Pune News: डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच हा मतदार संघ कोणत्या पक्षांकडे जाणार याची चर्चा रंगली असतानाच पदवीधरसाठी भाजप आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये शिवसेनेने आघाडी घेतली आहे. मात्र, असे असताना पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपने सेफ करून शिक्षक मतदारसंघांमध्ये अंतर्गत धक्कादायक हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडीमुळे आतापासूनच शिक्षक मतदार संघातील महायुतीमधील राजकारण ढवळून निघणार आहे.
सध्या वरिष्ठ स्तरावर जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली नसली तरी अंतर्गत हालचालीने वेग घेतला आहे. शिक्षक मतदारसंघासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विवेकानंद स्वामी शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे यांचे प्रमोटिंग सुरू असताना, त्यांनी थेट महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीतून उमेदवारी मिळवलेली आहे. या घडामोडीला अनेक संदर्भ जोडले गेले असून आगामी महिनाभरात त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुणे पदवीधरमधून शरद लाड यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देऊन महायुती मधील अंतर्गत स्पर्धकाला पर्याय ठेवलेला नाही.
शिक्षक मतदारसंघ हा राजकीय पक्षांतर्गत किंवा राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढवता येणार नाही. मात्र राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर आणि शैक्षणिक संस्थांच्या पाठबळावर निवडणूक निवडणूक लढवली जाते. मात्र, अलीकडील काही निवडणुकीतील संदर्भ पाहता शैक्षणिक संघटनांचा या निवडणुकीवरील प्रभाव कमी झाला असून व्यक्तिगत पातळीवर आणि उमेदवाराच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन निकाल झालेला पाहायला मिळाला आहे.
काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षक लोकशाही आघाडीचे उमेदवार कौस्तुभ गावडे, माजी आमदार दत्तात्रय सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे खंडेराव जगदाळे, एकलव्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सक्रिय असलेले प्रा. सचिन सानप, पंढरपूर येथील श्री विठठ्ठल एज्यकेशन अॅड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे या संभाव्य उमेदवारांची चर्चा अधिक आहे.
सध्या काँग्रेस पुरस्कृत म्हणून आमदार जयंत आसगांवकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या विरोधात शिक्षक लोकशाही आघाडीचे कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी समोर आली आहे. शिक्षक लोकशाही आघाडीने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे हे देखील त्यांच्यासमोर आव्हान आहे. गावडे यांचे विवेकानंद शिक्षण संस्थेचे नेटवर्क आहे. जिल्ह्याजिल्ह्यात शाळा, संस्थांचे जाळे आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. भाजप त्यांना पुरस्कृत करू शकतो. शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते आवाज उठवित आहेत.
शिवाय राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ज्या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांचा दौरा आहे त्या ठिकाणी गावडे यांना प्रमोट करण्याचे काम मंत्री पाटील यांनी केलेले आहे.
नुकत्याच झालेल्या विवेकानंद संस्थेच्या बैठकीत त्यांनी अनेक संदर्भ देत उमेदवारी संदर्भात संकेत दिले आहेत. त्यानंतर गावडे यांनी थेट लोकशाही आघाडीतून उमेदवारी मिळवून प्रचारासाठी शड्डू ठोकला. महायुतीमध्ये अजूनही उमेदवारीवरून चर्चा सुरू असताना गावडे यांनी घेतलेला निर्णय हा संशोधनाचा विषय असून भविष्यातील अनेक नव्या समीकरणांचे संकेत आहेत.
शिवाय नजीकच्या काळात कोण, कोणासोबत राहणार यावर अनेक गोष्टी अवलंबून राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मंगेश चिवटे यांनीही शड्डू ठोकला आहे. महायुतीच्या सर्व पक्षांचा पाठिंबा घेऊन आपणच पुरस्कृत उमेदवार असणार असा दावा मंगेश चिवटे यांनी करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
येत्या 6 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली जाणार आहे. त्यांनी, सांगली, सोलापुरात शिक्षकांचे मेळाव घेतले. या आठवडयात कोल्हापुरात मेळावा घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात मदत कार्यात आघाडीवर राहून काम केलेला तरुण चेहरा म्हणून ते परिचित आहेत. मात्र शिक्षक मतदारसंघात पहिल्यांदाच पाऊल टाकले आहे.
मागील निवडणुकीचा अनुभव पाहता यावेळी शिक्षक मतदार संघात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय अनेक नव्या समीकरणामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील निवडणुकीत भाजपने ज्या पद्धतीने पदवीधर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले त्या पद्धतीने शिक्षक मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.
महाराष्ट्र शिक्षक परिषद संघटनेने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र मंत्री पाटील यांनी ज्या उमेदवारांचे प्रमोटिंग केले त्यांना ही संघटना पाठिंबा देणार की महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे पुढील समीकरणावर अवलंबून आहे.
यंदाच्या निवडणुकीत संस्थाचालक संघटना, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समिती, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित संघटना, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य या संघटनांचा प्रभाव या निवडणुकीत असणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही प्रामुख्याने भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारसरणीशी बांधील व त्यांच्याकडून पुरस्कृत असलेली संघटना मानली जाते. मात्र अद्याप त्यांच्याकडून एकाही उमेदवाराची घोषणा किंवा पाठिंबा झालेला नाही.
मागील निवडणुकीत या संघटनेने जितेंद्र पवार यांना पाठिंबा दिला होता. तर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही परिषद ही स्वायत्त आणि स्वतंत्र संघटना असून कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. पण आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या आघाडीने कौस्तुभ गावडे यांना आपले अधिकृत पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. या निवडणुकीत त्यांनी महायुतीकडून अधिकृत पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीतील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणीही राबवली आहे.
तर दुसरीकडे महायुतीकडून एकनाथ स्वाभिमानी शिक्षण सेना यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मतदार संघातील पाचही जिल्ह्यांमध्ये त्यांनी आतापर्यंत मेळावे घेतले असून प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटीवर त्यांनी जोर दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
कौस्तुभ गावडे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय समजले जातात तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय मंगेश चिवटे आहेत. त्यामुळे आगामी काळात उमेदवारीवरून आणि पाठिंब्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजप कोणाला पाठिंबा देणार? शिवाय महायुती कोणाला पुरस्कृत उमेदवार करणार यावर बरेच गणित आणि समीकरणे अवलंबून आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.