Sassoon Hospital Sarkarnama
विश्लेषण

Hit And Run Case : उंदराच्या चाव्याने रुग्णाचा मृत्यू ते ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार व्हाया ड्रग्ज रॅकेट! 'ससून' रुग्णांसाठी 'वरदान' की...

Pune Sassoon Hospital degradation : पुण्यातील हिट अॅन्ड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केल्याने ससून हॉस्पिटलचे धिंडवडे निघाले आहेत.

Sunil Balasaheb Dhumal

Pune News : एकेकाळी डागाळलेली प्रतिमा सुधारुन 'ससून'मध्ये वेळेत आणि योग्य ते उपचार मिळू लागल्याने रुग्णांसह नातेवाईकांचाही तिकडे ओढा वाढला होता. सध्या ससूनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.यात काही प्रमाणात रुग्णांची हेळसांड होत असली तरी तेथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे.

पण गेल्या वर्षभरापासून 'ससून'मध्येच घडलेल्या उंदीर चावल्याने आयसीयूतील रुग्णाचा मृत्यू,ड्रग्ज रॅकेटमधील मुख्य आरोपीचा ससूनमधला नऊ महिन्यांचा मुक्त वापर आणि आता कल्याणीनगर 'हिट अॅण्ड रन' प्रकरणात मुख्य आरोपीचे ब्लड सॅम्पल कचरा पेटीत फेकून देण्यापर्यंतच्या काही धक्कादायक घटनांनी ससूनच्या विश्वासार्हतेला तडे तर गेलेच शिवाय आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. यातून ससून हे रुग्णांसाठी वरदान की गुन्हेगारांचे आश्रयस्थान अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

मध्यंतरी 'ससून'चे Sasoon नाव ड्रग्ज प्रकरणात देशभर गाजले होते. त्यातील मुख्य आरोपीला पळून जाण्यासाठी चक्क ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी मदत केल्याचाही आरोप झाला. दरम्यान, ससूनमध्ये एका रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू झाल्याचेही समोर आले. यातून रुग्णालयातील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. गेल्या दोन महिन्यात रुग्णालयातील दोन विद्यार्थ्यिनींना रॅगिंगच्या प्रकाराला समोरे जावे लागले आहे. त्यावरही प्रशासनाने ठोस पाऊल उचलले नाही. यात भरीस भर आता रुग्णालयातील डॉक्टरांनी लाच घेऊन ब्लड रिपोर्ट बदल्याचे पुढे आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात होणाऱ्या अशा घटनांनी ससूनचे राज्यभर धिंडवडे निघत आहेत.

ड्रग्ज रॅकेट

ड्रग्जप्रकरणी येरवडा कारागृहात असलेल्या ललित पाटलाला Lalit Patil पोटदुखीच्या नावाखाली ससूनमधील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये उपचार सुरू होते. तो तेथून काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ड्रग्ज रॅकेट चालवत होता. ससूनबाहेर एकाकडून दोन कोटींचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर ललीत पाटलाचे कारनामे पुढे आले. आपले बिंग फुटल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील ससूनमधून फरार झाला. त्याला पळून जाण्यामागं ससूनमधील काही कर्मचाऱ्यांसह पोलिसांचाही हात असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर या ड्रग्ज प्रकरणात कोणाकोणाचा सहभाग आहे, हे स्पष्ट करणार असल्याचा इशाराही त्याने दिला होता. या प्रकरणाने मात्र ससूनची देशभर मोठी बदनामी झाली होती.मात्र,या प्रकरणी कारवाई, चर्चा आता मागे पडली आहे.

आयसीयूत उंदीर

ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना ससूनचा मोठा आधार आहे. मात्र येथील सुरक्षा आणि स्वच्छतेवरून रुग्णालय प्रशासनावर अनेकदा नामुष्कीची वेळ आली आहे. गेल्या महिन्यात आयसीयूत उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू मणक्याला मार लागण्याने झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मात्र आमच्या रुग्णाचा मृत्यू हा उंदीर चावल्याने झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. यावर अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंनी उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याचे सांगत नातेवाईकांच्या तक्रारीचीही गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट केले.पण नातेवाईकांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे तोपर्यंत ससून रुग्णालय प्रशासनावर राज्यभरातून टीकेची झोड उठवण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विद्यार्थिनींवर रॅगिंग

बीजे मेडिकल कॉलेजमध्ये BJ Medical College पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षातील दोन विद्यार्थिनींना रॅगिंगला सामोरे जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार मार्च आणि एप्रिलमध्ये घडला आहे. यातील एक विद्यार्थिनी एक्स रे विभागाची तर दुसरी भूलशास्त्राचे शिक्षण घेत आहे. एकापाठोपाठ एक घडलेल्या या रॅगिंगच्या प्रकारावर प्रशासनाने ठोस पाऊल उचलले नसल्याचा आरोप होत आहे. यावर यातील एका प्रकार रॅगिंगचा असून त्याची माहिती समितीला दिली आहे. तर दुसरा प्रकार हा अंतर्गत वादाचा असून त्याची चौकशी करत असल्याचे अधिष्ठाता काळेंनी स्पष्ट केले.

ब्लड रिपोर्टच बदलले

सध्या पुण्यातील हिट अॅन्ड रन प्रकरण Hit And Run Case देशभर चर्चेत आहे. याप्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप होत असतानाच ससूनच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुनेच बदल्याचे स्पष्ट झाले आहे. यात दोन डॉक्टरसह एका शिपायाचा सहभाग असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे.पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सगळी यंत्रणाच हात झटकून कामाला लागली आहे. त्यानंतर लाखो रुपये घेऊन ससूनमधील दोन डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केला. त्यामुळे ससून रुग्णालय हे रुग्णांसाठी आश्रयस्थान ठरण्याऐवजी गुन्हेगारांसाठी वरदान ठरत असल्याचेच दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT