Pune Graduate Teacher Election Sarkarnama
विश्लेषण

Mahayuti: पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूकीत महायुतीचा मैत्रीपूर्ण प्लॅन, नेत्यांचे कारभारी मैदानात

Pune Graduate Teacher Election: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीवरून चुरस वाढली आहे. नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या दाव्यांमुळे मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चेला वेग आला आहे.

Rahul Gadkar

Pune Graduate Teacher Election: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये महायुतीमध्ये अंतर्गत चुरस निर्माण झाली असून नेत्यांचे कारभारीच मैदानात असल्याचे चित्र आहे. मंत्र्यांचे निकटवर्तीय या निवडणुकीच्या रिंगणात असल्याने सर्वांची गोची निर्माण झाली आहे.

नेत्यांनी देखील आपल्याच कारभाऱ्याला उमेदवारी मिळावी, यासाठी गेल्या आठवडाभरापासून केलेली विधान चांगलीच गाजली आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वक्तव्यांमुळे आता महायुतीमध्येच मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता निर्माण होत आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी राज्यातील सर्वच निवडणुका महायुती म्हणून लढवल्या आहेत. या पुढच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार अशी घोषणा केली जात आहे. मात्र पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत सर्वच इच्छुक उमेदवार नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. शिवाय पक्षीय नेत्यांचे दौरे हे स्वतंत्रपणे होत असल्याने ही निवडणूक मैत्रीपूर्ण लढण्याचा प्लॅन पुढे येत आहे. पदवीधरमधून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय भैया माने, तर नुकताच भाजप पक्षप्रवेश केलेले शरद लाड यांनी आपल्या उमेदवारीवर दावा केला आहे.

शिक्षक मतदार संघामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मंगेश चिवटे तर उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ज्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्या संस्थेचे कार्यकारी संचालक कौस्तुभ गावडे यांनी निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकला असून भाजप आणि शिवसेनेकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.

गेल्या काही दिवसातील मंत्री जयकुमार गोरे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर यांची विधाने पाहता पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षाची वाटचाल स्वतंत्रपणे लढण्याकडे दिसत आहे. यामुळे या दोन्ही मतदारसंघासाठी महायुती एकत्र लढणार की मैत्रीपूर्ण लढतीसाठी शड्डू ठोकणार याची चर्चा रंगली आहे.

शिक्षक मतदार संघात महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी कडून कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. सध्या भाजप पुरस्कृत पाठिंबा घेण्याचे गावडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुती म्हणून निवडणूक लढवायचे झाल्यास ही जागा भाजपकडे घेण्याचे वरिष्ठ स्तरावरून जोरदार सुरू आहेत. जर महायुतीमध्ये ही जागा भाजपला गेल्यास गावडे यांना भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले जाऊ शकते.

तर शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी देखील शिक्षक मतदार संघातील जागा ही शिवसेनेकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यासाठी दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली जात आहे. नुकतेच चिवटे यांनी कर्नाटक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन उमेदवारी संदर्भात मागणी केली आहे. जर ही जागा भाजपला गेल्यास पक्ष बदलाची तयारी ठेवली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरच या दोन उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रमुख व माजी आमदार दत्तायत्र सावंत यांनी निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. त्यांनीही पंढरपूर येथील शिक्षक मेळाव्यात भाजपकडून लढायचे की अपक्ष यासंबंधी कानोसा घेतला. या पूर्वीच्या निवडणुकीत भाजपचा त्यांना पाठिंबा होता. मात्र सध्या गावडे यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. इच्छुकांची संख्या आणि निवडणुकीची तयारी यावर नजर टाकली तर महायुतीमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी एकवाक्यता निर्माण होण्याची शक्यता कमी दिसत आहे. यामुळे महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची चिन्हे दिसत आहेत. यामध्ये भरीस भर म्हणजे गेल्या काही दिवसात महायुतीतील नेतेमंडळीची विधाने ही स्वतंत्रपणे लढण्याचे मार्ग दर्शविणारी आहेत.

नुकतेच पंढरपूर येथे मंत्री गोरे यांनी 'पुणे विभागीय शिक्षक व पदवीधरची निवडणूक महायुती म्हणून लढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेळ पडल्यास या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीला सामोरे जाऊ', तर मंत्री पाटील यांनी 'पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघ हे भाजपाचे परंपरागत मतदारसंघ आहेत.' असे स्ष्ट केले.

कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, मंगेश चिवटे यांना शिक्षक मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रयत्न करू असा सावध पवित्रा घेतला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुशिरिफ यांनी पदवीधर राष्ट्रवादी काँग्रेसला तर शिक्षक भाजपला घेण्याची विनंती केली आहे.

पदवीधर मध्ये मंत्री मुश्रीफ यांचे निकटवर्तीय आणि जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून उमेदवारीचा दावा केला आहे. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपकडून शरद लाड यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघामध्ये प्रत्येकाने महायुतीमध्ये आपला उमेदवार असावा, यासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे. प्रसंगी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी देखील सुरू ठेवली आहे. त्यामुळे आपल्या कारभाऱ्याला उमेदवारी मिळावी यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जर उमेदवारी महायुतीतून न मिळाल्यास स्वतःची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय पुढे येत असल्याची माहिती देखील मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT