकलेल्या ठाकरे, राऊतांना हवे काँग्रेसवर नियंत्रण!

Uddhav Thackeray, Sanjay raut On Conngress : आघाड्यांच्या राजकारणात पक्षांना वैयक्तिक महत्त्वाकांक्षाना मुरड घालावी लागते. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला हे शक्य होत नाही, असे दिसत आहे. हरियाणात सत्ता आणण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसवर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी त्यामुळेच निशाणा साधला आहे.
sanjay raut | uddhav thackeray | nana patole
sanjay raut | uddhav thackeray | nana patolesarkarnama
Published on
Updated on

हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली नाही आणि ‘इंडिया’ आघाडीतील पक्ष आक्रमक झाले. मित्रपक्षांनी काँग्रेसवर टीका सुरू केली. आम आदमी पक्षाने दिल्लीत काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असे जाहीर केले. तिकडे, उत्तरप्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दावा केलेल्या जागांवरही समाजवादी पक्षाने उमेदवार जाहीर केले.

इकडे, महाराष्ट्रातही पडसाद उमटले. महाविकास आघाडीतील शिवसेना आक्रमक झाली आणि काँग्रेसवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ), संजय राऊत यांनी काँग्रेसला आरसा दाखवायला सुरुवात केली. याचा फायदा न घेतील ते देवेंद्र फडणवीस कसले? फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील या कुरघोड्यांचा चांगलाच समाचार घेत त्यांच्या एकजुटीविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या नाकाखालून थोडे थोडके नव्हे, तब्बल 40 आमदार कधी आणि कसे निघून गेले, हे ज्यांना कळले नाही, ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे काँग्रेसच्या विरोधात आक्रमक होणे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल.

विजयाला पराभवात रुपांतरित करण्याची कला काँग्रेसला जमते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढावी, असे आव्हान संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी दिले. हरियाणात भाजपची सत्ता होती. ती कायम राखण्यात भाजपला यश आले. गेल्या निवडणुकीत 41 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 48 जागा मिळाल्या. काँग्रेसला 37 जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत 31 जागा मिळाल्या होत्या. सत्ता मिळाली नसली तरी काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा झाली, असे म्हणता येईल. असलेली सत्ता काँग्रेसने गमावलेली नाही, हे मित्रपक्ष आणि विरोधकांनीही लक्षात घेतले नाही.

sanjay raut | uddhav thackeray | nana patole
Mahayuti News : सुपडासाफ, पाडापाडीच्या भाषेला महायुतीत आता ब्रेक लागणार का ?

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, या शिवसेना ठाकरे गटाच्या मागणीला काँग्रेसकडून विरोध झाला होता. शरद पवार यांनीही हा निर्णय संख्याबळावर घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. ही बाब ठाकरे गटाच्या जिव्हारी लागली आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केले जाईल, अशी अपेक्षा ठाकरे गटाला होती, मात्र ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाची खदखद बाहेर पडली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या अंगी अहंकार आला होता, हेही मान्य करावे लागेल. उद्धव ठाकरे, शरद पवार सोबत असणे हे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामागील एक मोठे कारण आहे, याचा विसर काँग्रेसच्या नेत्यांना पडला होता. असे असले तरी कुरघोड्या केल्याने नुकसान आपलेच होणार आहे, हे ठाकरे, राऊत यांनीही लक्षात घ्यायला हवे.

निवडणुकीत जय-पराजय होत होत असतात. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली होती. हरियाणातील लोकसभेच्या 10 पैकी 5 जागा जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत आघाडी न करण्याचा निर्णय काँग्रेसच्या अंगलट आला. नेत्यांचा हेकेखोरपणा, अतिआत्मविश्वास नडला आणि काँग्रेसला त्याचा फटका बसला. अशा चुका कमी-अधिक प्रमाणात सर्वच पक्षांकडून विविध निवडणुकांत होत असतात. अपेक्षित यश न मिळाले की त्याची चर्चा सुरू होते.

sanjay raut | uddhav thackeray | nana patole
Maharashtra Politic's : मुख्यमंत्रिपदावरून निवडणुकीपूर्वीच रंगला ‘सामना’!

शिवसेनेत अडीच वर्षांपूर्वी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. साथ सोडणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले. हे आमदार कधी आणि कसे गेले, हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कळले नाही. आपल्याच शिलेदारांनी साथ सोडली, मात्र महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. शरद पवार हेही महाविकास आघाडीत पाय घट्ट रोवून उभे राहिले. लोकसभेत महाविकास आघाडीला जे यश मिळाले, त्यामागे हेही कारण होते.

महाविकास आघाडीचे, आपले बलस्थान काय आहे, हे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना माहीत नाही, असे म्हणता येणार नाही. असे असतानाही हरियाणा निवडणुकीतील अपयशानंतर ठाकरे गटाने काँग्रेसवर सुरू केलेली टीका हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. काँग्रेसची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी झाली आहे, हे बिंबवण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांच्या आव्हानानुसार काँग्रेसने खरेच स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर काय होईल? तेलही गेले अन् तूपही गेले, अशी अवस्था उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची होईल.

sanjay raut | uddhav thackeray | nana patole
Maharashtra Politic's : मुख्यमंत्रिपदावरून निवडणुकीपूर्वीच रंगला ‘सामना’!

आपले आमदार आपल्या ताब्यात ठेवू न शकलेले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काँग्रेसला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करताहेत, हे अनाकलनीय आहे. आघाड्यांचे राजकारण करत असताना सर्व काही आपल्या मनासारखे होत नाही. भाजपचे 105 आमदार आहेत, मात्र 40 आमदार असलेल्या शिंदे गटाला मुख्यमंत्रिपद मिळाले आहे, हे महाविकास आघाडीतील पक्षांनी, विशेषतः शिवसेनेने लक्षात घेण्याची गरज आहे. संधी मिळताच शिवसेनेने काँग्रेसवरचा राग काढला आहे. हा दबावतंत्राचा भाग असला तरी त्यातून शिवसेनेच्या हाती फार काही लागेल, अशी शक्यता दिसत नाही. उलट काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची अवस्था तेलही गेले, तूपही गेले, अशीच होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com