Pune News : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत प्रमुख दावेदार असूनही शेवटच्या क्षणी हुलकावणी मिळालेल्या माजी गटनेते गणेश बिडकर यांच्याकडे आता पुणे महापालिका निवडणुकीच्या नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली त्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, शहराध्यक्ष न होता देखील, बिडकर हे आगामी महापालिका निवडणुकीतील भाजपच्या यंत्रणेतील 'स्टॅटेजिक ब्रेन' ठरणार असल्याची चिन्हं आहेत.
काही दिवसांपूर्वी कसब्यामध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी गणेश बिडकर यांच्याकडे देणार असल्याचं सूतोवाच केले होते. याबाबत अधिकृत घोषणा जरी अद्याप झाली नसली तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गणेश बिडकर यांनी कामाला सुरुवात केली असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्य सरकारने महापालिकांना प्रभाग रचना करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. महापालिका प्रशासनाने देखील या प्रभागात रचने संदर्भातील कामांना सुरुवात केली आहे. एकीकडे महापालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेची कामाला सुरुवात झाली असताना दुसरीकडे बिडकरांकडून देखील खलबत्ते सुरु झाली असल्याची चर्चा आहे. भाजपच्या शहराध्यक्ष पदासाठी बिडकर यांचं नाव आघाडीवर होते.
आगामी महापालिका निवडणुका आणि बिडकर यांचा पालिकेबाबतचा असलेला अनुभव यामुळे बिडकर यांची शहराध्यक्षपदी वर्णी लागेल असं बोललं जात होतं मात्र, अंतर्गत समीकरणं आणि राजकीय तडजोडींमुळे त्यांना बाजूला ठेवण्यात आलं. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येईल, असं देखील आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं. त्यानुसार आता गणेश बिडकर यांच्याकडे पुणे महापालिका निवडणुकीबाबतची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पक्षाने बिडकर यांच्यावर पुणे महापालिकेच्या निवडणुकीचं एकूण रणनीती निर्धारण, प्रभागरचना आकलन, मायक्रो लेव्हल प्लॅनिंग, आणि प्रचार व उमेदवारी नियोजन यांची सूत्रे सोपवली आहेत, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे, कोणत्या प्रभागात कुठल्या प्रकारची रणनीती आखायची, उमेदवार कसे असावेत, प्रचार कसा असावा, यावर बिडकरांचा मोलाचा शब्द असेल.
पुणे महापालिकेमध्ये भाजपची एक हाती सत्ता होती, यंदा देखील भाजपने स्वबळावरतीच एक हाती सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सह महायुतीतील मित्र पक्षांचे देखील दोन हात करावे लागणार आहेत. अशा वेळी बिडकरसारखा अनुभवी आणि पालिकेची इथंभूत माहिती असलेला नेता, निवडणूक यंत्रणेला नीट नेटकी दिशा देऊ शकतो, यादृष्टीने ही जबाबदारी बिडकर यांच्यावरती सोपवली असल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.